जयंत पाटलांचं सूचक विधान, म्हणाले, "निलेश लंके १०० टक्के..."
20-Mar-2024
Total Views |
मुंबई : निलेश लंके उभे राहिलेत तर ते १०० टक्के निवडून येतील असं सूचक विधान राष्ट्रवादी कांग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केले आहे. तसेच दक्षिण नगर लोकसभेत तुतारी वाजणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाचे नेते निलेश लंके हे शरद पवारांकडे जाण्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यांच्याबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "निलेश लंके फार लोकप्रिय आहेत आणि ते उभे राहिलेत तर ते १०० टक्के निवडून येतील. त्यामुळे निलेश लंके आमचे उमेदवार राहावेत असं आमचं मत असून याबाबत आम्ही आवश्यक ते सोपस्कार पूर्ण करु."
ते पुढे म्हणाले की, "निलेश लंकेंना मीच तुतारी भेट दिली होती. त्यांनी ती हातात धरलेली मी बघितली. परंतू, लंकेंना कोणतीही तांत्रिक अडचण तयार करण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे त्यांनी ती स्विकारली की, नाही यावर मी भाष्य करु इच्छित नाही. आम्ही योग्यवेळी आमचा निर्णय कळवू. दक्षिण नगर लोकसभेत तुतारी वाजवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही," असेही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, बुधवारी अजित पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे आणि दिवंगत विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे यादेखील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ज्योती मेटे यांना महाविकास आघाडीकडून बीड लोकसभेची उमेदवारी देण्याबाबतच्या चर्चा सुरु आहेत.