'भक्षक' या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटानंतर मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात झळकणार आहे.
मुंबई : अभिनेत्री सई ताम्हणकर ( Sai Tamhankar) हिचा २००८ पासून एकाचवेळी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा प्रवास सुरु झाला. एकामागोमाग एक दर्जेदार कलाकृतींचा ती भाग होत गेली. आणि आज हिंदी चित्रपटसृष्टीत सईने (Sai Tamhankar) आपल्या नावाची सही प्रेक्षकांच्या मनावर कोरुन ठेवली आहे. काही दिवसांपुर्वीच नेटफ्लिक्सवर 'भक्षक' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यात सईने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका केली होती. आता पुन्हा एकदा (Sai Tamhankar) सई ‘डब्बा कार्टेल’ या वेब सीरीजमध्ये दिग्गज महिला कलाकारांसोबत झळकणार आहे.
सई ताम्हणकरसाठी २०२४ हे वर्ष खऱ्या अर्थाने आनंदी आहे असेच म्हणावे लागेल. मराठीतला सईचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट नुकताच गेला होता, त्यामागोमाग अभिनेत्री भूमी पेडणेकरसोबत सई ‘भक्षक’ मध्ये झळकली होती. आता ‘मिमी’, ‘भक्षक’नंतर सई पुन्हा एकदा बॉलीवूड गाजवण्यासाठी सज्ज झाली असून फरहान अख्तरच्या ‘डब्बा कार्टेल’ सीरिजमध्ये सई महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
फरहान अख्तर नेटफ्लिक्सवर ‘डब्बा कार्टेल’ ही वेब सीरीज भेटीला घेऊन येत आहे. ड्रग्जचा अवैध व्यापार या विषयावर आधारित या सीरिजची कथा असणार आहे. या वेब सीरीजमध्ये सई सोबत अभिनेत्री शबाना आझमी, ज्योतिका, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव, लिलैट दुबे आणि जिशू सेनगुप्ता अशा अनेक दिग्गज कलाकारांची फळी दिसणार आहे. दरम्यान, सईने या सीरिजची पहिली झलक शेअर करत लिहिले आहे की, “हा असा डबा आहे की, ज्याला तुम्ही कधीही विसरू शकत नाही.”
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या सीरीजची प्रदर्शनाची तारीख मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, सईने २०२४ या वर्षाची सुरुवात दणक्यात केली असून ‘श्रीदेवी प्रसन्न’, ‘भक्षक’नंतर आता ती ‘डब्बा कार्टेल’मधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी आणि आपल्या अभिनयाचा आणखी एक पैलु प्रेक्षकांसमोर मांडण्यास सज्ज झाली आहे.
सई ताम्हणकर हिने २००८ साली सुभाष घै दिग्दर्शित ‘ब्लॅक एन्ड व्हाईट’ या हिंदी आणि राजीव पाटील दिग्दर्शित ‘सनई चौघडे’ या मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या प्रवासाचा शुभारंभ केला होता. यानंतर तिने ‘हंटर’, ‘दुनियादारी’, ‘धुरळा’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट्स’, अशा अनेक चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारली. शिवाय क्रिती सेनॉन सोबत ‘मिमी’ चित्रपटात काम केल्यानंतर तिला या भूमिकेसाठी IIFA पुरस्कार देखील मिळाला होता.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.