कराड : डोळेही न उघडलेल्या ‘त्या’ पिल्लांची आईसोबत ताटातुट
वनविभागाने केले यशस्वी पुनर्मिलन
19-Mar-2024
Total Views |
कराड येथील हिंगनोळे गावातील उसाच्या शेतामध्ये बिबट्याची (leopard) दोन नवजात पिल्ले आढळून आली. डोळे ही न उघडलेल्या या पिल्लांचे मादी बिबट्यासोबत (leopard) यशस्वी पुनर्मिलन घडवुन आणले.
मुंबई (विशेष प्रतिनिधी): कराडमधील हिंगनोळे गावातील स्थानिक शेतकरी विद्या माने यांच्या उसाच्या शेतामध्ये उसतोड सुरू असताना बिबट्याची (leopard) दोन पिल्ले आढळली. सोमवार दि. १८ मार्च रोजी शेतात उसतोड चालू असताना दुपारी १ च्या सुमारास ही पिल्ले उसाच्या सरीत सापडली. सापडलेली पिल्ले अगदी नवजात असून त्यांचे डोळेही उघडलेले नव्हते.
ही माहिती वनपाल सागर कुंभार यांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत ही पिल्ले ताब्यात घेतली. मादी बिबट्या जवळपासच असल्याची चाहूल घेत वनविभाग आणि वाईल्डलाईफ रेस्क्युअर्स कराडच्या टीमने वनअधिकारी तुषार नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्मिलनासाठी तयारी केली.
दोन्ही पिल्ले सापडलेल्या ठिकाणावरच क्रेटमध्ये संध्याकाळी ५:३० वाजता ठेवण्यात आली. तसेच, याठिकाणी निरीक्षण करण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले. संध्याकाळी ७:३० वाजता मादी बिबट येऊन आपल्या एका पिल्लाला घेऊन गेली. तसेच, त्याला सुखरुप ठिकाणी ठेवल्यानंतर पुन्हा दुसऱ्या पिल्लालाही रात्री ८:२० च्या दरम्यान घेऊन गेली. अशाप्रकारे दोन्ही पिल्लांचे मादी सोबत पुनर्मिलन घडवून आणण्यात वनविभाग आणि वाईल्ड रेस्क्युअर्स टीम कराड यांना यश मिळाले.
या कार्यवाहीमध्ये वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनक्षेत्रपाल सुजाता विरकर, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्यासह वनपाल सागर कुंभार, वनरक्षक सचिन खंडागळे, मेजर अरविंद जाधव, वनसेवक शंभूराज माने सहभागी होते. तसेच, वाईल्डलाईफ रेस्कूअर्स कराडचे अजय महाडीक, गणेश काळे, रोहित कुलकर्णी, रोहित पवार, अनिल कोळी, सचिन मोहिते उपस्थित होते.