बारामती लोकसभा लढवणारच! विजय शिवतारेंचा निश्चय ठाम
13-Mar-2024
Total Views | 54
पुणे : केवळ पवार पवार करण्याऐवजी आपला स्वाभिमान जागृत करुन आपण लढायला हवं, असे म्हणत शिवसेना नेते विजय शिवतारेंनी बारामतीतून लोकसभा निवडणुक लढवण्याचा निश्चय केला आहे. बुधवारी बारामतीतून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वीच विजय शिवतारेंनी शरद पवार आणि अजित पवारांवर निशाणा साधला होता. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणत्याही कुटुंबाचा सातबारा नाही असे म्हणत त्यांनी दोन्ही पवारांवर टीका केली. दरम्यान, आता त्यांनी बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
विजय शिवतारे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, "बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या आणि घराणेशाही, कुटुंबशाही तसेच साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढणार आहे. एका शब्दात सांगायचं झाल्यास ही लढाई पवार विरुद्ध बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस अशी असेल."
"बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी नेते यांनी एकमताने ठराव पास केला असून विजय शिवतारे यांनी निवडणूक लढवावी असा निर्णय घेण्यात आला आहे. ही लढाई विजय शिवतारेंची नसून लोकांची लढाई लढण्यासाठी आणि प्रस्थापितांच्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सर्वसामान्यांचा आवाज म्हणून मला पुढे यायचं आहे. यासाठीच मी ही लढाई लढणार आहे. या लढाईत निश्चितपणे जनता मला मोठ्या प्रमाणात आशिर्वाद देईल. मी महायुतीच्या विरोधात नाही. परंतू, इथली लढाई वेगळी आहे. त्यामुळे लोकांची ईच्छा आहे की, मी ही लढाई लढावी," असेही ते म्हणाले.