‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ मधील नीरजा माधवन कशी घडली? अदा म्हणते...
14-Mar-2024
Total Views |
शहरी नक्षलवाद आणि माओवाद यावर भाष्य करणारा ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ हा चित्रपट १५ मार्चपासून प्रदर्शित होत आहे.
मुंबई : छत्तीसगढमधील नक्षलवाद, माओवाद यावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा आणि तेथील भयाण वास्तव प्रेक्षकांसमोर मांडणारा वास्तववादी चित्रपट ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ (Bastar The Naxal Story) लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने द केरला स्टोरी नंतर पुन्हा एकदा विपुल शाह, सुदिप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा एकत्रित येत आपल्याच देशातील एक क्रुर सत्य प्रेक्षकांसमोर मांडणार आहेत. ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ (Bastar The Naxal Story) या चित्रपटात अदा शर्मा हिने आयजी ऑफिसर नीरजा माधवन (Bastar The Naxal Story) हिची भूमिका साकारली आहे.
या चित्रपटातील नीरजा माधवन ही भूमिका कशी घडली याबद्दल बोलताना अदा म्हणाली, “बस्तर : द नक्सल स्टोरी या चित्रपटात मी ज्या नीरजा माधवनची भूमिका साकारली आहे त्यासाठी मी बस्तरमधील CRPF च्या महिला जवानांना जाऊन भेटले होते. ज्यावेळी मी त्यांना पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात मला कोणत्याही प्रकारचे भय दिसले नाही. मी त्या हजारो महिला जवानांचे प्रतिनिधीत्व करणारी नीरजा माधवन साकारली आहे. कारण, ७६ जवानांना नक्षलवाद्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पाडलेले पाहिले असता एक कणखर जवान महिलाच आपले अश्रु सावरु शकते. पण मी माझ्या खऱ्या जीवनात फार भावनिक असल्यामुळे मला ती स्थिती सांभाळताना जरा कठिण गेले”, असा अनुभव अदा शर्मा हिने सांगितला.
तसेच, नीरजा माधवन हिची वेशभूषा, केशभूषा याबद्दल अधिक माहिती देताना अदा म्हणाली की, “ज्यावेळी मी तिथल्या महिला जवान आणि एसपीओंना भेटले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आम्ही दोन-तीन दिवस सलग जंगलात असतो त्यामुळे आमची त्वचा फार रुक्ष असते, त्यामुळे रंगभूषा करताना त्याकडे लक्ष द्या. तसेच, आम्ही जंगलात रात्री गस्त घालत असतो किंवा दबा धरुन बसलेलो असतो त्यामुळे आमच्या कानात, नाकात कोणताही दागिना नसतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा काटेकोरपण विचार करत आम्ही नीरजा माधवन हिला लूक ठरवला”, असे अदा म्हणाली. विपुल शाह निर्मित आणि सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'बस्तर : द नक्सल स्टोरी' हा चित्रपट १५ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.