वाघ-बिबट्यांसारख्या मांसभक्षी प्राण्यांचा यादीत असणार्या कोळसुंद्याचे कोकणातील वाढते दर्शन हा सध्या चर्चेचा विषय आहे (wild dog in konkan). कोळसुंद्याचे कोकणातील विस्तारणारे अधिवास क्षेत्र आणि शेतीसाठी नुकसानदायी ठरणार्या तृणभक्षी प्राण्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याचा होणारा फायदा, याविषयावर आधारित लेख. (wild dog in konkan)
मुंबई (अक्षय मांडवकर) - कोकणातील गावांमध्ये दबक्या पावलांनी फिरणारे कोळसुंद्याचे कळप सध्या दृष्टिपथात येऊ लागले आहेत (wild dog in konkan). कोळसुंदे म्हणजे रानकुत्रा. रानकुत्रा, कोळशिंदे, कोळसुंदे, कोळीसनं, कोळसून, सोनकुत्रा, देवाचा कुत्रा आणि अशा बर्याचशा स्थानिक नावांनी ओळखला जाणारा, कळपाने राहणारा हा मांसभक्षी जंगली कुत्रा. सह्याद्रीच्या घनदाट अरण्यामध्ये वावरणार्या रानकुत्र्यांचे आता कोकणातील गावागावांमध्ये होणारे दर्शन गजालीचा विषय बनत आहेत. यापूर्वी सह्याद्रीच्या पायथ्याला वसलेली कोकणातील गावे या गजालीच्या केंद्रस्थानी होती. मात्र, आता अगदी किनारपट्टीलगतच्या गावांमध्येदेखील रानकुत्र्यांविषयीच्या गप्पा ऐकायला मिळतात. कोकणातील काही गावांना आता बिबट्यासह रानकुत्र्यांच्या कळपांचादेखील पहारा आहे. कोकणात शेतीला नुकसानदायी ठरणार्या तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढत आहे. याच वाढत्या संख्येवर नैसर्गिकरित्या नियंत्रण ठेवण्यासाठी रानकुत्र्यांची संख्यादेखील वाढणे आवश्यक असल्याचे मत वन्यजीव संशोधक मंडळी मांडत आहेत. (wild dog in konkan)
गेल्या दहा वर्षांमध्ये सह्याद्रीतील संरक्षित वनक्षेत्रामधील रानकुत्र्यांच्या अधिवासाच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे अभ्यासाअंती समोर आले आहे. वन विभाग आणि ’वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’ने (डब्ल्यूसीटी) सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्गातील रानकुत्र्यांच्या अधिवास क्षेत्राचा अभ्यास केला. या अभ्यासामध्ये वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांना कर्नाटकातील पश्चिम घाटाच्या भागांमध्ये रानकुत्र्यांचे अधिवास क्षेत्र कमी झाल्याचे निदर्शनास आले. उलटपक्षी महाराष्ट्रात रानकुत्र्यांच्या अधिवास क्षेत्राचा विस्तार झालेला दिसला. महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ते तिलारीपर्यंत रानकुत्र्यांच्या अधिवासाचा विस्तार 2010-11 साली 65 टक्के होता. ज्यामध्ये 2019-20 साली वाढ होऊन ही टक्केवारी 81 टक्क्यांवर गेली, अशा पद्धतीने संरक्षित वनक्षेत्राबरोबरच रानकुत्र्यांच्या अधिवासाचा विस्तार हा सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्येदेखील वाढत गेलेला दिसतो.
सह्याद्री पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये रानकुत्र्यांचे अस्तित्व हे पूर्वीपासूनच आहे. त्यामुळे इथल्या शिकार्यांमध्ये या प्राण्याविषयी बरेच समज आहेत. हे प्राणी आपले मूत्र शेपटीच्या साहाय्याने भक्ष्याच्या डोळ्यात उडवून त्यांना आंधळ करतात, असा गैरसमज कोकणातील काही गावांमधील शिकार्यांमध्ये आजही रूढ आहे. अर्थात असेच गैरसमज आणि भीतीमुळे शिकारी आणि स्थानिकांच्या मनात रानकुत्र्यांबद्दल भीतीयुक्त आदराची भावना असल्याचे दिसून येते. तळकोकणातील दोडामार्ग तालुक्यातील काही गावांमध्ये, तर रानकुत्र्यांना देवाचे कुत्रे मानले जाते. पूर्वी या रानकुत्र्यांनी सांबर आणि रानडुक्करांची केलेली शिकार हा देवाचा आशीर्वाद मानला जाई. ही शिकार गावात आणून तिचे न्हावण केले जायचे. म्हणजेच ती शिकार घरोघरी वाटून, ती शिजवून खाली जात असे. बदलत्या काळानुसार आता ही प्रथा गावकरी पाळत नाहीत. रानकुत्र्यांचे अस्तित्व स्वीकारणार्या गावांपेक्षा उलट परिस्थिती हे प्राणी प्रथमच दिसणार्या गावांमध्ये आहे. पहिल्यांदाच हा प्राणी पाहणार्या गावांमध्ये सध्या तरी या प्राण्याविषयी कुतूहलाचे वातावरण दिसते.
संगमेश्वर तालुक्यातील श्रुंगारपूरसारख्या सह्याद्रीच्या पायथ्याला वसलेल्या गावांमध्ये पूर्वीपासूनच रानकुत्र्यांचे अस्तित्व आहे. मात्र, गेल्या काही वर्षात देवरुख आणि त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये रानकुत्र्यांनी निर्माण केलेला कायमस्वरूपी अधिवास हा अभ्यासाचा विषय बनला आहे. देवरुखमधील डॉ. शार्दुल केळकर यांना 2020 साली साखरपा-लांजा रस्त्यावर रस्ते अपघतात मृत पावलेला रानकुत्रा आढळून आला. त्याआधारे केळकर आणि वन्यजीव अभ्यासक प्रतीक मोरे यांनी या परिसरात ’कॅमेरा ट्रॅप’ लावून रानकुत्र्यांच्या हालचालींवर नजर ठेवली. या निरीक्षणाअंती आंबव, गोठणे पुनर्वसन, कुंडी, मुरादपुर या देवरुखनजीकच्या गावांमध्ये त्यांना रानकुत्र्यांची छायाचित्रे मिळाली. शिवाय कोसुंब, कोळंबे, डिंगणी, राई भातगाव या गावांमध्ये रानकुत्र्यांचे कळप उन्हाळ्यातील काही दिवसांसाठी आढळून येत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. महत्त्वाचे म्हणजे त्यांना देवरुख आणि त्याच्या आसपासच्या भागात प्रौढ रानकुत्र्यांसोबत त्यांची पिल्लेदेखील आढळली. त्यामुळे रानकुत्रे या भागात प्रजनन करत असल्याचे अधोरेखित होते. सध्या संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणी गावात रानकुत्र्यांचे सांबरांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढले असून याकडे वन विभाग लक्ष ठेवून आहे.
“शेतीनजीकच्या भागातील तृणभक्षी प्राण्यांची संख्या नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी रानकुत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण, रानकुत्रा हा शिकार करून जगणारा प्राणी आहे. हा प्राणी कळपाने राहत असल्याने दर आठवड्याला त्याला शिकार करावी लागते. अशा परिस्थितीत शेतीनजीकच्या क्षेत्रात त्यांची संख्या वाढल्यास तृणभक्षी प्राण्यांची संख्या नियंत्रित राहू शकते. रानकुत्र्यांचा कोकणात विस्तारणार्या अधिवास क्षेत्राचा मुद्दा लक्षात घेता, या बदलत्या परिस्थितीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.” - गिरीश पंजाबी, वन्यजीव संशोधक, डब्ल्यूसीटी
गुहागर तालुक्यातही रानकुत्र्यांचा वावर गेल्या काही वर्षांपासूनच निदर्शनास येत आहे. 2020 साली वडद येथे नीरज सोमण यांना सर्वप्रथम रानकुत्र्यांच्या कळपाचे दर्शन झाले. रानडुकराची शिकार करत असताना हा कळप त्यांच्या नजरेस पडला. त्यानंतर 2021 साली गुहागर समुद्र किनार्यापासून अगदी एक किलोमीटरच्या परिसरात वन्यजीव निरीक्षक अक्षय खरे यांनी रानकुत्र्यांचे छायाचित्र टिपले. सद्यःपरिस्थितीत तालुक्यातील आरे, नरवण, निर्व्हाळ या गावांमधून रानकुत्र्यांच्या नोंदी आहेत. रानकुत्र्यांच्या अधिवासाचा अनुषंगाने सह्याद्रीच्या उत्तर भागाचा विचार केल्यास याठिकाणी वन्यजीव अभ्यासक अनिश परदेशी हे अभ्यास करत आहेत. परदेशी यांनीच फणसाड वन्यजीव अभयारण्यातून रानकुत्र्यांच्या अस्तित्वाची पहिली नोंद केली होती. परदेशी यांना पुण्यातील वेल्हे, पानशेत, राजगड, दिपदरा याभागात रानकुत्र्यांच्या नोंदी आढळल्या आहेत. त्यांनी या भागातील रानकुत्र्यांच्या हालचालींचा अभ्यास केला आहे. शेवत्या घाट परिसरातील रानकुत्र्यांचे कळप हे उन्हाळ्यात घाटमाथा उतरून खाली कोकणात जात असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे.
“नर सांबर पूर्ण वाढ झालेली आपली शिंग गळून पडावीत म्हणून उन्हाळ्याच्या सुरुवातीस ती आंबा-काजूच्या झाडावर घासतो. या प्रक्रियेमुळे झाड हलते आणि त्याला आलेला मोहर गळून पडतो. शिवाय खोड झिजल्याने कधीकधी झाड उन्मळून देखील पडते. अशा परिस्थितीत बागायती क्षेत्रांच्या आसपास अधिवास करणार्या सांबराच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे काम रानकुत्रे करतात. देवरुखमधील आमच्या निरीक्षणामध्ये दिसून आले आहे की, याठिकाणी रानकुत्र्यांचे प्रमुख भक्ष हे सांबर आहेत. देवरुख आणि आसपासच्या गावांमधील रानकुत्र्यांची वाढती संख्या पाहता, याठिकाणी त्यांचे स्थलांतर आणि भ्रमणमार्गावर अभ्यास करणे आवश्यक आहे”. - प्रतीक मोरे, वन्यजीव निरीक्षक, देवरुख
सह्याद्रीमध्ये रानकुत्र्यांचे प्रमुख अन्न सांबर, भेकर यांसारखे हरीण कुळातील प्राणी आहेत. याशिवाय ससे आणि रानडुक्करांसारख्या प्राण्यांचीदेखील ते शिकार करतात. तसेच गायी, म्हशींचीदेखील शिकार करत असल्याच्या नोंदी काही गावांमधूनआहेत. सद्यःपरिस्थितीत रानडुक्कर आणि सांबर या प्राण्यांमुळे कोकणातील शेतकरी आणि बागायतदार हवालदिल झाले आहेत. रानडुकरांकडून शेतीचे आणि सांबराकडून आंबा-काजूसारख्या बागायती पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. गाव आणि शेतीनजीक या तृणभक्षी प्राण्यांची संख्यादेखील वाढलेली आहे, अशा परिस्थितीत या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम हे रानकुत्रे करत आहेत. त्यामुळे शेती आणि पिकांची नासाडी टाळायची असेल, तर संरक्षित वनक्षेत्राबाहेर फिरणार्या रानकुत्र्यांच्या कळपांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे.
“गुहागरमधील रानकुत्र्यांचा वावर हा साधारण ‘लॉकडाऊन’नंतर वाढलेला दिसतो. गुहागर गावात आम्ही पहिल्यांदाच रानकुत्रे पाहिले आहेत. इथल्या जुन्याजाणत्या शिकार्यांना आम्ही रानकुत्र्यांची टिपलेली छायाचित्र दाखवल्यावर, त्यांनीदेखील हा प्राणी पहिल्यांदाच पाहत असल्याचे सांगितले. या भागात यापूर्वी सांबरदेखील नव्हते. त्यामुळे ‘लॉकडाऊन’मध्ये सांबरांच्या पाठोपाठ रानकुत्रे या भागात आल्याची शक्यता आहे. सद्यःपरिस्थितीत गुहागर गावात एक किंवा दोन रानकुत्रे असून वडद भागात रानकुत्र्यांच्या कळपाचे अस्तित्व आहे.” - अक्षय खरे, वन्यजीव निरीक्षक, गुहागर
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.