यंदाच्या वर्षी काही आगळ्यावेगळ्या विषयावरील मराठी चित्रपट आणि नाटक रसिकप्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये स्वरगंधर्व सुधीर फडके यांच्यावरील चरित्रपटापासून ते गाजलेल्या ‘संगीत मानापमान’ नाटकावर आधारित चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने अशाच काही आगळ्यावेगळ्या विषयांवरील चित्रपट आणि नाटकांचा हा संक्षिप्त आढावा...
स्वरगंधर्व सुधीर फडके
गीतरामायणाची अवीट सुरेल गोडी श्रोत्यांना देऊ करणार्या बाबुजींचा अर्थात गीतकार, संगीतकार, गायक सुधीर फडके यांचा आयुष्यपट मोठ्या पडद्यावर येणार आहे. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या संगीतमय चरित्रपटात अभिनेते सुनील बर्वे बाबुजींची व्यक्तिरेखा साकारणार असून, त्यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री मृण्मयी देशपांडे साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश देशपांडे यांनी केले असून, ‘रिडिफाईन प्रॉडक्शन्स’ यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात आदिश वैद्य यांनी तरुणपणातील बाबुजी साकारले आहेत. याशिवाय या चित्रपटात शरद पोंक्षे, सागर तळाशीकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, सुखदा खांडकेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ’स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट दि. १ मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
महादेव
अभिनेता अंकुश चौधरीला आजवर विविध भूमिकेत आपण मोठ्या पडद्यावर पाहिले आहे. पण, त्याच्या आगामी ‘महादेव’ या चित्रपटाच्यानिमित्ताने तो एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. महाशिवरात्रीचे औचित्य साधत ‘स्वामी मोशन पिक्चर्स’ प्रस्तुत, तेजस लोखंडे दिग्दर्शित ’महादेव’ चित्रपटाचे लक्षवेधी ‘मोशन पोस्टर’ प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमध्ये अंकुशच्या हातातडमरु आणि डोळ्यांत शंकरदेवासारखा क्रोध दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटात अंकुश भगवान शंकराचा अवतार म्हणून दिसू शकतो.
संगीत मानापमान
मराठी संगीत रंगभूमीवरील एक सोन्याचे पान असलेल्या ’संगीत मानापमान’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला नुकतीच ११३ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनित ‘संगीत मानापमान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनित ‘संगीत मानापमान’ हा संगीतमय चित्रपट दि. १ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘कासरा’
अभिनेत्री स्मिता तांबे यांची प्रमुख भूमिका असणारा ‘कासरा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शेतकर्याशी संबंधित वेगळा दृष्टिकोन मांडण्यात आला आहे. तसेच कृषी निगडित समस्यांवरही उत्तर देण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला आहे. विकास मिसाळ दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती रवी नागपूरे यांच्या ‘साई उत्सव फिल्म्स’ने केली आहे. दि. ३ मे रोजी प्रदर्शित होणार्या या चित्रपटात स्मिता तांबे यांच्यासह गणेश यादव, प्रकाश धोत्रे, राम पवार, डॉ. वंदना पटेल, कुणाल सुमन, देवेंद्र लुटे, विशाल अर्जुन आणि बालकलाकार साई नागपूरे यांनी भूमिका साकारल्या आहेत.
‘इवलेसे रोप’
ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांनी ‘इवलेसे रोप’ या नव्या नाटकातून तब्बल १३ वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन केले आहे. नावाप्रमाणेच एका मुरलेल्या नात्याची खुमासदार गोष्ट या नाटकात पाहायला मिळते. ‘रावेतकर’ प्रस्तुत, ‘नाटकमंडळी’ प्रकाशित आणि ‘खेळिया प्रॉडक्शन्स मुंबई’ निर्मित, या नाटकात मंगेश कदम, अभिनेत्री लीना भागवत यांच्यासोबत मयुरेश खोले, अनुष्का गिते, अक्षय भिसे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.