"झुंडशाहीला कंटाळून काँग्रेस सोडली!", राजू पारवेंचा खुलासा

    25-Mar-2024
Total Views |

Raju Parve 
 
नागपूर : पक्षात सुरु असलेल्या हुकुमशाही आणि झुंडशाहीला कंटाळून काँग्रेस सोडल्याचा खुलासा आमदार राजू पारवे यांनी केला आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी पक्षाचा राजीनामा देत रविवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्यामागचे कारणही स्पष्ट केले.
 
राजू पारवे म्हणाले की, "जिल्ह्यात काँग्रेस पक्षात सुरु असलेली झुंडशाही आणि हुकुमशाही मला मान्य नव्हती. मी वारंवार पश्रेष्ठींना याबाबत सांगितले होते. परंतू, कुणीही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे मला पक्ष सोडावा लागला असून माझे पक्ष सोडण्याचे हे एकमेव कारण होते," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  पत्राला पत्रानं उत्तर! प्रणिती शिंदेंवर राम सातपूतेंचं शरसंधान
 
रविवार, २४ मार्च रोजी काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तसेच यावेळी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल आणि शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव हेदेखील उपस्थित होते.
 
दरम्यान, राजू पारवेंनी काँग्रेसमध्ये हुकुमशाही आणि झुंडशाही सुरु असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, राजू पारवेंना शिवसेनेकडून रामटेक लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याठिकाणी काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांना तिकीट मिळाले आहे. त्यामुळे आता रामटेक लोकसभेमध्ये रश्मी बर्वे विरुद्ध राजू पारवे असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.