पुणे मनपा शाळा, पुणे विद्यार्थी गृह आणि अभिनव कला महाविद्यालय असा प्रकाश ढगे यांचा शैक्षणिक प्रवास. निसर्गाशी घट्ट मैत्री टिकवणार्या प्रकाश यांची एकूणच वाटचाल प्रेरक आणि उत्सावर्धक आहे.
झाडे लावणारी माणसे जगात लाखोंनी सापडतील. मात्र, झाडे लावून ती जगवणारी आणि ती जगविण्यासाठी इतरांना प्रेरित करणारे विरळेच. प्रकाश ढगे हे त्यांपैकीच एक. आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेली पुण्यभूमी सतत आल्हाददायक ठेवण्यात खारीचा वाटा उचलणारे प्रकाश. इमारतींची जंगले उभी राहण्याच्या आजच्या काळात त्यांची कामगिरी ही नक्कीच उजवी आणि इतिहास घडविणारी ठरावी.उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. २०२३ हे वर्ष आजवरचे उष्ण वर्ष ठरल्याचेही नुकतेच जाहीर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर वृक्षलागवड हे वरदानच. त्यामुळे वृक्षलागवडीच्या या मोहिमेत सक्रिय सहभागी असलेले प्रकाश ढगे हे किती महत्त्वाचे कार्य करीत आहेत, हे आपण सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे. तसेच त्यांच्या या कार्यात सहभागी होतानाच, ते कार्य चिरंतन टिकविण्यासाठी प्रयत्न करणेही तितकेच आवश्यक.
’वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे।’ या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगानुरूप तसेच ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या भगवान श्रीकृष्णांच्या आदेशाचे पालन करीत, वृक्षारोपण व संगोपनाचे कार्य सुरू केल्याचे प्रकाश सांगतात. दि. १७ नोव्हेंबर २०१३ या दिवशी सुरू केलेले त्यांचे हे कार्य अविरत सुरू आहे. याची साक्ष देण्यासाठी, समाजमाध्यमावरील त्यांचे ’वृक्षवल्ली मुठा पुणे’ हे फेसबुक पेज सक्रिय आहे. या पेजवर ते वृक्षरोपणासंबंधी व्हिडिओ नियमितपणे अपलोड करुन पुणेकरांना या हरितकार्यासाठी प्रेरित करीत असतात.आपल्या जगण्याला खर्या अर्थाने वृक्ष परिपूर्ण करतात, असे त्यांचे म्हणणे. वृक्षांकडून माणसालाही जीवन कसे जगावे, याची प्रेरणा मिळत असते. वृक्षांचे संपूर्ण जीवनच फक्त इतरांसाठी समर्पित असते. हा परोपकारी संदेश वृक्षांकडून घेऊन, त्यांची सेवा करण्याची प्रेरणा आपणास मिळाली आणि वृक्षसेवा म्हणजे साक्षात परमेश्वरसेवा समजून हे कार्य करीत असल्याचे प्रकाश ढगे सांगतात.
सुरुवातीला लावलेल्या वृक्षांना पाणी घालणे व त्यांचे संवर्धन करणे यांपासून कार्याची सुरुवात त्यांनी केली. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे पाईप, चादली, ड्रम व बागकामाची हत्यारे त्यांनी विकत घेतली. रोज पहाटे ५ वाजता उठून, हे काम ते आजही अविरतपणे करीत आहेत. पाणी घालता-घालता आपणही नवे झाड लावावे, असे वाटू लागल्यावर, त्यांनी पुणे महानगरपालिकेतील संबंधित विभागाशी संपर्क साधला. त्या ठिकाणी छारे, तुम्माले, आटोळे या अधिकार्यांनी सहकार्य केले. प्रकाश यांची ही कल्पना आवडल्याने, या अधिकार्यांनीही मग त्यांच्या या कार्यासाठी सर्वतोपरी मदत प्रोत्साहन दिले.सुरुवातीला एक मोहालीचे रोप आणून, ढगे यांच्या गुरुवार पेठेतील घरासमोर त्यांनी पहिले झाड लावले. पहिल्या झाडापासून सुरू झालेला, हा प्रवास आजतागायत ५७३ झाडे लावण्यापर्यंत पोहोचला आहे. यात आणखी एक विशेष बाब म्हणजे, ढगे यांनी लावलेली ३०० हून अधिक झाडे जगली आहेत. त्या झाडांना नित्यनेमाने पाणी देऊन, त्यांचे संगोपन केले जाते. आपल्या घरासारखाच आपला परिसर, आपले शहर व आपला देश सुंदर व्हावा, ही त्यांची भावना. त्यामुळे सुंदर सौंदर्याची कल्पना वृक्षाशिवाय होऊच शकत नाही, हे प्रकाश यांनी इतरांना देखील पटवून दिलेे आहे. हे कार्य करताना त्यांना अनेक अडचणी, आव्हाने आणि त्रासांचा देखील सामना करावा लागला. जसे की, लावलेले झाड उपटून टाकणे, जाळणे, आसपास मुद्दाम कचरा टाकणे, झाडाभोवतीची जाळी (लोखंडी) काढून नेणे वगैरे.
मात्र, तरीही प्रकाश यांनी हार मानली नाही. अशा वाईट अनुभवांबरोबरच काही ठिकाणी सुखद अनुभव आल्याचेही प्रकाश आवर्जून नमूद करतात. लोक स्वतःहून झाडांना पाणी घालतात, त्यांची काळजी घेतात. आजच्या धावपळीच्या जीवनात हे खूप आश्वासक म्हणावे लागेल.प्रकाश यांना वाटते की, “आपण परमेश्वराने सांगितलेली नि:स्वार्थ सेवा कोणत्या ना कोणत्या रुपात करायला हवी, तरच हे जग सुंदर होईल,“ ही त्यांची भावना खूप काही सांगून जाते.पुण्याच्या गुरुवार पेठेतील त्यांच्या घरापासून ते शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव लक्ष्मी रस्ता, प्रभात रस्ता, सातारा रस्ता, शंकरशेठ रस्ता, डेक्कन नदीपात्र, मार्केटयार्ड, लोकमान्य नगर, टिळक रस्ता, गंगाधाम चौक अशा विविध भागांत प्रकाश यांचा हा वृक्षसोहळा इतरांना सावलीचा आधार देत आहे. या वृक्षसेवेत ढगे यांना त्यांचे परिवारातील सदस्य, मित्रमंडळी, कार्यालयातील सहकारी आणि पुणे मनपातील उद्यान विभागाचे बहुमोल सहकार्य लाभल्याबद्दल, ते त्यांच्याप्रति ऋणदेखील व्यक्त करतात. ही सेवा करत असताना त्यांना ’महाराष्ट्र मिलिटरी फाऊंडेशन’, ‘ज्ञानयोग सेवा ट्रस्ट’, ‘ब्रह्मांड संस्थान’, ‘हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थे’च्या ’प्रकृती वंदना पुरस्कार’, ‘रमा-माधव रानडे स्मृती पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. ’इएडढ ढकखछॠड थए ऊज खछ ङखऋए, थए ऊज ऋजठ जढकएठड’ ही त्यांची भावना खूप बोलकी आणि वृक्षांसारखी टवटवीत. त्यांच्या या कार्यास दै. ’मुंबई तरुण भारत’कडून खूप शुभेच्छा!
अतुल तांदळीकर
(अधिक माहितीसाठी संपर्कः ९५२७२४६०५८)