आम्ही सोने, हिरे, ड्रग्ज आणि मौल्यवान वस्तूंची तस्करी होते, हे ऐकले असेलच. मात्र, केसांचीही तस्करी होत असल्याचे, आता समोर आले आहे. नुकतेच ’ईडी’ने केसांच्या अवैध तस्करीचे हजारो कोटींचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आणले आहे. या प्रकरणात आतापर्यंत १०० हून अधिक बँक खाती सील करण्यात आली आहेत. तेलंगण आणि आंध्र प्रदेशातील काही व्यापारी शेल कंपन्यांच्या मदतीने केसांची अवैध तस्करी करत होते. हे केस हैदराबादहून मिझोराम आणि तिथून म्यानमारमार्गे चीन, बांगलादेश आणि व्हिएतनामला पाठवले जात होते. मिझोरामहून केसांना म्यानमारला पोहोचविणार्या एकाला ‘ईडी’ने अटक केली आहे.
विशेष म्हणजे, तो हे सगळे रॅकेट हवाला आणि चायनिज बेटिंग अॅपद्वारे चालवत होता. केस विकणारे आणि ते खरेदी करणारे यांमध्ये पैशांची देवाणघेवाण एक तर हवालाद्वारे किंवा चायनिज बेटिंग अॅपद्वारे होत होती. दरवर्षी आठ हजार कोटींहून अधिक किमतीच्या केसांची तस्करी होत असल्याचे, ’ईडी’च्या तपासात समोर आले आहे. मिझोराम आणि म्यानमारमार्गे चीनला सर्वात जास्त केस पाठवले गेले. जगात इंडोनेशियानंतर चीन केसांचा सर्वांत मोठा आयातदार आहे. केसांच्या आयातीचा विचार केला, तर यात इंडोनेशियाचा हिस्सा २३.७ टक्के, चीन २२.४, ऑस्ट्रिया ११.३, म्यानमार १०.१ आणि व्हिएतनामची हिस्सेदारी ६.२ टक्के आहे.
चिनी नागरिक केस गळतीने त्रस्त असून, २०२१च्या एका अहवालानुसार, चीनमध्ये प्रत्येक सहा व्यक्तींमागे एकाला केस गळतीची समस्या आहे. यात पुरुषांची संख्या लक्षणीय आहे. चीनमध्ये १६ कोटी पुरूष आणि नऊ कोटी महिलांना केस गळतीची समस्या आहे, म्हणूनच नकली केस, हेअर विगचा बाजार हजारो कोटींवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, चीनमध्ये भारतीय केसांना सर्वाधिक मागणी आहे. जगभरात केसांची निर्यात करणार्या देशांत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय केसांना जगात ’काळे सोने’ म्हणूनही ओळखले जाते. जगभरात केसांच्या निर्यातीत भारताचा हिस्सा ८८.४ टक्के, पाकिस्तान २.८, सिंगापूर २.४, इंडोनेशिया १.३ आणि ब्राझीलचा वाटा १.२ टक्के आहे. शॅम्पू, जेल किंवा रासायनिक गोष्टींचा वापर न झालेल्या केसांना व्हर्जिन क्षेणीत गणले जाते. भारतीय केसदेखील याच श्रेणीत येत असल्याने त्यांना जगभर मागणी असते.
मंदिरात मुंडन केल्यानंतर दान केलेले केस, धार्मिक विधी, श्राद्ध विधी, सलून अशा विविध ठिकाणांहून हे केस संकलित केले जातात. आंध्र प्रदेशातील तिरूपती मंदिरात दरवर्षी १ कोटी, २० लाख भक्त आपले केस दान करतात. ते गोदामात साठवून नंतर लिलावाद्वारे मंदिर संस्थान त्याची विक्री करते. यातून मंदिर समितीला जवळपास वर्षाकाठी १५० कोटींचे उत्पन्न मिळते. अनेक चर्चमध्येही लोकं केस दान करतात, तेदेखील नंतर बाजारात विकले जातात. गावागावात घरोघरी जाऊनही, केस संकलित केले जातात. लहानपणी केसावर फुगे, आता केसावर भांडी दिली जातात, तो याचाच एक भाग.
आता तर काही ठिकाणी केसांवर पैसेसुद्धा दिले जातात. नंतर हे केस मोठ्या शहरात विकले जातात. यानंतर कारखान्यांमध्ये एक ते दोन हजार प्रतिकिलो किमतीत केस विकले जातात. पुढे हेच केस पॉलिश करून, परदेशात २५ ते ७५ हजार प्रतिकिलो रूपयांना विकले जातात. ज्या केसांची लांबी २५ इंच असते, त्या केसांना भारत ३० ते ३३ हजार रूपये प्रतिकिलो किमतीत निर्यात करतो. मात्र, अवैध तस्करीत हे केस फक्त दहा ते १५ हजार प्रतिकिलोने विकले जातात. त्यामुळे भारतात केसांची अवैध तस्करी वाढतेय. भारत केसांचा सर्वांत मोठा निर्यातदार आहे. मात्र, हेच केस चीन खरेदी करून, त्याचे हेअर विग्स बनवतो.
जगातील ७० टक्के हेअर विग्स हे चिनी असतात. म्हणजेच चीन स्वस्तात केस घेऊन, त्याचे हेअर विगसारखे विविध उत्पादने बनवून त्याची विक्री करून भारतापेक्षा अधिक नफा कमावतो. भारत एक किलो केस निर्यात करून ३० हजार मिळवतो, त्याच एक किलो केसांमध्ये पाच हेअर विग बनवून चीन अडीच ते तीन लाख रूपये कमावतो. केसांच्या अवैध तस्करीने चीनला अधिक फायदा मिळतोय. त्यामुळेच ’ईडी’ने या काळ्या सोन्याच्या तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त करून, चीन धार्जिण्या दलालांना दणका दिला आहे.
७०५८५८९७६७