"राऊतांनी वंचितसोबतच्या चर्चेची सर्व दारे बंद केलीत!"
भाजप आमदार नितेश राणेंचा घणाघात
25-Mar-2024
Total Views |
मुंबई : संजय राऊतांनी वंचित बहुजन आघाडीसोबतच्या चर्चेची सर्व दारे बंद केली आहेत, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उबाठासोबतची युती तुटल्याचे जाहीर केले. यावर राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
नितेश राणे म्हणाले की, "ज्याप्रमाणे संजय राऊतांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून मातोश्रीला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे आता परत एकदा दुसऱ्या बाळासाहेबांना मातोश्रीपासून दूर करण्यात ते यशस्वी झाले आहेत. कुठल्याच बाळासाहेबांना मातोश्रीच्या जवळ येऊ द्यायचं नाही, असा चंगच त्यांनी बांधला आहे."
"यातूनच त्यांनी कधीच जिंकू शकणार नाही अशा जागा वंचित बहुजन आघाडीला देऊ केल्यात. तुम्हाला जर प्रामाणिकपणे वंचितला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाला मानसन्मान द्यायचा होता तर कुठल्याही अटीशर्ती न लावता प्रकाश आंबेडकरांनी मागितलेल्या जागा दिल्या असत्या तर लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला असता. पण आता शकुनीमामाने परत एकदा आपली चाल खेळली असून वंचितबरोबर असलेले चर्चेचे सर्व दरवाजे बंद केलेले आहेत," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "अपेक्षेप्रमाणे शकुनीमामाने परत एकदा आपली चाल खेळली आणि यशस्वीही केली आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगत आलेलो आहे की, वंचितबरोबरची युती हा शकुनीमामा होऊ देणार नाही. ते वारंवार अडथळे आणत आहेत. जेव्हा जेव्हा वंचितसोबत युतीची चर्चा करण्याची वेळ आली तेव्हा यांनी त्या चर्चेत कसे अडथळे येतील यावर बारीक लक्ष ठेवले होते. त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांनी उबाठाबरोबरची युती संपल्याचे जाहीर करुन टाकले आहे," असेही ते म्हणाले.