संन्यास संस्कार (उत्तरार्ध-१)

वैदिक षोडश संस्कार

    13-Mar-2024
Total Views |
 Ascetic rites

संन्यासविधी संपन्न झाल्यानंतर उपस्थित ज्ञानीजन त्या परिव्राजकाला शुभेच्छा देत, त्याच्याकडून ही अपेक्षा व्यक्त करीत आहेत. याप्रसंगी संन्यासाला परमेश्वराची उपमा दिली आहे. जसा परमपिता परमेश्वर संपूर्ण ब्रह्मांडातील चंद्र, सूर्य इत्यादींना प्रकाशित करून त्यांना धारण करतो, त्याचप्रमाणे संन्यासानेदेखील आपल्या आत्म्यामध्ये चांगल्या गोष्टी धारण कराव्यात आणि सदोदित आनंदी राहावे. त्याबरोबरच त्याने या संपूर्ण जगातील ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ या आश्रमातील सर्व वर्णांच्या प्रजाजनांना सत्यविद्येचा उपदेश करावा आणि सन्मार्ग दाखवावा. कारण, ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ कार्य आहे.

यद्देवा यतयो यथा भुवनान्यपिन्वत।
अत्रा समुद्र आ गूढ्हमा सूर्यमजभर्त्तन॥
(ऋग्वेद-१०/७२/७)

अन्वयार्थ

हे (देवा:) पूर्ण ज्ञानी व विद्वान लोकहो, तसेच (यतय:) संन्यासी जनहो, (यथा) जसा हा परमेश्वर (अत्र) या (समुद्रे) ब्रह्मांडरुपी आकाशामध्ये (गुढम्) गुढरूपाने (आ सूर्यम्) स्वयंप्रकाशस्वरुप असलेल्या सूर्य, चंद्र इत्यादींचा प्रकाशक आहे, त्याप्रमाणे तुम्ही त्या परमेश्वराला (आ + अजभर्त्तन) चहू बाजूने आपल्या आत्म्यामध्ये धारण करा आणि आनंदी व्हा! त्याचबरोबर (यत्) जे (भुवनानि) सर्व भुवनस्थळी गृहस्थ इत्यादी मनुष्य आहेत, त्यांना नेहमी (अपिन्वत) विद्या व उपदेशांनी जोडत राहा, संयुक्त करा! हाच तुमचा खरा धर्म आहे.

विवेचन

वरील मंत्रातून संन्यास धर्म अभिव्यक्त होतो. संन्यासविधी संपन्न झाल्यानंतर उपस्थित ज्ञानीजन त्या परिव्राजकाला शुभेच्छा देत, त्याच्याकडून ही अपेक्षा व्यक्त करीत आहेत. याप्रसंगी संन्यासाला परमेश्वराची उपमा दिली आहे. जसा परमपिता परमेश्वर संपूर्ण ब्रह्मांडातील चंद्र, सूर्य इत्यादींना प्रकाशित करून त्यांना धारण करतो, त्याचप्रमाणे संन्यासानेदेखील आपल्या आत्म्यामध्ये चांगल्या गोष्टी धारण कराव्यात आणि सदोदित आनंदी राहावे. त्याबरोबरच त्याने या संपूर्ण जगातील ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ या आश्रमातील सर्व वर्णांच्या प्रजाजनांना सत्यविद्येचा उपदेश करावा आणि सन्मार्ग दाखवावा. कारण, ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ कार्य आहे. सामान्य लोकांना जडलेली अविद्या व अज्ञान यांपासून परावृत्त करून त्यांना जीवन जगण्याचा खरा मार्ग सांगावा.संन्यासाचे तीन प्रकार आहेत. १) तीन आश्रम पूर्ण केल्यानंतर शेवटी संन्यास दीक्षा घेतली जाते, हा क्रम संन्यास आहे. २) गृहस्थाश्रमात किंवा वानप्रस्थाश्रमात असताना आपला कालावधी पूर्ण न करतादेखील वैराग्य निर्माण झाले असता लवकरच संन्यास घेतला जातो. आणि ३) पूर्वजन्मातील अगाध तपश्चर्या व साधनेने अगदी बालपणापासूनच किंवा वैराग्यामुळे सरळ ब्रह्मचर्य आश्रमातूनच जो संन्यास घेतला जातो, तो आजन्म ब्रह्मचर्य संन्यास मानला जातो.
 
ज्या दिवशी संन्यास घ्यावयाचा आहे, तो दिवस किंवा ती तारीख निश्चित करून इतरांना तशा प्रकारच्या सूचना देण्यात याव्यात. आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रजणांना आमंत्रित करून जाहीरपणे संन्यास दीक्षा कार्यक्रमाचे आयोजन करावे. यज्ञवेदी सजवण्यात यावी. समिधा, तूप, भात, भगवी वस्त्रे, कमंडलू, दंड (काठी) व इतर साहित्यांचे संकलन करावे. ज्याला संन्यास दीक्षा घ्यावयाची आहे, अशा व्यक्तीने ज्या दिवशी मन प्रसन्न असेल, त्या दिवसापासून तीन दिवस नियम व व्रतांचे पालन करावे. केवळ दुग्धपान करून उपवास धरावा. भूमीवर शयन करावे. प्राणायाम, ध्यान व एकांती बसून ईश्वराचे मुख्य निज नाम ओम् या वाचक प्रणवाचा जाप करावा. चौथ्या दिवशी चतुर्थ प्रहरी उठून आपली नित्यकर्मे आटोपून प्राणायामपूर्वक ईश्वराचे ध्यान, चिंतन आणि पुन्हा ओम् नामाचा जप करावा. संन्यास दीक्षा ज्यांच्या हातून घ्यावयाची आहे, अशा एका ज्येष्ठ विद्वान संन्याशाला आमंत्रित करून त्याचा योग्य तो सन्मान करावा व त्याला उच्च आसनावर बसवावे. यावेळी कर्मकांडातील निष्ठांत विद्वान, आचार्य यांना ब्रह्मा म्हणून यज्ञाची जबाबदारी सोपवण्यात यावी, तर हे कार्य पूर्ण करणारे पुरोहित आणि वेदपाठीदेखील असावेत.

वैदिक मंत्रोद्घोेषाने संन्यास विधीला प्रारंभ करण्यात यावा. प्रारंभी स्वस्तिवाचन, शांतिकरण, ईश्वरस्तुतिप्रार्थना मंत्रांचे पठण करण्यात यावे. तत्पश्चात ऋत्विक वरण, आचमन, अंगस्पर्श, अग्निदीपन, अग्न्याधान इत्यादी विधींनी यज्ञकर्म पूर्ण करावे.बृहद्यज्ञ संपन्न झाल्यानंतर संन्यासोत्सुक यजमानाने आता ‘भुवनपतये स्वाहा, भूतानां पतये स्वाहा, प्रजापतये स्वाहा....’ अशा तीन आहुत्या द्याव्यात. याचा भावार्थ असा की, संपूर्ण ब्रह्मांडाचा अधिपती जो परमेश्वर आहे, त्याच्याविषयी कृतज्ञता! भूत म्हणजेच पंचमहाभूते या सर्वांचा पालन करणारा अधिपती परमेश्वर... त्याच्याविषयी स्तुतिगान आणि जगातील जेवढे प्राणी जे की चार प्रकारचे आहेत- उद्भिज, स्वेदज, अंडज, पिंडज... ही सर्व त्या महान परमेश्वराची प्रजा आहे, म्हणूनच त्यांच्याविषयीदेखील मंगलवचने प्रदान करण्याची ही पवित्र भावना स्वाहा म्हणजेच या सर्वांविषयी एक प्रकारे प्रशंसोद्गाार! आजपर्यंत मागील आश्रमांमध्ये ज्या सर्वांचे सहकार्य लाभले, त्यांच्याविषयी कृतज्ञतापूर्वक भावाभिव्यक्ती.

यानंतर या विधीप्रसंगी घृतयुक्त जो भात बनविला आहे, त्याच्या ११ मंत्रांनी आहुत्या दिल्या जातात. या मंत्रांचा भावार्थ म्हणजे संन्यास दीक्षा घेणार्‍या व्यक्तीचे जणू काही मनोगतच आहे. आजपर्यंत ती फक्त आपला व आपल्या कुटुंबीयांचा व परिसराचाच विचार करावयाची. सांसारिक व व्यावहारिक गोष्टी आणि भौतिक वस्तूतः रमायची. पण, आता मात्र या संपूर्ण विश्वातील प्रत्येक कणाकणात त्याला त्या परब्रह्माची अनुभूती होत आहे. जिकडे पाहावे तिकडे त्याला परमेश्वराचे दर्शन घडतात. मनातील संकुचित भावना लोपली आहे. उदार अंतकरणाने तो संपूर्ण प्राणिमात्रांमध्ये ईश्वरीय दिव्य शक्तीला पाहतोय. ‘ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् विश्वा’च्या कणाकणांमध्ये त्याला भगवंताची अनुभूती होत आहे. अंतर्बाह्य जग हे त्या महान भगवंताने व्यापलेले आहे, अशीच जणू काही मानसिकता. जी कोणती जड व चेतन वस्तू दिसेल, त्याच्या आत व बाहेर त्यांची प्रेरक ब्रह्मशक्ती दृष्टिपथास येत आहे. (क्रमश:)
 
प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य