फडणवीस कमाल करतात!

    22-Mar-2024   
Total Views |
Devendra Fadnavis



”आम्ही दहा वर्षांचा कामाचा आणि तिसर्‍या टर्ममधील पहिल्या १०० दिवसांत होणार्‍या कार्याचाही अहवाल जाहीर करणार आहोत. या सगळ्यामध्ये विरोधी पक्षही नवीन कीर्तिमान स्थापित करत आहेत. आज त्यांनी मोदीला १०४वा अपशब्द वापरला आहे,” असे नरेंद्र मोदी नुकतेच म्हणाले, तर मोदींपुढे अस्तित्वच शून्य असतानाही त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणार्‍यांबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कोण संजय राऊत?” देवेंद्र फडणवीस पण कमाल करतातच बुवा. ज्याच्या शिवराळ शिव्यायुक्त भाषेने पुरोगामी, सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला लाज आणली, त्यांना देवेंद्र ओळखत नाहीत? ‘फ्री काश्मीर’चे नारे देणार्‍या महिलेचे समर्थन करणार्‍या आणि ‘भारत तेरे तुकडे होंगे हजार’ म्हणणार्‍या उमर खालिदची भेट घेणारे ‘ते’ देवेंद्र फडणवीसांना माहिती नाहीत? ‘महाराष्ट्र’, ‘मराठी माणूस’, ‘आमची मुंबई’, ‘मुंबई गुजरातला पळवणार’ वगैरे परवलीचे शब्द वापरण्याचे आणि लोकांसमारे अस्मितेचा खोटा बागुलबुवा उभा करण्याचे काम आजन्म करणार्‍यांना देवेंद्र ओळखत नाहीत? काय म्हणावे, राहुल गांधींसारख्या व्यक्तीला देशाची ‘नई रोशनी’ मानणार्‍या आणि राहुल गांधींना ‘आप आये बहार आये’ म्हणणार्‍या व्यक्तीला, तसेच शरद पवारांसाठी खुर्ची उचलण्याची खुशामत करणार्‍यांना देवेंद्र ओळखत नाहीत? ‘कोथळा’, ‘खंजिर’, ‘मावळे’ या शब्दांचा वापर करूनही जनता हिंग लावून विचारत नाही म्हटल्यावर ‘औरंगजेब, ‘अफजल खान’ वगैरे वगैरेंची नाव घेणार्‍या ’त्यांना’ देवेंद्र ओळखत नाहीत? मात्र, देवेंद्र ज्यांना ओळखत नाहीत, त्या लोकांना माहिती आहे की मोदींचे, संघाचे आणि महाराष्ट्रात देवेंद्रांचे नाव घेतले की, देशातल्या-राज्यातल्या प्रसारमाध्यमांचा झोत आपल्याकडे वळतो. हे तंत्र राहुल ते राऊत, उद्धव ते ममता अगदी स्टॅलिन ते शरद पवार सगळ्यांनाच माहिती आहे. इतकेच काय, तर्कहिनता हेच भांडवल असणार्‍या अंधारे, माने वगैरेंनाही हे तंत्र माहिती आहे. त्यामुळे हे सगळे लोक तिन्ही त्रिकाळ मोदी भाजप आणि संघाची निंदा करत असतात. ‘बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ’ अशी विचित्र मानसिकता असलेले हे लोक. अर्थात, या लोकांना देवेंद्र जरी ओळखत नसले तरीसुद्धा ते सगळे देवेंद्र यांना चांगले ओळखतात. उत्तम संदर्भ म्हणजे ‘एक अकेला देवेंद्र क्या करेगा’ म्हणणार्‍यांना विचारा. काहीही म्हणा देवेंद्र फडणवीस पण कमाल करतात बुवा!


...अन् मुखवटे गळून पडले!


कोण कशाचा कीर्तिमान स्थापित करेल, याचा काही नेम नाही. कुणी कर्तृत्वाचा कीर्तिमान स्थापित करते, तर कुणी जनता रडो, मरो, काहीही करो, पण या सगळ्यात घरी बसून टोमणे मारण्याचा कीर्तिमान स्थापन करतो. तर काही असेही महाभाग असतात, जे वाचाळता, शिवराळता आणि कुचकट भाषणांमधून कीर्तिमान स्थापन करतात. पण, या वर्षी सगळ्यात मोठा कीर्तिमान जर कुणी स्थापन केला असेल, तर तो दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी. भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत म्हणून सत्ता काबीज करणार्‍या अरविंद केजरीवाल यांचे मत्रिमंडळ आणि ते स्वतः भ्रष्टाचाराच्या गर्तेत आकंठ बुडाले आहेत. केजरीवाल म्हटले की, अहाहा काय ती छबी. काय ते मफलर, काय ते खोकणे आणि काय ते ‘आम आदमी’ म्हणून दिसण्याची धडपड. पण, आम आदमी म्हणत म्हणत केजरीवाल तर एकदम ‘ईडी’चे अत्यंत आवडते पात्र बनले. केजरीवाल ज्यांचे बोट धरून सामाजिक- राजकीय आखाड्यात यशस्वी झाले ते अण्णा हजारे. अण्णा हजारेसोंबत तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी दारू आणि भ्रष्टाचारविरोधात आंदोलन केली होती. त्यातूनच अरविंद केजरीवाल राजकीय नेता म्हणून प्रस्थापित झाले. पण, आज त्याच केजरीवालांना दारू घोटाळ्यात अटक व्हावी? इथे एक नमूद करायला हवे की, सगळे विरोधीपक्ष नेते मग ते शरद पवार असोत की राहुल गांधी की आणखी कोणी, सगळे जण म्हणतात की, भाजप विरोधी पक्षातील नेत्यांवर ‘ईडी’द्वारे कारवाई करते. पण, अरविंद केजरीवाल यांच्या दारूकांडाबद्दल सर्वप्रथम दिल्ली पोलीस प्रशासनाला माहिती दिली ती काँग्रेस नेता अजय माकन यांनी. पुढे पोलिसांना त्यात काही बाबी समोर आल्या आणि त्यातूनच ‘ईडी’ने केजरीवाल यांची चौकशी सुरू केली. आपली आवड आहे म्हणून पुरावे नसताना ‘ईडी’ काय आणि कोणतीही सरकारी यंत्रणा कुणावरही कारवाई करू शकत नाही. देशात भ्रष्टाचार्‍यांविरोधात कारवाई होत आहे. केजरीवाल यांच्याबाबत विशेष हेच की, भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ असलेला, सामान्य माणूस म्हणून त्यांनी स्वतःची प्रतिमा लोकांसमोर रंगवली. पण, अखेरीस त्यांचे पितळ उघडे पडले. मोदींच्या राज्यात लोकांना मूर्ख बनवून स्वार्थ साधणार्‍यांचे मुखवटे गळून पडले आहेत.

९५९४९६९६३८


योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.