मराठी भाषेत सावरकरांच्या भूमिकेला सुबोध भावेचाच आवाज हवा - रणदीप हुड्डा
12-Mar-2024
Total Views |
अभिनेते सुबोध भावे यांनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या मराठी भाषेत प्रदर्शित होणाऱ्या चरित्रपटासाठी सावरकरांची भूमिका साकारणाऱ्या रणदीप हुड्डा यांना आवाज दिला आहे.
मुंबई : रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) चित्रपट हिंदीसह मराठी भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे. मराठी चित्रपटासाठी (Swatantryaveer Savarkar) सावरकरांच्या व्यक्तिरेखेला आवाज कोणाचा असणार अशी चर्चा सुरु असताना सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी हा आवाज द्यावा असा अट्टहास रणदीप हुड्डा यांनी केला होता. याबद्दल त्यांनी नुकत्याच पुण्यात प्रदर्शित झालेल्या मराठी ट्रेलरच्या (Swatantryaveer Savarkar) कार्यक्रमात भाष्य केले.
रणदीप हुड्डा म्हणाले की, “सुबोध भावे हा एक उमदा कलाकार आहे. ज्यावेळी चर्चा सुरु होती की मराठी मराठी चित्रपटासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेला आवाज कोण देणार? त्यावेळी माझ्या डोक्यात एकच नाव आले ते म्हणजे सुबोध भावे यांचे. त्यांच्याशिवाय कुणी योग्य न्याय देऊ शकणार नाही, असे म्हणत रणदीप हुड्डा यांनी सुबोध भावे यांचे कौतुक केले.
पुढे ते असे देखील म्हणाले की, “मराठी भाषेत भावभावनांचा ओलावा, सशक्तपणा आहे. जो इतर कोणत्याही भाषेत नाही. मराठी भाषा तितकीच क्लिष्टही आहे. मी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु अभिनय व दिग्दर्शनाच्या गडबडीत व्यवस्थितपणे शिकू शकलो नाही’ अशी कबूली देताना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट हिंदीपेक्षा मराठी भाषेत अधिक प्रभावी वाटला, असे मत अभिनेता रणदीप हुडा यांनी व्यक्त केले.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या बहुचर्चित चरित्रपटाचा मराठी ट्रेलर नुकताच पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रदर्शित करण्यात आला. यावेळी हा चित्रपट महाराष्ट्राच्या गावखेड्यातआणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा या उद्देशाने मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत प्रदर्शित करीत आहोत’, अशी विशेष माहितीही रणदीप हुडा यांनी दिली.
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर या चरित्रपटात रणदीप हुडा यांनी सावरकरांची भूमिका साकारली असून सोबत दिग्दर्शनाची धुराही त्यांनीच सांभाळली आहे. तर अभिनेत्री अंकिता लोखंडे या चित्रपटात यमुनाबाई सावरकर यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. याबद्दल अधिक बोलताना रणदीप म्हणाले, “तुम्ही चित्रपटात एखादी व्यक्तिरेखा साकारत असताना त्या व्यक्तिरेखेसारखे हुबेहूब दिसणे अत्यंत महत्त्वाचे असते. तरच प्रेक्षक ती कलाकृती आवर्जून पाहतात. सावरकरांची भूमिका अचूक वठवता यावी यासाठी मी त्यांच्यावर आधारित साहित्य वाचून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे बहुरंगी होते. देशप्रेम ही गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे’, असेही रणदीप हुड्डा यांनी म्हटले. रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि निर्मित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत २२ मार्च २०२४ रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.