वर्हाडातल्या खामगाव तालुक्यातील शेगाव हे एक गाव. आता शेगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे. गाव लहान, पण त्याचे भाग्य महान! म्हणून या गावात श्रीगजानन महाराज प्रगट झाले. शेगाव वैदर्भीय आणि आता अखिल जगातील भक्तांचे हक्काचे श्रद्धा आणि विश्रांती स्थान. मंगलकार्य असो किंवा प्रसंगी कुठलीही आनंदाची बातमी असो, शेगावच्या गजानन महाराजांना कधी जाऊन सांगतो, इतकी महाराजांच्या दर्शनाची आतुरता प्रत्येकाच्या देहबोलीत कायमच जाणवते. शनिवार-रविवार आणि लागून सुट्ट्या आल्या की, सहज गाडी वळते, ती थेट शेगावलाच! प्रसंगी संकल्प, अनुष्ठान त्याची सांगता हेही सारे मनात असतेच.
स्वच्छता, सुंदर रमणीय परिसर आणि शांतता या सार्या गोष्टींसाठी शेगाव आज विश्वपटलावर स्थान मिळवण्यासाठी अग्रेसर आहेच. आज संपूर्ण महाराष्ट्र प्रसंगी देश-विदेशातील मंडळीसुद्धा महाराजांच्या दर्शनासाठी येतात आणि मनःशांतीची, अनुभवांची शिदोरी घेत माघारी परतण्याचा प्रवास करतात. याच संतश्रेष्ठ श्रीगजानन महाराजांच्या ‘विजय’ ग्रंथात त्यांच्या प्रागट्याबद्दल पहिल्या अध्यायात दासगणू महाराजांनी विलक्षण लिहिलेले आहे. दासगणू महाराज लिहितात की,
त्या शेगाव सरोवरी भले। गजानन कमल उदया आले।
जे सौरभे वेधिते झाले। या अखिल ब्रह्मांडा॥
हा शेगाव खाणीचा। हिरा गजानन होय साचा।
प्रभाव त्या अवलियाचा। अल्पमतीने वानितो मी॥
ते आता अवधारा। गजाननचरणी प्रेम धरा।
येणे तुमचा उद्धार खरा। होईल हे विसरू नका॥
पंढरपूरला श्रीदासगणू महाराज असताना, एका कार्तिकीच्या वारीला शेगावच्या रामचंद्र पाटलांनी त्यांना गजानन महाराजांचं पद्यमय चरित्र लिहावं म्हणून विनंती केली. ही प्रेरणा त्यांना श्रीमहाराजांनीच दिली, असा भाव व्यक्त करून, दासगणू महाराज लिहितात की,
खर्या संताचे धोरण। न कळे कोणालागोन।
महापुरुष गजानन। आधुनिक संत चूडामणी॥
श्रीगजानन महाराज प्रकट झाले, त्या आधीच्या इतिहासाचा आजही काहीही पत्ता नाही. म्हणूनच विजय ग्रंथात ओवी येते की,ठ
जो का हिरा तेजमान। पूर्णपणे असे जाण।
तेज त्याचे पाहोन। ज्ञाते तल्लीन होती की॥
तेथे त्या हिर्याची। खाण आहे कोणची॥
हे विचारी आणण्याची गरज मुळी रहात नसे॥
पुढे संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या प्रागट्याविषयी दासगणू महाराज लिहितात की,
ऐन तरुण्याभीतरी। गजानन आले शेगावनगरी।
शके अठराशेभीतरी। माघ वद्य सप्तमीला॥
आज माघ वद्य सप्तमी, अर्थात श्रीगजानन महाराजांचा प्रगट दिवस. ज्यादिवशी महाराज प्रगट झाले, तो दिवस होता, शनिवार माघ वद्य सप्तमी शके १८०० म्हणजे दि. २३ फेब्रुवारी १८७८. लोकांची अशी एक धारणा आहे की, सज्जनगडावरून समर्थ रामदासस्वामीच श्रीगजानन महाराजांच्या रुपाने अवतार धारण करून लोकोद्धारासाठी आले. महाराजांच्या जीवनप्रसंगांमध्ये त्यांनी भक्ताला समर्थरुपात दर्शन दिल्याचा प्रसंगही आहेच. असे श्रीगजानन महाराज फार उच्चपदाला पोहोचलेले विदर्भातील प्रमुख संत होते.देविदास पातूरकर हे शेगावमधील एक भाविक सज्जन आणि धर्मसंस्कारांचं पालन करणारे गृहस्थ होते. त्यांच्या मुलाचं लग्न होऊन घरात आलेल्या सुनेचा ऋतुशांती संस्काराचा कार्यक्रम होता. पूर्वी लहान वयातच लग्नं होत आणि मुलगी वयात आली की, हा संस्कार केला जाई. या संस्काराचा धार्मिक विधी होऊन नंतर भोजने झाली. त्याच्या उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकलेल्या होत्या. त्याच ठिकाणी गजानन महाराज सर्वप्रथम दृष्टीस पडले.
तो गजानन समर्थसिद्धयोगी। बसले होते तया जागी।
एक बंडी होती अंगी। जुन्या पुराण्या कापडाची॥
कोणतीही उपाधी नाही, पाणी पिण्यासाठी पात्र म्हणून एक भोपळा आणि हातात कच्च्या मातीची एक चिलीम, एवढ्या दोन वस्तूच त्यांच्याजवळ असलेल्या दिसत होत्या.
नासाग्र दृष्टि मुद्रा शांत। तपोबल अंगी झळकत ॥
प्राचीच्या बालरवीवत्। वर्णन किती करावे ॥
पूर्वेला नुकत्याच उगवलेल्या सूर्यासारखी तेजोमय पण दाहक अशी गजानन महाराजांची मूर्ती दिसत होती.
ती समर्थाची स्वारी। बैसोनिया रस्त्यावरी।
शोधन पत्रावळींचे करी। केवळ निजलीलेने॥
शीत पडल्या दृष्टिप्रत। ते मुखी उचलुनी घालीत।
हे करण्या हाच हेत। ’अन्नपरब्रह्म’ कळवावया॥
बंकटलाल अगरवाल हे आपला स्नेही दामोदरपंत कुलकर्णी यांच्यासह त्याच रस्त्याने चालले होते. एक व्यक्ती रस्त्यावर टाकलेल्या पत्रावळीवरची शितं वेचून मुखात घालत आहे, हे त्या दोघांनी पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. ते एकमेकांत बोलू लागले की, याचं वागणं विलक्षण दिसत आहे. पण, हा याचक नाही. कारण, हा जर अन्नार्थी, म्हणजे अन्न हवं असलेला असता, तर यानं पान मागून घेतलं असतं आणि सज्जन अशा देविदासानेही याला दारी आलेल्या याचकाला विन्मुख पाठवणार नाही, याची त्यांना खात्री होती. श्रीगजानन महाराज पत्रावळीवरची शित उचलून मुखी घालत होते आणि याच पहिल्या अध्यायावरून आपल्याला अन्नाचं महत्व समजून येते.
’जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म’ हे समर्थांनी शब्दांतून शिकवलं आहे, तेच या प्रसंगी महाराज नि:शब्द कृतीतून शिकवीत आहेत. माणसं कुठेही आणि कुणाकडेही जेवायला-खायला गेली की, तिथल्या अन्नपदार्थांबद्दल बोलत असतात. ’अन्नम् न निंद्यात्।’ अशी उपनिषदांची शिकवण आहे. त्यानुसार समर्थांचे आणि महाराजांचे स्मरण करून पाळावे की, मी अन्नाची निंदा करणार नाही आणि त्याची हेळसांड करणार नाही. मग ते अन्न आपण कोठेही ग्रहण करीत असलो, तरी किमान पहिला घास ईश्वर स्मरण करूनच घ्यावा. अन्नाकडे उपभोग भावनेने पाहू नये, प्रसाद भावनेने ते ग्रहण करावं, हाच विचार श्रीगजानन महाराज पहिल्या अध्यायात देत आहेत.
आपल्यापैकी कित्येक जण ‘गजानन विजय’ ग्रंथाचे पारायण करतात; पण आज त्या पारायणाच्या माध्यमातून महाराजांचा एक तरी विचार आचरण्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात यशस्वी होण्याची हीच योग्य वेळ आहे. श्रीगजानन महाराज यांच्या संपूर्ण जीवन चरित्रातील घटना, प्रसंगी लहान कृती आपल्याला खूप काही शिकवत आहे. खरंतर श्रीगजानन महाराज म्हणजे विलक्षण कृपामूर्तीचे धनी आहे. ‘सर्वे भवन्तु सुखिनः शिवभावें जीवसेवा’ या व्रतांचा अंगीकार करून, श्रीगजानन महाराज तुम्हा-आम्हा सर्वांना ते आचरणात आणण्यासाठी सुख, शांती, समृद्धी व निरामय आरोग्य प्रदान करो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.
जय गजानन!!!
सर्वेश फडणवीस