"मविआ"च्या दारातून जानकर परतले; एका दगडात मारले "तीन" पक्षी
25-Mar-2024
Total Views |
मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाच्या (रासप) साथीने लेकीचा बारामती मतदारसंघ सुरक्षित करू पाहणाऱ्या शरद पवारांना देवेंद्र फडणवीस यांनी दणका दिला आहे. 'मविआ'च्या दारातून महादेव जानकर यांना परत आणतानाच, फडणवीस यांनी एका दगडात 'तीन' पक्षी मारले आहेत. त्यामुळे माढा, बारामती आणि परभणी असे तीन लोकसभा मतदारसंघ महायुतीसाठी 'सेफ' झाले आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची मतदारसंख्या मोठी आहे. लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले होते. या निवडणुकीत सुळे यांना ५ लाख २१ हजार ५६२, तर महादेव जानकर यांना ४ लाख ५१ हजार ८४३ मते मिळाली होती. जानकर भाजपाच्या तिकिटावर लढले असते, तर विजय निश्चित होता, असा निष्कर्ष त्यावेळेस काढण्यात आला होता. यंदाच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या लेकीपुढे बंधू अजित पवार यांनी महायुतीच्या माध्यमातून मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे बालेकिल्ल्यात पराभवाची छाया दिसू लागल्याने पवारांनी थेट जानकरांना सोबत घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले. खुद्द जानकर यांना माढ्यातून तिकीट, विधानसभेला राष्ट्रीय समाज पक्षाला किमान ८ जागांचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे जानकरांनीही महाविकास आघाडीसोबत जाण्याचे निश्चित केले होते.
अशावेळी देवेंद्र फडणवीस यांनी चाणक्यनीतीचा अवलंब करीत शरद पवारांना चितपट केले आहे. रविवार, दि. २४ मार्च रोजी वर्षा निवासस्थानी झालेल्या महायुतीच्या बैठकीला जानकर स्वतःहून उपस्थित राहिले. त्यांच्या पक्षाला लोकसभेची एक जागा दिली जाणार आहे. जानकर महायुतीत आल्यामुळे केवळ बारामतीच नव्हे, तर माढा आणि परभणीची जागा सुरक्षित झाली आहे. शिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रासपचा हक्काचा मतदार असल्यामुळे त्याचाही फायदा महायुतीला होणार आहे. उलट बारामती शाबूत राखण्याच्या शरद पवारांच्या प्रयत्नांवर पाणी फिरले असून, पराभवाची छाया आणखी गडद झाली आहे.
यावेळी बोलताना महादेव जानकर म्हणाले की, "मी भाजपवर नाराज होतो, पण आता जागा दिली. त्यामुळे नाराज नाही. एक ते दोन दिवसांत कळेल, मला कुठली जागा देणार. मी माझ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. मी महविकास आघाडीकडे तीन जागा मागितल्या होत्या, पण ते एकच देत होते. भाजपसुद्धा मला एक जागा देत आहे. म्हणून मी महायुतीत सामील झालो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल. त्यामुळे मी नरेंद्र मोदी यांच्यासोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे," असे ते म्हणाले.