'दत्ताजी डिडोळकर' समाजाला जोडणारी सकारात्मक विचारांची व्यक्ती
सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन
11-Mar-2024
Total Views |
(Dattaji Didolkar RSS)
नागपूर : "दत्ताजी डिडोळकर हे अखंड भारतीय दृष्टीचे स्वामी होते. त्यांच्या कामात सर्जनशीलता होती. समाजाला जोडणारी आणि सकारात्मक विचारांची ती व्यक्ती होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून आपण अनेक गोष्टी शिकलो, ज्याचा आपल्या जीवनावर परिणाम झाला. तरुणपणापासूनच अशा भावना आपल्या मनात रुजवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.", असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा.प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले.
श्रद्धेय दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह समितिच्या वतीने रविवार, दि. १० मार्च रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात 'भारत की संकल्पना' यासंदर्भात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर अध्यात्मिक मार्गदर्शक श्री एम, जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, समितीचे सचिव अजय संचेती आणि निमंत्रक जयंत पाठक उपस्थित होते.
दत्ताजींच्या आठवणींना उजाळा देत सुनीलजी पुढे म्हणाले, "दत्ताजी संघाच्या कार्यासाठी दक्षिणेला तामिळनाडूला गेले होते. त्यांना मराठी सोबतच हिंदी, मल्याळम, तमिळ इत्यादी भाषा चांगल्या अवगत होत्या. मोजक्या शब्दांत मोठा संदेश देण्याची कला त्यांनी आत्मसात केली होती. दत्ताजींच्या मनात तमाम देशवासियांबद्दल प्रेमाची भावना होती."
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले की, "दत्ताजी डिडोळकर यांचे जीवन राष्ट्रासाठी समर्पित होते. त्यांच्यात नम्रता आणि साधेपणा होता. ते अजातशत्रू होते आणि कार्यकर्त्यांशी त्यांचे कौटुंबिक संबंध होते. मला त्यांच्या सहवासात राहण्याची संधी मिळाली. कार्यकर्ता कसा असावा हे त्यांच्या जीवनातून शिकूया. त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी जन्मशताब्दी समितीची स्थापना करण्यात आली. नागपूर विद्यापीठात त्यांच्या कार्यकाळात केलेले काम कौतुकास्पद होते."