देवेंद्र फडणवीस हे काही दुर्योधन नाही की, उठबसल्या त्यांना संतापच येतो. ते शांत आहेत, संयमी आहेत. जरांगेंच्या भाषणाने ते कधी उत्तेजित होताना दिसत नाहीत. आपल्याविरुद्ध हा राजकीय डाव कोण खेळतो आहे, हे त्यांना पुरेपूर माहीत आहे. ते कोण आहेत, हे आम्ही सांगावे म्हणजे आमचे अतिशहाणपण प्रगट केल्यासारखे होईल. राजकीय बुद्धीबळाचा हा खेळ चालू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या हे लक्षात येत नाही की, या खेळातील आपण एक फक्त प्यादे आहोत.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा विषय बाजूला ठेवून, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भन्नाट आरोप करण्याचे सत्र चालू केले आहे. मनोज जरांगे यांना पवित्र राज्यघटनेने भाषण, विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. त्याचा ते वापर करीत आहेत. ही एक चांगली गोष्ट. पण, आमची त्यांना अशी विनंती की, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना शिव्यांची लाखोली वाहण्याचे जे काम सुरू केले आहे, ते असेच सुरू ठेवावे. त्यामुळे त्यांचे नाव रोज वर्तमानपत्रात झळकत राहील आणि ज्या विविध वृत्तवाहिन्या चालतात, त्यांना रोज बातम्या लागतात, त्या बातम्यांचा पुरवठादेखील निर्धोकपणे चालू राहील.
मनोज जरांगे पाटील यांच्या देवेंद्र फडणवीसांना शिव्याशाप, आव्हाने, एकेरीचा उल्लेख हे जेव्हा आम्ही ऐकतो, तेव्हा आम्हाला ते काही नवीन वाटत नाही. आपले महाभारत अशा सर्व विषयांची खाण आहे. महाभारतात शिशूपालाची कथा आहे. तो श्रीकृष्णाचा आतेभाऊ असतो. त्याच्या जन्माची एक विलक्षण कथा आहे. ती तुम्ही इंटरनेटवर शोधून आवर्जून वाचा. त्याचा शेवट श्रीकृष्णाच्या हातून होणार, अशी नारदवाणी होते. आईने आपल्या भाच्याला विनंती केली की, तू माझ्या मुलाचे 100 अपराध पोटात घाल, त्याला क्षमा कर. जिथे संधी मिळेल तिथे शिशूपाल श्रीकृष्णाचा उपमर्द, अपमान, त्याच्या चारित्र्यावर संशय, श्रीकृष्ण गोकुळात वाढला म्हणून गुराख्याचा मुलगा म्हणून त्याची हेटाळणी, दुसर्या भाषेत त्याची जात काढणे, त्याला आव्हान देणे, ‘जर तुझ्यात काही हिंमत असेल, तर माझ्या अंगाला हात लावून दाख,’ अशी भाषा तो वापरत राहिला.
महाभारतातील श्रीकृष्ण स्थितप्रज्ञ आहे. अपमानाने त्याच्या चेहर्यावर खेद व्यक्त होत नाही आणि सन्मानाने आनंदही व्यक्त होत नाही. तो त्याच्या मूळ स्थितीत कायम असतो. सगळे अपराध तो सहन करीत राहतो. युधिष्ठिराने राजसुय यज्ञ केला. त्यात अग्रपूजेचा मान श्रीकृष्णाला दिला. दुर्योधन आणि शकुनी यांनी शिशूपालाला उकसावले. तोही राजसभेत उभा राहिला आणि श्रीकृष्णाला वाटेल त्या शिव्या देऊ लागला. श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांचे अनैतिक संबंध आहेत, असेही तो म्हणाला. श्रीकृष्ण त्याचे अपराध मोजित राहिला. शेवटी १०० अपराध झाले आणि पुढे काय घडले, हे वाचकांना माहीत आहे.
ही नुसती कथा नाही, या कथेत कालातित राजकीय अर्थ भरलेला आहे. व्यवस्थापन शास्त्रीय अर्थ भरलेला आहे आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीतदेखील संयम का ठेवायचा, हे महाभारतकरांनी फार उत्तमरित्या सांगितले आहे. शिशूपाल राजघराण्यातील होता. चेदी देशाचा तो राजा होता. त्याला रुक्मिणीशी लग्न करायचे होते. रुक्मिणीला तो पसंत नव्हता. तिने श्रीकृष्णाला पत्र पाठवून ‘मला घेऊन जा’ असे सुचविले. श्रीकृष्ण आला आणि त्याने रुक्मिणीहरण केले. या प्रसंगावर नाटक आहे, चित्रपट आहे, बहुतेक वाचकांनी ते पाहिले असतील. शिशूपाल हात चोळीत बसला. महाभारतकारांना हे सांगायचे आहे की, ज्याच्याशी संघर्ष करायचा आहे, त्याच्या शक्तीचा अंदाज घेऊन संघर्ष केला पाहिजे. तो केला नाही, तर त्याचा शिशूपाल होतो.
मनोज जरांगे यांची शक्ती कुठे आहे? त्यांच्या मागे महाराष्ट्रातील दुर्योधन आणि शकुनी कोण आहेत? चाणाक्ष वाचकांनी त्यांचा शोध घेतला पाहिजे. काल-परवापर्यंत कोणालाही माहीत नसलेले मनोज जरांगे सहा महिन्यांतच प्रसिद्धी माध्यमांची सगळी जागा कसे व्यापू शकतात? हा कोणाचा खेळ आहे? त्यांची स्क्रिप्ट कोण तयार करत? तसे बघितले तर मनोज जरांगे यांच्या सगळ्या कायदेशीर मागण्या महाराष्ट्र शासनाने मान्य केल्या. विशेष अधिवेशन भरविण्याची मागणी, कुणबी असलेल्यांची मागणी, आरक्षणाची मागणी, अशा सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत. परंतु, त्यांचे बोलविते धनी त्यांच्याकडे ‘स्क्रिप्ट’ पाठवितात आणि आता ही मागणी करा, ती मागणी करा, अशी मारुतीची शेपटी लांबतच चालली आहे.
मनोज जरांगे पाटील एवढी उत्तेजक भाषा का वापरतात? त्यांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उकसवायचे आहे. शासकीय बळाचा देवेंद्र फडणवीसांनी वापर करावा यासाठी ते सतत आव्हान देत असतात. शासकीय बळाचा वापर झाला की, ज्याच्या विरुद्ध बळ वापरले गेले, त्याच्याविषयी लोकांमध्ये कळत नकळत सहानुभूती निर्माण होते. हिंदीमध्ये एक म्हण आहे, ‘चित भटी मेरी पट भी मेरी, अंटा मेरे बाप का’ ही म्हण जरांगे यांच्या आंदोलनाला लावली, तर देवेंद्र फडणवीस यांच्याविरूद्ध शिवराळ भाषा वापरल्याने त्यांची एक धाडसी नेता म्हणून प्रतिमा तयार होते आणि या भाषेविरूद्ध पोलिसांनी कारवाई केली, तर जनतेमध्ये उदंड सहानुभूती निर्माण होते. म्हणजे ‘चित भी मेरी, पट भी मेरी.’ याला म्हणतात राजकारण.
परंतु, देवेंद्र फडणवीस हे काही दुर्योधन नाही की, उठबसल्या त्यांना संतापच येतो. देवेंद्र फडणवीस शांत आहेत, संयमी आहेत. जरांगेंच्या भाषणाने ते कधी उत्तेजित होताना दिसत नाहीत. आपल्याविरुद्ध हा राजकीय डाव कोण खेळतो आहे, हे त्यांना पुरेपूर माहीत आहे. देवेंद्र फडणवीस कोण आहेत, हे आम्ही सांगावे म्हणजे आमचे अतिशहाणपण प्रगट केल्यासारखे होईल. राजकीय बुद्धीबळाचा हा खेळ चालू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या हे लक्षात येत नाही की, या खेळातील आपण एक फक्त प्यादे आहोत. आपण वजीरही नाही, राजा असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आपल्याला अतिशय कौशल्याने वापरले जात आहे.
आपल्याला कोणी आणि किती वापरावं, हा ज्याचा-त्याचा प्रश्न. मराठा आरक्षणाविषयी राजकीय सहमती आहे. मराठा समाजातील फार मोठ्या वर्गाची ती मागणी आहे. शेवटी लोकशाही सरकार हे लोकांनी लोकांसाठी चालविलेले सरकार असते. म्हणून लोकांची इच्छा तशी असेल, तर त्यातून मार्ग काढला पाहिजे. हा मार्ग राज्यघटनेच्या चौकटीत बसणारा असावा लागतो.
कोणालाही मन मानेल तसे राज्य करता येत नाही आणि मन मानेल तसे कायदे करता येत नाहीत. महाराष्ट्र शासन त्यादृष्टीने प्रामाणिकपणे प्रयत्न करताना दिसते. जनता ते पाहते आहे. फक्त मनोज जरांगेंना ते पाहायचे नाही. आरक्षणाचा आडोसा घेऊन ते दुर्योधन आणि शकुनी यांचे ब्राह्मणविरोधी राजकारण चालवित आहेत आणि त्यातील ते प्यादे झालेले आहेत.
देशातील राजकारणात अशी अनेक प्यादी मागील 75 वर्षांत उभी राहिली. गुजरातचे नवनिर्माण आंदोलन कोणी सुरू केले? आसाममधील घुसखोरांच्या आंदोलनाचा नेता कोण होता? गुजरातमधील आरक्षणविरोधी आंदोलनाचा नेता कोण होता? असा प्रश्न जर विचारला, तर दहा हजार लोकांतील एखादा त्याचे उत्तर देऊ शकेल, मनोज जरांगेंनी त्या वाटेने जायचे ठरविले असल्यास, आपण त्यांना शुभेच्छा देऊया!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.