मूलतः चिनी वंशाचे; पण ऑस्ट्रेलियाचे नागरिक असलेल्या यांग हेंगजून यांना चीनने नुकतीच निलंबित फाशीची शिक्षा सुनावली. निलंबित म्हणजे तत्काळ फाशी होणार नाही; तसेच फाशीची शिक्षा पुढे-मागे रद्द होऊ शकते. यांग हेंगजून यांना दोन वर्षं कारावासाची शिक्षा मिळाली आहे. दोन वर्षं त्यांची वर्तणूक चांगली असेल, तर त्यांची फाशीची शिक्षा रद्द होऊन, त्या बदली आजन्म कारावासाची शिक्षा होणार.
पण, या जर-तरच्या गोष्टी. कारण, हेंगजून हे २०१९ पासून चीनच्या तुरुंगात आहेत. चार वर्षांत त्यांना एकदाही सूर्यप्रकाश दिसलेला नाही. चार वर्षांनंतर त्यांना निलंबित फाशीची शिक्षा सुनावली गेली. दोन वर्षं हेंगजून यांना चांगली वर्तणूक असेल, तर फाशी होणार नाही. पण, चांगली वर्तणूक म्हणजे कशी वर्तणूक? त्या चांगल्या वर्तणुकीचे मापदंड काय? बरं, ते निकषानुसार चांगले जरी वागले, तरीसुद्धा ते वागणे चांगले होते, याची ग्वाही आणि निर्णय कोण करणार? चिनी प्रशासन? जे आधीच हेंगजून यांना अपराधी ठरवून बसले आहे.
त्यामुळे सध्या तरी चीनच्या निलंबित फाशी निर्णयावर जगाचा विश्वास नाही. कारण, विरोधक दिसला रे दिसला की त्याला तुरुंगात डांबण्याची चीनची रीत. जनक्षोभ उसळू नये, म्हणून विरोधकांना कायदा वगैरेचा मुलामा देत शिक्षा द्यायची. मुख्यतः सबंधित विरोधी व्यक्ती ही देशविरोधी होती, असे ठरवूनच टाकायचे. अशी चीनची नीती. देशविरोधी कृत्य करणार्यांचे समर्थन उघड-उघड कोण करणार? कारण, अशा देशद्रोही व्यक्तीचे समर्थन केले की, मग चिनी प्रशासन समर्थन करणार्या व्यक्तीलाही तत्काळ दोषी ठरवून टाकते.
तसेही चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट. धर्म-राजकारण-समाजकारण अगदी चिनी जनतेचे वैयक्तिक कौटुंबिक जीवन, यावरही चिनी शासन देखरेख ठेवते. तशी शासनप्रणाली त्यांनी निर्माण केली. चीनमुळेच ’कोरोना’ जगभर पसरला. मात्र, या ’कोरोना’तून जग हळूहळू सावरले. चीनमध्ये त्यानंतर बराच काळ ’कोरोना’ रेंगाळला. चिनी जनता भयंकर वैतागली. काही लोकांनी विरोध केला; पण चीनने तो विरोध क्रूरपणे मोडीत काढला. या सगळ्या काळात चीनने जनतेवर अनन्वित अत्याचार केले. अशा वेळी जगभरातील प्रसारमाध्यमांनी चीनच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले. चिनी नागरिकांचे हक्क, चीनमधील अल्पसंख्याक समाजाची स्थिती, प्रसारमाध्यमांची परिस्थिती यांवर जगातील मानवी हक्क कार्यकर्ते आणि साहित्यिक, कलाकारांनी आवाज उठवला.
त्या साहित्यिकांपैकी एक म्हणजे यांग हेंगजून. त्यांनी चिनी प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराबद्दल, कायद्याचा धाक दाखवून चीन केलेले जनतेवरचे अत्याचार, लोकांची दयनीय स्थिती, ‘कोरोना’ काळातली चीनची दडपशाही, चीनची अतिविस्तारवादी मनोवृत्ती, त्याचे शेजारील देशांवर होणारे घातक परिणाम, या सगळ्यांबद्दल हेंगजून टिप्पणी करत असत. ते जरी चिनी होते, तरी ऑस्ट्रेलियन नागरिक होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये राहून, चीनविरोधात लिहिण्यामुळे काही धोका होईल, असे त्यांना स्वप्नातही वाटले नाही. मात्र, २०१९ साली यांग हेंगजून चीनमध्ये आले. सोबत पत्नी आणि मुलगा होता. चीनमध्ये पाऊल टाकल्या क्षणी यांग हेंगजून यांना चिनी पोलिसांनी अटक केली. यांग हेंगजून चीनमध्ये हेरगिरी करतात, चिनी एकतेला सुरूंग लागेल, अशी मानसिकता बाळगतात, देशाला अस्थिर करण्यासाठी हेंगजून चिनी सरकारविरोधात षड्यंत्र रचतात, असा आरोप चिनी सरकारने केला.
असो. अमेरिका, जपान आणि भारत या तीनही देशांशी चीनचे संबंध तणावपूर्णच. पण, ’क्वाड’ संघटन करारांतर्गत ऑस्ट्रेलिया या तीन देशांसोबत आला. प्रशांत महासागरामध्ये चीनचा बेकायदेशीर हस्तक्षेप रोखण्यासाठी, ’क्वाड’अंतर्गत या चार देशांचा समूह एकत्रित आला. मग २०२० चीनने ऑस्ट्रेलियाकडून दारू आणि बिफच्या आयातीवर निर्बंध लादले. पुढे दोन्ही देशांचे संबंध तणावपूर्ण होत गेले. अशा काळात यांग हेंगजून या ऑस्ट्रेलियन नागरिकाला चीनने निलंबित फाशीची शिक्षा सुनावली आहे. यांग हेंगजूनची फाशी रद्द व्हावी, त्यांची सुटका व्हावी म्हणून ऑस्ट्रेलिया काय पाऊल उचलेल, याकडे जगभरच्या मानव हक्क कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. पण, भारतात ‘सीएए’, शेतकरी आंदोलनासंदर्भात शाहीनबाग वगैरे आंदोलन करणारे, भारताचे तथाकथित पुरोगामी याबद्दल काही बोलल्याचे ऐकिवात नाही. आहेत का ते?
९५९४९६९६३८