मी मुंबईला चैत्यभूमीवर जाणार. तिथे यात्रा समाप्त होणार. या देशात ‘संविधान खतरे मैं हैं।’, कमळवाले संविधान बदलणार आहेत, हे मी तिथे लोकांना सांगणार. काय म्हणता, संविधानात सगळ्यात मोठा बदल माझ्या दादीने केला. ‘निधर्मी’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द मूळ संविधानात नव्हते? काय म्हणता? आमच्या काँग्रेस पक्षाच्या सरकारने संविधानात बदल करून, हे दोन शब्द टाकले, जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूळ संविधानात लिहिले नव्हते? असू दे, मला माहिती आहे की, महाराष्ट्रामध्ये आल्यावर ‘संविधान खतरे मैं हैं’ तसेच शाहू, फुले, आंबेडकर आणि मनुवाद-पेशवा असे बोलायचे असते. काय म्हणता, मी जरी चैत्यभूमीला गेलो, तरीसुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, ”काँग्रेस जळते घर आहे!” हे लोक विसरले नाहीत.माझे कर्मबंधू उद्धव ठाकरे यांचे नेते ते संजय राऊत माझ्याबद्दल म्हणाले की, ”इंदिरा गांधी आई हैं। नयी रोशनी लाई हैं।” आता आपण म्हणू शकतो की, राहुल गांधी आये हैं, भारत मैं और महाराष्ट्र मैं नई रोशनी लाये हैं. मला किती ‘लाईक’ करतात ते. कारण, मी कन्याकुमारी ते काश्मीर आणि आता मणिपूर ते महाराष्ट्र चाललो आहे. त्यामुळे आता मीच पंतप्रधान होणार. काय म्हणता, असे मी हौसमौज करत फिरतो, तर त्याने देशाचे समाजाचे काय भले झाले? ते मला काही माहिती नाही. पण, जिथे जातो तिथे लोक भेटतात. गळाभेट काय घेतात, रडतात काय? असे वाटते झालोच मी पंतप्रधान. काय म्हणता? ती लोक आमच्या पक्षातल्या पदाधिकार्यांनी आधीच आणून ठेवलेली असतात. मला कुठे कधी आणि कोणत्या पद्धतीने भेटायचे, काय बोलायचे, हे त्या लोकांना आधीच सांगितलेले असते. काय म्हणता, पोराला हवं ते खेळणं मिळालं नाही की, त्याचं मन रमवण्यासाठी लुटूपुटूची लढाई, भातुकलीचा संसार, उभा केला जातो तसं आम्हाला सत्ता मिळणारच नाही, त्यामुळे आम्ही दुःखी-निराश आहोत. आमच्या पक्षाची रडरड, तडफड कमी व्हावी, त्यातही माझं मन रमावं म्हणून या यात्राबित्रेचे नियोजन आम्ही करतो. तुम्ही कसं ओळखलं? कुठे मार्च-एप्रिलच्या उन्हात नानीकडे इटलीला जाऊन मजा करायची आणि कुठे इथे आम्हाला असं मन रमवण्यासाठी भारतातल्या शहरात फिरावं लागतं. आतून रडतो आम्ही. नानी ओ... इटलीवाली नानी सून रही हैं ना तू, रो रहा हू मैं...
आमच्या काँग्रेस पक्षाला लोकांनी पैसे दान केले होते. पण, आमच्या पक्षाचे बँक अकाऊंट गोठवले गेले. त्यामुळे आमच्याकडे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पैसा नाही,” असे नुकतेच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे त्यांच्या खर्जातील आवाजात म्हणाले. पण, विचार केल्यावर लक्षात येते की, कोणत्याही राजकीय पक्षाला अधिकार नाही की, तो त्याच्या विरोधी पक्षाचे बँक अकाऊंट बंद करू शकेल. बँकेतले अकाऊंट गोठवण्यासाठी, अर्थव्यवस्थेतले, संविधानात्मक चौकटीतले काही नियम आहेत. मला वाटले म्हणून समारेच्याचे अकाऊंट बंद करायला, गोठवायलायेथे काही मोगलाई लागलेली नाही. देशात लोकशाही आहे आणि तीसुद्धा खर्या अर्थाने संविधानात्मक लोकशाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे बँक अकाऊंट खरेच जर गोठवले असेल, तर त्याचे कारण काय असेल, हे मल्लिकार्जुन खर्गे सांगतील काय? पण, काहीही बोलायचे, काहीही आरोप करायचे, हे सध्या त्यांच्या राजकारणाचे सूत्र असावे, असे वातावरण आहे खरे. त्यामुळेच काँग्रेस पक्ष, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियंका गांधी वगैरे वगैरे स्तुतिआरती करून झाली की, पक्का काँग्रेसी धर्म पाळत, मल्लिकार्जुन गरिबी-बेरोजगारीबद्दल भाजपला दोष देतात. त्यानंतर काँग्रेसवाल्यांचा 2014 सालापासूनचे एक आवडते पालुपद असते, ते म्हणजे भाजपवाले संविधान बदलणार आहेत. ’संविधान खतरे मैं हैं’ हे पालुपद घशाच्या शिरा दिसेपर्यंत ओरडून म्हटले आणि मोदी-शाह वगैरेंची निंदा केली की, लोककल्याणकारी कृती असे काँग्रेसच्या तमाम नेतेमंडळींचे मत. त्याला राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खर्गे तरी कसे अपवाद ठरतील. असो. सध्या यामध्ये जरा वेगळेपण आलेले आहे. सध्या मल्लिकार्जुन खर्गे कलबुर्गीच्या लोकांना म्हणत आहेत, ‘मोदींना विचार की, त्यांनी कलबुर्गीच्या लोकांसाठी काय केले?’ गंमत म्हणजे, या कलबुर्गी क्षेत्राचे मल्लिकार्जुन अनेक दशके सत्ताधारी होते. 2019च्या निवडणुकीतच काय, तिथे भाजप जिंकली. मात्र, 70 वर्षांत काही झाले नाही, याबद्दल बोलायचे नाही. हिसाब विचारायचा, तो केवळ भाजपच्या दहा वर्षांचा! हेसुद्धा काँग्रेसचे आवडते समीकरण. अशीही काँग्रेसची आपली आवड सुरू आहे. पण, जनतेला या आवडीबद्दल आवड नाही हेच खरे!