रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट! हल्लेखोराला मदत करणारा 'शब्बीर' NIA च्या ताब्यात

    13-Mar-2024
Total Views |
 Bengaluru Blast
 
नवी दिल्ली : बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा यंत्रणा एनआयए (NIA)ने या प्रकरणी स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्याच्या सहाय्यकाला अटक केली आहे. त्याला कर्नाटकातूनच अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये दि. १ मार्च २०२४ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास करत असलेल्या एनआयएने संशयित शब्बीरला ताब्यात घेतले आहे. त्याला कर्नाटकातील बेल्लारी येथून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी एनआयए त्याची कसून चौकशी करत आहे.
 
कर्नाटकातील एका स्थानिक वृत्तवाहिनीने सकाळी ४ वाजता शब्बीरला अटक केल्याचे वृत्त दिले आहे. सध्या शब्बीरला चौकशीसाठी बेंगळुरूला नेण्यात आले आहे. बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट घडवणारा दहशतवादी शब्बीरला भेटण्यासाठी आला होता, असे या वृत्तात सांगण्यात आले आहे. शब्बीर हा बेल्लारी येथील कौल बाजार भागातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
शब्बीरने बेंगळुरूमध्ये स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्याला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. हा दहशतवादी हैदराबाद, तेलंगणा येथे पळून गेला आहे. मुख्य दहशतवादी हैदराबादमध्ये लपल्याची माहिती आहे. उल्लेखनीय आहे की, गेल्या शुक्रवारी, दि. १ मार्च २०२४ बेंगळुरूच्या व्हाईटफिल्ड भागात असलेल्या रामेश्वरम कॅफेमध्ये दुपारी स्फोट झाला होता. या स्फोटात ९ जण जखमी झाले आहेत. एनआयएने या प्रकरणाचा तपास सुरू केला. तेव्हापासून या संशयिताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 
एनआयएने या प्रकरणातील एका संशयिताचा फोटो जारी केला होता आणि लोकांना त्याची ओळख पटवण्यास सांगितले होते. संशयिताचा बस आणि कॅफेमधील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. तो सार्वजनिक बसमधून स्फोटाच्या ठिकाणी आल्याचे समोर आले आहे. रामेश्वरम कॅफे स्फोट घडवणारा संशयित सकाळी १०:४५ वाजता सार्वजनिक बसमधून खाली उतरला होता. हा बस स्टॉप कॅफेपासून फक्त १०० मीटर अंतरावर आहे. यानंतर तो मागे फिरला आणि ११:३४ वाजता कॅफेमध्ये प्रवेश केला आणि ८ मिनिटांनी बाहेर आला. दरम्यान त्याने येथे बॉम्ब ठेवला होता. येथून निघाल्यानंतर एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बसस्थानकावर जाऊन तेथून बस पकडली.
 
 
संशयित त्याच्या मार्गावर एका मशिदीतही थांबला होता. येथे त्याने आपला वेश बदलला आणि आपली टोपी देखील सोडली. एनआयएने ही टोपी जप्त केली होती. संशयिताची ओळख पटवण्यासाठी एनआयएने त्याचा फोटो असलेले पोस्टर जारी केले होते. एनआयएने याबाबत माहिती देणाऱ्याला १० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. आता या प्रकरणातील संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर हे प्रकरण उघडकीस येण्याची आशा वाढली आहे.