काही लोकांनी लंकेंच्या मनात खासदारकीची हवा घातली : अजित पवार
14-Mar-2024
Total Views |
मुंबई : काही लोकांनी निलेश लंकेंच्या मनात खासदारकीची हवा घातली आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे शरद पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, यावर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.
अजित पवार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, "मी निलेश लंकेसोबत चर्चा केली. त्याला मी काही गोष्टी नीट समजून सांगितल्या आहेत. पण काही लोकांनी तू खासदार होशील अशी हवा त्याच्या डोक्यात घातली आहे. वास्तविक तसं नाहीये. निलेश पारनेरपुरता लोकप्रिय आहे. पण बाकीच्या मतदारसंघात त्याला वाटतं तितकं सोपं नाही. जितकं समजून सांगायचं होतं तितकं मी त्याला सांगितलं आहे."
ते पुढे म्हणाले की, "निलेश लंके तिथल्या स्थानिक राजकारणावर नाराज आहेत. त्यांनी एका मंत्री महोदयाबद्दल माझ्याकडे तक्रार केली असून त्यामुळेच ते नाराज आहेत. परंतू, मी त्यांना म्हणालो की, एकदा आपण बसूया आणि गैरसमज दूर करुन प्रश्न सोडवूया. पण तू व्यवस्थित राहा. काहीही चुकीचं करु नको. आता तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे. सगळ्या आमदारांना पक्षाचा व्हीप लागू झालेला आहे. त्यामुळे त्यांना आता वेगळं उभं राहायचं असल्यास राजीनामा देऊनच सगळं करावं लागेल," असे ते म्हणाले.
"समोरच्या लोकांकडे उमेदवार नसल्यामुळे ते वेगवेगळ्या लोकांना सोबत घेत आहेत. २ जूलै रोजी ज्यावेळी आम्ही वेगळी भूमिका घेतली त्यावेळी त्यांच्यातील काही लोक म्हणायचे की, तिकडे गेलेल्यांपैकी एकालाही परत घ्यायचं नाही. पण हे बोलून सहा महिने होत नाहीत तोच ते निलेश तू आमचाच आहे असं करायला लागले आहेत," असेही ते म्हणाले आहेत.