जातियवादी

    08-Feb-2024   
Total Views |
Rahul Gandhi claims PM Modi not OBC by birth

मम्मा बघ, मी म्हटले ना की, मोदी ‘ओबीसी’ नाहीत. पण, मम्मा आपण कोण आहोत गं? म्हणजे नाना म्हणायचे की, आपण काश्मिरी पंडित आहोत. पण, मग माझे आजोबा तर काश्मिरी पंडित नव्हते. पण, आजींनी आजोबांचे आणि नानाचे ‘नेहरू’ नावदेखील लावले नाही. ‘गांधी’ नाव लावले. गांधी म्हणजे ते राजघाटावर जाऊन, समाधीचे दर्शन घेतो ते ‘गांधी’ ना? पण, माझे आजोबा अल्पसंख्याक वर्गवारीत यायचे, म्हणजे माझे बाबा राजीव गांधी अल्पसंख्याक वर्गवारीत होते. पण, बाबांनीदेखील आजोबांचे नाव लावले नाही, ते पण ‘गांधी.’ आजीच्या मुलाने आजीचे नाव लावले. मी कुणाचे नाव लावू? तर माझे नावदेखील आजीने घेतलेल्या आडनावावरून लावले गेले. जाऊ दे, इतका विचार करून, माझे डोकेच दुखले, तर मूळ मुद्दा काय, मी म्हणालो, मोदी ’ओबीसी’ नाहीत!यावर मोदी काहीच म्हणू शकणार नाहीत. कारण, मी कोण आहे, हे ते सिद्धच करू शकणार नाहीत. बघ, मला इटलीला आजीकडे जितके चांगले वाटते, तितके कुठेही वाटते का? तर तुझ्या आणि माझ्या नात्याचा विचार करून, ते मला ख्रिस्तीदेखील म्हणू शकणार नाहीत. कारण, मी गळ्यात जानवं घालून, गोत्रबित्र सांगतो. ते मला हिंदू ब्राह्मण पण म्हणणार नाहीत; कारण दर्ग्यामध्ये चादर चढवताना, सगळ्यात जास्त भक्तिभाव माझ्या चेहर्‍यावर असतो. ईद म्हणू नका, नमाज म्हणू नका, इफ्तार म्हणू नका, मी काही काही सोडत नाही. ते मुसलमानही मला म्हणू शकत नाहीत. कारण, ’भारत जोडो’ यात्रेमध्ये सगळ्यात पहिले मी फादरशी चर्चा करत, आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. तसेही आपल्या खास लोकांमध्ये ख्रिस्ती नेते जास्त आहेत, असे लोक म्हणतात. मग ते कसे म्हणणार की, मी अमूक-अमूक जाती-धर्माचा आहे, तमूक-तमूक जाती-धर्माचा नाही. काय म्हणालात, मोदीच काय कुणीही सज्जन माणूस दुसर्‍या माणसाची वर्गवारी जातीवरून करणार नाही? काय म्हणता, संविधानाने जातिभेद नष्ट करण्याचा कायदेशीर प्रयत्न केला. मात्र, माझ्यासारखे लोक हा ‘ओबीसी’ तो ‘मागासवर्गीय’ म्हणत, जाती जीवंत ठेवतात? काय म्हणता, देशाच्या पंतप्रधानांंचीही जात काढणारा मी जातियवादी आहे?

काळा रंग

 
ग्रेसचा उत्तराखंडचा आमदार आदेशसिंग चौहान याने अयोध्येत नुकतीच प्राणप्रतिष्ठा केलेल्या रामललाच्या मूर्तीच्या रंगाबद्दलही विद्वेष प्रकट केला. चौहान म्हणाला की, ”आम्ही तर ऐकत होतो की, राम सावळे आहेत; पण इथे तर रामाची मूर्ती काळी आहे.” थोडक्यात, रामललाची मूर्ती काळी का? असा रंगभेदी सवाल या चौहानला पडला. पण, त्यात काही नवीन नाही. काळा रंग म्हणजे वाईट! अशा थाटात काँग्रेसवाले सदान्कदा वागत असतात. काय तर म्हणे, संसदेमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष आणि ममता बॅनर्जी पुरस्कृत भावी पंतप्रधान मल्लिकार्जुन खर्गे हे काळा टिळा लावून गेले. मागे ही संसदेचे महत्त्वाचे कार्य सुरू असताना, काँग्रेसवाले काळे कपडे घालून म्हणे, निषेध व्यक्त करत होते.चौहान याच्या म्हणण्यानुसार, रामललाची मूर्ती काळी का? यावर प्रश्न असा आहे की, रामललाची मूर्ती काळी असेल, तर काय झाले? रंगावरून देवत्व सिद्ध होते का? आणि श्वेत रंग हाच काय स्वामित्वाचा रंग आहे? खरे तर श्वेतवर्णीय आणि अश्वेतवर्णीय असा भेदाभेद भारतामध्ये नाही. भारताच्या कोणत्याही संस्कारात आणि संस्कृतीमध्येही अमूक एक काळा रंगाचा म्हणून वाईट ठरवला गेला नव्हता. याचाच अर्थ भारतीय लोक त्वचेच्या रंगावरून भेदाभेद सहसा करत नाहीत. मग त्वचेच्या रंगावरून भेदाभेद होणारी संस्कृती कुठली? तर ’ब्लॅक लाईव्हज मॅटर’च्या चळवळीची गरज पाश्चात्य देशात उभारावी लागते. भारतात नव्हे, इतकेच काय? येशूची क्रूसावर लटकलेली प्रतिमा ही श्वेतरंगाचीच असावी, हा अलिखित नियम! पण भारतात हे नाही. आमचा देव ज्याच्या त्याच्या संकल्पनेतला आहे. तो काळा-गोरा कसाही असू शकतो. चौहान यांनी रामललाच्या मूर्तीबद्दल असा प्रश्न उपस्थित करून, काँग्रेसीच्या मनातील फुटीरतावाद व्यक्त केला आहे. हे लोक मानतात की, काश्मीर ते उत्तरेपर्यंतचे लोक वर्णाने गोरे असतात आणि त्यापुढील राज्यामधील लोक वर्णाने सावळे असतात. गोरे ते आर्य आणि सावळे ते मूलनिवासी अशी यांची भिकारडी वर्गवारी. ही वर्गवारी पुन्हा जनतेमध्ये चर्चिली जावी. मूलनिवासी वगैरे खोट्या कंड्या पुन्हा पिकाव्यात, त्यासाठी काँग्रेसचा हा त्या आमदाराच्या नथीतून मारलेला बाण आहे. काँगेसवाल्यांनो, तुमचा काळा-गोरा भेद तुमच्याकडे ठेवा. इथे सगळे रामभक्तीच्या रंगात रंगलेले आहेत.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.