शासनकर्ती जमात होण्यासाठी...

    12-Mar-2024   
Total Views |
Ujjwala Jadhav


डॉ. प्रा. उज्ज्वला जाधव... आंबेडकरी चळवळीतले एक अग्रणी नाव. उज्ज्वला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार समाजप्रबोधन करतात. त्यांचा जीवनकार्याचा घेतलेला मागोवा.


कोरीयले हृदयावर, भीम तुझे नावे
तुझे गीत गाईन, फिरूनी गावोगाव

वामनराव कर्डक आवेशात तल्लीन होऊन गात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारकर्तृत्व त्या भीमगीतातून उज्ज्वला यांनी ऐकले. तेव्हा उज्ज्वला यांच्या हृदयात बाबासाहेबांच्या विचारांचा आणि कर्तृत्वाची प्रखर ज्योत तेवली. आज त्याच उज्ज्वला यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना समर्पित केले आहे. त्या ‘उज्ज्वल कन्या’ या संस्थेच्या विश्वस्त, ‘विशाखा वुमेन्स वेल्फेअर असोसिएशन’ संस्थेच्या अध्यक्ष आहेत. तसेच, ‘उज्ज्वल मागासवर्गीय महिला विकास’ संस्थेच्या आणि ‘नॅशनल मीडिया काऊंसिल’च्याही राज्यस्तरीय विश्वस्त आहेत. नुकत्याच त्या मुंबई विद्यापीठ, जीवन विज्ञान विभागाच्या प्रमुख म्हणून निवृत्ती झाल्या. महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाजाची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय उन्नती कशी होईल, यासाठी उज्ज्वला काम करतात. समाजाला सत्ता प्राप्त करण्यासाठी स्वतःला कसे सिद्ध करावे लागेल, यासाठी त्या प्रबोधन करतात, कार्य करतात. मात्र, त्यात कुठेही विद्वेष किंवा फुटीरतावाद नाही, तर केवळ तथागतांची मानवी शाश्वत मूल्ये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले निखळ भाारतीयत्व आहे.
 
डॉ. प्रा. उज्ज्वला जाधव यांनी शैक्षणिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शोधप्रबंध सादर केले. त्यांनी लिहिलेले ‘अ‍ॅक्वा कल्चर टेक्नोलॉजी अ‍ॅण्ड एन्व्हायर्न्मेंट’ हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांत प्राणिशास्त्र विभागात अभ्यासासाठी आहे. त्यांनी ‘करंट ट्रेंड्स इन लाईफ सायन्सेस’ हे पुस्तकही लिहिले आहे. तसेच त्यांनी ‘संचय साक्षी’ नावाचे एक मराठी ललित पुस्तकही लिहिले. आंबेडकरी चळवळीतील त्यांचे योगदान आणि महत्त्व यावर प्रशांत वाघमारे यांनी ‘चळवळीतील नायिका’ हे पुस्तक लिहिले. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आजपर्यंत त्यांना राष्ट्रीय स्तरावरचे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.डॉ. उज्ज्वला जाधव या माहेरच्या उज्ज्वला साळवे. मुरलीधर आणि शकुंतला साळवे कुटुंब मूळचे छ. संभाजी नगरचे. दोघांना सात अपत्ये, त्यापैकी एक उज्ज्वला. उज्ज्वला आणि त्यांच्या मोठ्या बहिणीला काही कारणास्तव त्यांच्या आजोळी म्हणजे आईच्या माहेरी पाठवण्यात आले. तिथे रायभान आजोबा आणि अन्नपुर्णा आजीने उज्ज्वला यांना जातीभेद- लिंगभेद यांपलीकडे जाऊन संगोपन केले. लहानपणापासूनच उज्ज्वला यांची वैचारिक- सामाजिक जडणघडण वास्तविकरित्या विकसित झाली होती.

त्यावेळी उज्ज्वला ११ वर्षांच्या होत्या. त्यावेळी माईसाहेब आंबेडकर उज्ज्वला यांच्या घरी राहिल्या होत्या. उज्ज्वला त्यांना विचारत, “तुम्ही बाबासाहेबांना इंजेक्शन टोचायचा, तर त्यांना दुखत असेल ना?” तेव्हा माईसाहेब म्हणायचे, “हो ग राणी, पण साहेब कधी दुःख-वेदना दाखवायचे नाहीत. समाजासाठी त्यांनी सगळ सोसलं.” इतक्या मोठ्या महापुरुषाची पत्नी आपल्याशी बोलते याचे कोण अप्रुप त्या उज्ज्वला यांना वाटायचे. असो. उज्ज्वला अकरावीला होत्या आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ-आंदोलन सुरू झाले. या आंदेालनात सक्रिय सहभाग घेतला म्हणून त्यांना तुरुंगवासही झाला. पुढे विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यांचा विवाह अंबादास जाधव या प्रशासकीय अधिकार्‍यांशी झाला. लग्न करून त्या कोल्हापुरात आल्या. विवाह झाल्यानंतर त्यांनी विज्ञान शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेतले. दुसर्‍या वर्षाला असतानाच त्यांना लेकही झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या महाविद्यालयात नोकरी करू लागल्या. त्यानंतर चळवळीच्या माध्यमातून त्या प्रकाश आंबेडकरांशी जोडल्या गेल्या. त्यांनी वंचित पक्षाची पदाधिकारी म्हणूनही काम केले. पण, त्यापेक्षाही त्यांचे काम समाजामध्ये मोठे होते. कोल्हापूरमधील समाजभगिनींना एकत्र करून त्यांना बाबासाहेबांच्या विचारांतली आदर्श स्त्रीशक्ती, आदर्श समाज कसा होता, याबद्दल जागृती करू लागल्या. त्यांचा कार्यप्रवास राज्यभर सुरू झाला.

पुढे पती आणि त्या मुंबई विद्यापीठात प्राध्यापकपदी रूजू झाले. २०१३ साल असावे. त्यावेळी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा उदय होणार होता आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही उदय होत होता. सामाजिक- राजकीय अभ्यासक म्हणून उज्ज्वला यांनी दोन्ही नेत्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला. गणेशोत्सवाचा पहिला दिवस होता. त्यांच्या घरी गणपती आणायची लगबग सुरू होती. उज्ज्वला त्यांची भेट घ्यायला गेल्या, तेव्हा देवेंद्रजी त्यांच्याशी बाबासाहेबांच्या विचारांनी समृद्ध होऊ घातलेला देश, संविधान यावर संवाद साधू लागले. त्यावेळी त्यांची कन्या दोनदा त्यांना म्हणाली, “बाबा, गणपती बाप्पांना आणायला जायचे आहे.” ते म्हणाले, “थांब मी ताईंशी बोलतो.” दोनदा हाच क्रम झाल्यावर ते उज्ज्वला यांना म्हणाले, “लगेच येतो.” ते मूर्ती घेऊन परतले आणि पुन्हा उज्ज्वला यांच्याशी पाऊणतास त्यांनी डॉ. बाबासाहेबांचे समाजाला, देशाला तारणारे विचार यावर चर्चा केली. उज्ज्वला म्हणतात, ”हा माझ्यासाठी प्रेरणादायी क्षण होता. कारण, बाबासाहेब म्हणालेले शासनकर्ती जमात व्हा. आज शासनात असलेलेच बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक आहेत. यापुढे माझ्या समाजाला सत्तेत टक्का मिळावा. भगिनींना सत्तेत वाटा मिळावा, यासाठी मी संविधानिकरित्या काम करणार आहे.” खर्‍या अर्थाने शासनकर्ती जमात होण्यासाठी कार्य करणार्‍या प्रा. डॉ. उज्ज्वला यांना शुभेच्छा!


-योगिता साळवी
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.