मुंबई (अक्षय मांडवकर) - पालघर जिल्ह्यातील चिंचणीचा किनारा हा स्थलांतरित पक्ष्यांसाठी माहेरघर ठरत आहे (lesser sand plover). येथील पक्षीनिरीक्षक दरवर्षी पायामध्ये 'A9P' या क्रमांकाचा 'कलर फ्लॅग' असलेल्या छोट्या चिखल्या (lesser sand plover) प्रजातीच्या पक्ष्याची नोंद करत आहेत. दक्षिण रशिया आणि उत्तर हिमालयातील प्रदेशामधून पालघरच्या किनारपट्टीवर स्थलांतर करणाऱ्या या पक्ष्यामुळे येथील किनारी अधिवासाचे महत्व अधोरेखित झाले आहे. (lesser sand plover)
मुंबई महानगर प्रदेशात दरवर्षी छोट्या चिखल्या जातीचे पक्षी हे हिवाळी हंगामात स्थलांतर करुन येतात. थव्याने स्थलांतर करणाऱ्या या पक्ष्याच्या साधारण तीन उपप्रजाती जगातील विविध भागांमधून मुंबई महानगर प्रदेशामध्ये येतात. हे पक्षी विशेषत: किनारपट्टीच्या भागात वालुकामय किनारे, दलदल, नदीमुख, पुळणी आणि कांदळवनाच्या दलदलींवर आढळतात. 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या (बीएनएचएस) संशोधकांनी भांडूप उदंचन केंद्रातील पाणथळीवर या जातीमधील एका पक्ष्याला 'रिंग' केले होते. डिसेंबर, २०२१ साली या पक्ष्याच्या पायात 'A9P' क्रमांकाचा 'कलर फ्लॅग' लावून त्याला सोडण्यात आले होते. आॅक्टोबर, २०२२ मध्ये पक्षीनिरीक्षक आशिष बाबरे यांना हा पक्षी पालघरच्या चिंचणी किनाऱ्यावर दिसला. त्यांनी या पक्ष्याचे छायाचित्र टिपून त्याच्या पायावर बसवलेल्या 'कलर फ्लॅग'वरील 'A9P' हा क्रमांक नोंदवला. त्यानंतर आता दोन वर्षांनी हा पक्षी पुन्हा एकदा चिंचणी किनाऱ्यावर दिसून आला आहे. शनिवारी चिंचणीच्या किनाऱ्यावर पक्षी निरीक्षणाकरिता गेलो असता, त्याठिकाणी पायात 'A9P' क्रमांकाचा 'कलर फ्लॅग' असलेला छोट्या चिखल्या पक्षी दिसल्याची माहिती पक्षीनिरीक्षक अनूप केळकर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.
पक्ष्यांच्या स्थलांतरामध्ये त्यांचे अधिवास हे महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण, दरवर्षी हे पक्षी एकाच ठिकाणाला भेट देतात. 'A9P' क्रमांकाचा 'कलर फ्लॅग' असलेला छोट्या चिखल्या पक्षी दरवर्षी चिंचणी किनाऱ्यावरच स्थलांतर करुन येत असल्याचे बाबरे आणि केळकर यांनी केलेल्या नोंदींमुळे समजले आहे. अशा परिस्थितीत या किनाऱ्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी देखील पक्षी स्थलांतराच्या अनुषंगाने चिंचणी किनाऱ्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. महाराष्ट्रात दुर्मीळ असणारा लाल जलरंक (रेड नाॅट) आणि पाणचिरा (इंडियन स्क्रिमर) या पक्ष्यांच्या नोंदी चिंचणी किनाऱ्यावरुन झाल्या आहेत.
'कलर फ्लॅग' म्हणजे ?
पक्षी स्थलांतराच्या अभ्यासासाठी पक्ष्यांच्या एका पायात गोलाकार लोखंडी कडी लावली जाते. यासोबत दुसऱ्या पायात 'कलर फ्लॅग' लावण्यात येतो. प्रत्येक देशाने आंतरराष्ट्रीय नियमांना स्वीकारून त्यांच्या देशामधील पक्ष्यांच्या पायांना लावण्यात येणाऱ्या 'फ्लॅग'चा रंग ठरवलेला आहे. त्यानुसार, पक्षी जर उतर भारतात टॅग करण्यात येत असेल, तर सांकेतिक क्रमांक लिहिलेल्या पांढऱ्या रंगाच्या 'कलर फ्लॅग'च्या खाली पांढरा रंगाचा कोरा 'कलर फ्लॅग' लावण्यात येतो. याउलट दक्षिण भारतात टॅग करण्यात येणाऱ्या पक्ष्यांच्या पायात सांकेतिक क्रमांक लिहिलेला काळ्या रंगाचा 'कलर फ्लॅग' लावण्यात येतो.