मुंबई : हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावर उत्तर द्यावं, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुळेंनी केले आहे. केंद्र सरकारने देशात नागरिकत्व सुधारणा कायदा CAA कायदा लागू करण्याची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी यावर टीका केली होती. यावर आता बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
यवतमाळमधील सभेत बोलत असताना उद्धव ठाकरेंनी CAA कायदा हा सुद्धा एक निवडणुकीचा जुमला असल्याचे म्हटले होते. यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "नागरिकत्व सुधारणा कायद्यावर तुमची भूमिका काय? हे आधी जाहीर करा, असे आव्हान गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्यात खरंच हिंमत असेल तर त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. हिंदुत्व विसरलेल्या आणि आता काँग्रेससमोर शरण गेलेल्या ठाकरेंना या प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागेल."
ते पुढे म्हणाले की, "स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांच्या मुंबईतील स्वागतासाठी उद्धव ठाकरे आसुसलेले आहेत. त्यांच्यासाठी त्यांनी पायघड्या घातल्या आहेत. "स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान तुम्ही वारंवार का करता?" हा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्याची हिंमत तरी उद्धव ठाकरे दाखवतील का? या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्रातील जनतेला हवी आहेत. त्यामुळे हिंमत असेल तर उत्तर द्या, असेही ते म्हणाले आहेत.