सौहार्दपूर्ण समाजाची निर्मिती हीच श्रीरामाची खरी पूजा
सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांचे प्रतिपादन
17-Mar-2024
Total Views |
नागपुर : "मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा आदर्श आपल्या जीवनात रुजवण्याची प्रतिज्ञा संपूर्ण समाजाने घ्यावी, जेणेकरून राम मंदिराच्या पुनर्बांधणीचे उद्दिष्ट सार्थ होईल. श्रीरामाच्या जीवनात प्रतिबिंबित होणारी त्याग, प्रेम, शौर्य, सौहार्द आणि न्याय इत्यादी धर्माच्या शाश्वत मूल्यांची आज समाजात पुनर्स्थापना करणे आवश्यक आहे. सर्व प्रकारचे वैमनस्य आणि मतभेद संपवून एक सौहार्दपूर्ण समाज निर्माण करणे हीच श्रीरामाची खरी पूजा असेल.", असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. रा.स्व.संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभा रविवार, दि. १७ मार्च रोजी संपन्न झाली. त्यावेळी प्रतिनिधी सभेत चर्चा झालेल्या विषयांवर सरकार्यवाहंनी माध्यमांना संबोधित केले.
श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापश्चात प्रतिनिधी सभेदरम्यान तयार करण्यात आलेल्या विशेष प्रस्तावाबाबत बोलताना सरकार्यवाह म्हणाले, "२२ जानेवारी रोजी झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळा हे जगाच्या इतिहासातील एक अलौकिक आणि सुवर्ण पान आहे. यादिवशी हिंदू समाजाचा शेकडो वर्षांचा अखंड संघर्ष आणि बलिदान, पूज्य संत आणि महापुरुषांच्या मार्गदर्शनाखाली देशव्यापी चळवळ आणि समाजातील विविध घटकांच्या सामूहिक संकल्पामुळे संघर्षाच्या एका प्रदीर्घ अध्यायाचा आनंददायी संकल्प झाला. या संघर्षात बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना अखिल भारतीय प्रतिनिधी सभा श्रध्दांजली अर्पण करते आणि वरील सर्व लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त करते."
पुढे ते म्हणाले, "श्रीराम जन्मभूमीवर झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे परकीय राजवटीच्या आणि संघर्षाच्या काळात आलेला आत्मविश्वास आणि आत्मविस्मरणाच्या अभावातून समाज बाहेर पडत आहे. हिंदुत्वाच्या भावनेने ओतप्रोत झालेला संपूर्ण समाज स्वत:ला जाणून घेण्यास आणि त्याच्या आधारावर जगण्यासाठी सज्ज होत आहे. प्रभू श्रीरामाचे जीवन आपल्याला सामाजिक जबाबदाऱ्यांशी बांधील राहून समाज आणि राष्ट्रासाठी त्याग करण्याची प्रेरणा देते. त्यांची शासनप्रणाली जगाच्या इतिहासात “रामराज्य” या नावाने प्रस्थापित झाली, ज्यांचे आदर्श सार्वत्रिक आणि शाश्वत आहेत. जीवनमूल्यांचा ऱ्हास, मानवी संवेदनांचा ऱ्हास, विस्तारवादामुळे वाढती हिंसा आणि क्रूरता इत्यादी आव्हानांना तोंड देण्यासाठी रामराज्याची संकल्पना आजही संपूर्ण जगासाठी अनुकरणीय आहे."
सर्व भारतीयांना बंधुभाव, कर्तव्यनिष्ठ, मूल्य-आधारित आणि सामाजिक न्याय सुनिश्चित करणारा सक्षम भारत निर्माण करण्याचे आवाहन यावेळी प्रतिनिधी सभेमार्फत करण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नवीन कार्यकारिणीमध्ये सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी २०२४-२७ या कालावधीसाठी सहा सहसरकार्यवाहंची नियुक्ती केली.
१. कृष्ण गोपाल जी
२. मुकुंद जी
३. अरुण कुमार जी
४. रामदत्त चक्रधर जी
५. अतुल लिमये जी
६. आलोक कुमार जी
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.