नवी दिल्ली: (पार्थ कपोले) अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर संकुलात स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे संकुलामध्ये तृतीयपंथींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. देशात बहुदा प्रथमच धार्मिक संकुलामध्ये अशाप्रकारे प्रथमच तृतीयपंथीयांची काळजी घेण्यात आली आहे.
स्वच्छतागृहांचा मुद्दा आला की सहसा त्यामध्ये पुरुष, महिला, वृद्ध आणि दिव्यांग यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधली जातात. मात्र, ‘सबके राम’ या उद्देशाने स्थापन झालेल्या श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने तृतीयपंथीयांसाठीदेखील स्वच्छतागृहांची उभारणी केली आहे. जेणेकरून श्रीरामललाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या तृतीयपंथीयांना नैसर्गिक विधींसाठी कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मिळणे कठीण असते. त्यातही धार्मिक संकुलांमध्ये अशी व्यवस्था बघावयास मिळत नाही. मात्र, श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टने याबाबतीतही नवा आदर्श घालून दिला आहे.
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीस्थळी भव्य मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा झाली आहे. त्यानंतर जवळपास ७० एकराहून अधिकच्या परिसरामध्ये विविध विकास कामे सुरू आहे. भक्त निवास, भोजनालय, प्रसादालय आणि स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे स्तनदा मातांसाठी आपल्या अपत्यांना स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र आणि स्तनपानगृहेदेखील बांधण्यात आली आहेत.
श्रीरामलला मंदिराच्या पश्चिम दिशेला स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. त्यांचे अतिशय उच्च दर्जाचे आणि आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करून करण्यात येत आहे. सर्वसामान्य व्यक्तींसह दिव्यांग आणि वृद्धांनादेखील ते वापरण्यास अतिशय सुलभ असे आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत तर विमानतळेदेखील मागे पाडतात. त्यामुळे धार्मिक संकुले आणि स्वच्छतागृहे या विषयात श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्ट नवा आदर्श घालून देत आहे.