धारावीतील अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा

पुनर्विकासाच्या लाभासाठी पक्की घरे बांधल्याचे उघडकीस

    16-Mar-2024
Total Views |


dharavi


मुंबई, दि. १६ : 
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळत असून या भागातील प्रत्येक घरांचे आणि कुटुंबांचे बायोमेट्रीक सर्व्हे सुरु होणार आहे. याचा काही कुटुंब फायदा घेत पक्की घरे बनवत असल्याचे समोर आले आहे. धारावीतील चमडा बाजार येथील ए केजी नगरमध्ये अशाचप्रकारे सुरु असलेल्या पक्क्या बांधकामांवर महापालिकेच्या 'जी उत्तर' विभागाच्यावतीने नुकतीच कारवाई करण्यात आली आहे.
 
धारावीत सध्या अनधिकृत बांधकामे मोठ्याप्रमाणात फोफावली असून कच्च्या घरांच्या जागी पक्की घरे बांधली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या अनधिकृत बांधकामांबाबत महापालिकेला कायम टिकेचा सामना करावा लागतो.दरम्यान, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा फायदा घेत धारावीत अनधिकृत बांधकामे सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्यावतीने चमडा बाजार येथील एकेजी नगर येथे पक्के बांधकाम सुर असलेल्या बांधकामांवर कारवाई केली. येथील एकूण सहा बांधकामांवर पालिकेने बुलडोझर फिरवला. परिमंडळ दोनचे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली 'जी उत्तर' विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंता राजेश राठोड यांच्यासह महापालिकेचे पाच अभियंते, ५० कामगार, दोन गॅस कटरच्या माध्यमातून धारावी व शाहू नगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या संरक्षणात या पक्क्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
 
 कारवाईचा वेग वाढवणार

धारावी विकासप्रकल्पांचे काम हाती घेण्यात आल्याने याच्या आडून ही अनधिकृत पक्की बांधकामे सुरु होती. जुन्या झोपड्यांच्या जागेवर ही बांधकामे केली जात आहे. याबाबत अजून अशी अनधिकृत बांधकामे केली असल्याचे आढळल्यास त्यावर पालिका सक्त कारवाई करणार असून याबाबत शोधही घेण्यात येईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.