"सावरकर तिथे ११ वर्षे बंदीवासात होते, मी २० मिनिटेही थांबू शकलो नाही!" रणदीप हुड्डानं जागवल्या आठवणी
26-Feb-2024
Total Views |
मुंबई : स्वातंत्र्य वीर सावरकर यांची आज दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी. स्वातंत्र्यासाठी जिद्दीने लढा देणाऱ्या वीर सावरकरांची जीवनगाथा अभिनेता रणदीप हुड्डा त्यांच्या आगामी ‘वीर सावरकर’ या चित्रपटात मांडणार आहे. सावरकरांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन करत रणदीपने सावरकरांनी जेथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली त्या तुरुंगवासातील मनाला हेलकावून टाकणाऱ्या आठवणी जागवल्या. तो म्हणाला की, “सावरकरांना तिथे ११ वर्ष बंदीवासात ठेवले होते त्या ७ बाय ११ च्या काळोख्या खोलीत मी स्वत:ला बंदिस्त केले, पण मी २० मिनिटांच्यावर तिथे तग धरु शकलो नाही”.
काय म्हणाला रणदीप हुड्डा?
रणदीप हुड्डा याने वीर सावरकर यांना पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवान करत आपल्या त्यांच्याप्रती असलेल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या. तो म्हणाला, “ भारतमातेच्या थोर सुपुत्रांपैकी एकाची आज पुण्यतिथी आहे ते म्हणजे नेते, निर्भय स्वातंत्र्यसैनिक, लेखक, तत्त्वज्ञ आणि द्रष्टे वीर सावरकर. सावरकरांनी त्यांच्या चातुर्य, बुद्धिमत्ता आणि धैर्याने इंग्रजांना इतके घाबरवले होते की त्यांना इंग्रजांनी ७ बाय ११ फुटांच्या तुरुंगात जवळपास ५० वर्षांसाठी डांबून ठेवले होते. वीर सावरकर या त्यांच्या चरित्रपटासाठी ज्यावेळी संशोधन आणि रेकी करत होतो त्यावेळी मी स्वतःला त्या कोनाड्या सेलमध्ये बंद करण्याचा प्रयत्न केला. कारण मला समजून घ्यायचे होते त्यावेळी सावरकरांची काय मनस्थिती असेल. पण खरं सांगतो, त्या सेलमध्ये मी २० मिनिटे देखील बंद राहू शकलो नाही.
Today is the punyatithi of one of the greatest sons of Bharat Mata. Leader, Fearless Freedom Fighter, Writer, Philosopher & Visionary #SawatantryaVeerSavarkar. A man whose towering intellect and fierce courage scared the British so much that they locked him in this 7 by 11 foot… pic.twitter.com/vzHq2GO2BN
तुरुंगवासातील क्रूरता आणि अमानुष परिस्थिती सहन करणाऱ्या आणि तरीही सशस्त्र क्रांती घडवण्यास आणि प्रेरणा देणाऱ्या वीरसावरकरांच्या अतुलनीय सहनशक्तीची मी कल्पना केली. त्यांची चिकाटी आणि देशाप्रती त्यांचे योगदान अतुलनीय असून अनेक दशकांपासून भारतविरोधी शक्ती आजही त्यांची बदनामी करत आहेत. नमन!”
‘वीर सावरकर’ या सावरकरांच्या चरित्रपटाच्या निमित्ताने रणदीप हुड्डा दिग्दर्शकिय क्षेत्रात पदार्पण करत आहे. तसेच, या चित्रपटात स्वातंत्र्य वीर सावरकर यांची व्यक्तिरेखा देखील रणदीपच साकारणार आहे. देशभरात हा चित्रपट २२ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.