आव्हाने भेदत तिने घेतली उत्तुंग भरारीसमाजात वावरत असताना लोकांच्या बोचर्या नजरा, त्यातच कुटुंबाचे हरपलेले छत्र. मात्र, शिक्षणाचा ध्यास स्वस्थ बसू देत नसल्याने, डोंबिवलीच्या श्रीदेवी लोंढे यांनी पदवी संपादन केली. एवढेच नव्हे, तर मुंबई विद्यापीठातून पदवी संपादन करणारी, पहिली तृतीयपंथी म्हणूनही श्रीदेवी यांना मान मिळाला. तिच्या संघर्षमय प्रवासाविषयी...
श्रीदेवी यांचा जन्म मुंबईतील दादर येथील प्रभादेवी येथे झाला. त्यांचे गाव बेळगावाच्या सीमेवर. तीन भावंडे आणि आई-वडील असे त्यांचे कुटुंब. तशी आर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यांचे बालपण प्रभादेवीतील एका झोपडपट्टीत गेले. श्रीदेवी या मोठ्या होत असताना, आपण इतरांपेक्षा वेगळ्या आहोत, याची जाणीव होऊ लागली. आई-वडिलांना ही अॅबनॉर्मल चाईल्ड आहे, असे वाटले आणि मग आजींनी श्रीदेवी यांना देवदासी समूहामध्ये नेऊन सोडले. श्रीदेवी यांना तेव्हा फार काही समजत नव्हते. पण, आता हेच आयुष्य आहे, अशी त्यांनी मनाची समजूत काढली. श्रीदेवी यांना सुरुवातीपासूनच शिक्षणाची खूप आवड होती. त्यामुळे शिक्षणात खंड पडू देणार नाही, एवढे त्यांनी पक्के ठरविले होते. आठवीला असताना त्यांनी बालवाडी सुरू केली. बालवाडीतील मुलांना शिक्षण दिल्यानंतर, जी मिळकत येत होती, त्यांचा उपयोग त्या आपल्या शिक्षणासाठी करू लागल्या. त्यांचे शालेय शिक्षण दादर येथील छबिलदास शाळेत झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण कीर्ती महाविद्यालयातून झाले.
युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिस्टन्स अॅण्ड ओपन लर्निंगसाठी चार वर्षांपूर्वी नावनोंदणी करणारी, श्रीदेवी ही पहिली महिला होती. विद्यापीठाने ’युजीसी’च्या निर्देशांनुसार, तृतीयपंथीयांसाठी हा अभ्यासक्रम सुरू केला होता. पदवी प्राप्त केल्यानंतर, त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला. शिक्षणासोबतच स्वतःचे पोट भरणे आणि शिक्षणाचा खर्च उचलणे यासाठी धडपड ही सुरूच होती. त्याचबरोबर त्यांनी ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेतले. इंटिरियर डिझाईनचे ही प्रशिक्षण पूर्ण केले. डॉ. पद्मिनी राधाकृष्णन यांच्याकडून श्रीदेवी भरत नाट्यम्चे धडे गिरवत आहे. पण, भरतनाट्यम्साठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने, कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाईन प्रशिक्षण त्या घेतात. ज्या समाजात त्यांची जडणघडण होत होती, त्यांचे अनेक प्रश्न आहेत, हे अगदी जवळून पाहिल्यामुळे, त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची त्यांची इच्छा होती. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्यात शिक्षणाचा अभाव आहे. पण, शिक्षणासाठी कोणालाही जबरदस्ती करता येत नाही. पण, तरीही श्रीदेवी आपल्या कम्युनिटीमध्ये त्यांच्या विकासासाठी अनेक उपक्रमांसह त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी झटत असतात. २००९ मध्ये त्या खर्या अर्थाने सामाजिक कार्यात आल्या.
तृतीयपंथासाठी कल्याणमधील सेंट मारा थॉमो चर्च येथे ’नवोदय’ प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना आहाराविषयी काही समस्या असतील, तर त्या सोडविल्या जातात. त्यांना काही मार्गदर्शन हवे असल्यास, ते दिले जाते. त्यांच्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. एखाद्या तृतीयपंथीची सकारात्मक कहाणी असेल, तर ती इतरांना सांगण्याचे कामही श्रीदेवी करतात. त्यांच्या या कामांमुळे इतर तृतीयपंथी ही प्रभावित होऊन, जीवनाकडे सकारत्मक दृष्टिकोनातून पाहतात. वयोवृद्ध तृतीयपंथीयांच्या समस्या जाणून घेऊन, त्या सोडविण्यासाठी त्या प्रयत्न करतात. तरुण तृतीयपंथीची एक बॅच तयार करून, त्यांनाही मार्गदर्शन त्यांनी केले आहे. हा वांद्रे येथे चालत असे. मुंबईच्या महापौरांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. काही काळ पहिली तृतीयपंथी टीचर म्हणूनसुद्धा काम केले आणि पहिली किन्नर टीचर म्हणून मुंबईमध्ये सेंट मारा थोमा स्कूल तसेच उल्हासनगरमधील शाळेत ऑनलाईन टीचर म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
”तृतीयपंथीयांचे अनेक प्रश्न आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, त्यांना समाज स्वीकारत नाही. त्यामुळे त्यांना नोकरी मिळणे कठीण होऊन जाते. तृतीयपंथीमध्ये ब्युटी आणि फॅशन या संबंधित चांगले कौशल्य असतात. त्या कौशल्याचा वापर करून, प्रशिक्षण घेऊन काही उद्योग-व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला, तरी ग्राहक येतीलच, यांची काही गॅरेंटी नसते. त्यातून अनेकदा त्यांच्यामध्ये नकारात्मक भावना निर्माण होऊन खच्चीकरण होते. तृतीयपंथीना प्रथम त्यांच्या आई-वडिलांनी स्वीकारल पाहिजे. त्यानंतर समाज ही त्यांना स्वीकारेल,” असे श्रीदेवी सांगतात.
मोदी सरकारच्या काळात तृतीयपंथीयांसाठीदेखील अनेक योजना आणल्या. पण, या समाजात शिक्षणाचा अभाव असल्याने, त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. अनेकदा तृतीयपंथीयांची फसवणूक होताना दिसते. त्यातून त्यांच्या वाट्याला एकटेपणाही येतो. पण, चेहर्यावर एक हसू देत, आनंदी जीवन जगण्याचा ते प्रयत्न करत आहे. ‘व्होकेशनल सेंटर’ काढण्याचा त्यांचा मानस आहे. जेणेकरून त्या सेंटरमधून सर्वांना प्रशिक्षण देण्याचे काम करता येईल. तृतीयपंथीयांच्या समस्या सुटाव्यात आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्या श्रीदेवी यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!