नवी दिल्ली : केरळमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) भाजपला मदत करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केला आहे. तर, शशी थरूर यांच्यासारख्या शिकलेल्या व्यक्तीकडून अशी अपेक्षा नसल्याचा पलटवार भाकप महासचिव डी. राजा यांनी केला आहे.
तिरुअनंतपुरमचे विद्यमान खासदार शशी थरूर हे चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. एकीकडे ते पुन्हा एकदा निवडून येण्याचा दावा करत आहे, त्याचवेळी डाव्या पक्षांवर टिकादेखील ते करत आहेत. त्यांनी मंगळवारी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर डाव्या पक्षांना लक्ष्य केले. ते म्हणाले, एकीकडे वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्या उमेदवारीबद्दल भाकप तक्रारीचा सूर लावत आहे. त्याचवेळी तिरुअनंतरपुरम येथे भाजपविरोधी मतांचे विभाजन घडवून आणून ते भाजपलाच मदत करत आहेत. एवढे असतानाही वायनाडमध्ये मात्र आघाडीधर्म पाळण्याचा सल्ला भाकपने देणे हे हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
थरूर यांच्या या टिकेस भाकपचे सरचिटणीस डी. राजा यांनी संतप्त प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, थरूर यांचे ते विधान अतिशय मूर्खपणाचे आहे. थरूर यांच्यासारख्या शिक्षित व्यक्तीने केरळचा इतिहास समजून घ्यावा. राहुल गांधी जर भाजपला विरोध करत आहेत, तर त्यांनी वायनाडमधून डाव्या आघाडीविरोधात निवडणूक लढण्याची गरज नव्हती. देशात केवळ डावे पक्षच जातीयवादी आणि फॅसिस्ट शक्तींशी लढत आहेत. त्यामुळे काँग्रेसने प्रथम आपला शत्रू कोण हे ओळखावे, असाही टोला राजा यांनी लगावला आहे. दरम्यान, वायनाडमधून राहुल गांधी यांच्याविरोधात डाव्या पक्षाने डी. राजा यांच्या पत्नी अॅनी राजा यांना उमेदवारी दिली आहे.
काँग्रेस आणि डाव्यांच्या भांडणात भाजपला लाभ?
केरळमधील तिरुअनंतपुरम मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. तेथे शशी थरूर हे गेल्या १५ वर्षांपासून खासदार आहेत. यावेळी भाजपने त्यांच्याविरोधात केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांना उमेदवारी दिली आहे. केरळमध्ये यश मिळविण्यासाठी भाजप अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. मात्र, तेथे डाव्या पक्षांचे वर्चस्व भेदणे अद्यापही भाजपला जमलेले नाही. मात्र, यंदा तिरुअनंतपुरमधून खासदार निवडून आणण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. त्यासाठी काँग्रेस आणि भाकपच भाजपला मदत तर करत नाहीत ना, असे चित्र ताज्या वादामुळे निर्माण झाले आहे.