विदर्भाच्या मातीतून 'तेरवं' सारखे चित्रपट यायला हवेत - नितीन गडकरी
"तेरव" एकल महिलेच्या संघर्षावर चित्रपट लिहून लढण्याची उर्मी देणारा चित्रपट
26-Feb-2024
Total Views |
मुंबई : महिला दिनाच्या निमित्ताने येत्या ८ मार्चला प्रदर्शित होऊ घातलेल्या 'तेरवं' बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर केंद्रीय मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला. विदर्भाच्या मातीतून असे चित्रपट यायला हवेत आणि आपल्या समस्या मांडल्या जायला हव्यात, असे यावेळी नितीन गडकरी म्हणाले.
विदर्भ मराठवाडा खानदेश या कापूसपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होतात. हा एक अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि 'कॉटन सॉईल तंत्र' या विषयावर या संदर्भात काम होणे गरजेचे आहे; पण श्याम पेठकर यांनी याआधी 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या विषय अत्यंत परिणामकारक पद्धतीने मांडला होता आणि आता आगामी "तेरव" या चित्रपटातून त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील त्या शेतकऱ्याची मागे एकटी उरलेली पत्नी म्हणजे एकल महिला यांच्या संघर्षावर चित्रपट लिहून लढण्याची उर्मी देणारा चित्रपट निर्माण केलेला आहे. विदर्भातील प्रयोगशील नाट्यदिग्दर्शक हरीश इथापे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन उत्तमपणे केलेले आहे. व्यावसायिक कमाई करू न देणाऱ्या चित्रपटाच्या मागे निर्माता म्हणून उभे राहण्याची संवेदनशीलता 'अंजनी कृपा प्रोडक्शनच्या' माध्यमातून निर्माता नरेंद्र जीचकर यांनी दाखवली याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि हा चित्रपट सगळ्यांनी आवर्जून बघावा, असे आवाहन करतो”, असे नितीन गडकरी म्हणाले. हा चित्रपट पूर्णतः विदर्भाच्या भाषेत आणि ९० % च्या वर विदर्भीय कलावंत घेऊन करण्यात आलेला आहे. चित्रपटाचे छायांकन सुप्रसिद्ध छायाचित्रणकार सुरेश देशमाने यांनी अत्यंत तळमळीने आणि आस्थेने केले, असे श्याम पेठकर म्हणाले.
'तेरवं' हा चित्रपट आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकल महिलांच्या जीवन संघर्षावर घेतलेला आहे आणि त्या संकटांना न घाबरता कसा लढा देतात हे या चित्रपटात दाखवले आहे. चित्रपटात किरण खोजे, संदीप पाठक, किरण माने, नेहा दंडाळे या प्रस्थापित कलावंतांसह विदर्भातील मधुभैया जोशी, श्रद्धा तेलंग, प्रभाकर आंबोने, वत्सला पोलकमवार, प्रवीण इंगळे, देवेंद्र लुटे, यशवंत चोपडे, शर्वरी पेठकर, संहिता इथापे, वैदेही चौरे, दिलीप देवरणकर या कलावंतांनी भूमिका केल्या आहेत. सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी दिवंगत शंकर बडे यांच्या कवितेला गाण्याचा साज देण्यात आलेला आहे. चित्रपटाचे थीम सॉंग ज्ञानेश वाकुडकर यांनी लिहिले आहे. महत्त्वाचे म्हणजे नाटकाप्रमाणेच या चित्रपटात देखील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला व मुलींनी अत्यंत भूमिका केलेल्या आहेत.