सशक्त भारताचे ‘मिशन जटायू’

    25-Feb-2024   
Total Views |
Article on Mission Jatayu
 
सशक्त भारत शांत आणि सुरक्षित विश्वाचा मार्ग प्रशस्त करतोय. भारत बळ आणि बदल या दोन्ही गोष्टींना सोबत घेऊन चालला आहे. ‘को अति भारः समर्थानां’ म्हणजे जो समर्थ आहे, त्याला अतिभाराचा काहीही फरक पडत नाही. हिंद महासागर आणि अरबी समुद्रात नौसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या युद्ध सरावामुळे चीन आणि पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. जगातील जवळपास ५० टक्के नौदल शक्ती भारतीय नौदलाच्या नेतृत्वात युद्धाभ्यास करत आहे. स्वतःला समुद्राचा सिकंदर समजणारा, विस्तारवादी देश चीन आता एकटा पडला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुद्रातील चिनी चालींना नापाक करण्यासाठी, पुढील योजनादेखील तयार केली आहे. पुढील महिन्यात लक्षद्वीप येथील मिनिकॉय बेटावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पोहोचतील. यावेळी ते नव्या नौदल तळाचे उद्घाटन करतील. याच ठिकाणी एक नवीन विमानतळ आणि एअरफिल्ड तयार केले जात आहे. इथून लढाऊ विमाने, सैन्य विमाने, खासगी विमाने उड्डाण भरतील. अगत्ती बेटावरवरही नवे हवाई तळ, कवरत्तीमध्ये नवे हवाईतळ उभारले जाणार आहे. लक्षद्वीपमध्ये नवे नौदल आणि हवाई तळ तयार झाल्याने भारताची सामरिक आणि रणनीतिक शक्ती कित्येक पटीने वाढण्यास निश्चित मदत होणार आहे.
 
स्वातंत्र्याच्या अमृतकाळात विकसित भारताच्या निर्माणात लक्षद्वीपची मोठी भूमिका असणार आहे. त्यामुळे मोदी सरकार लक्षद्वीपकडे विशेष लक्ष देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील महिन्यात दि. ३ जानेवारी रोजी लक्षद्वीपचा केलेला दौरा हा त्याचाच एक भाग होता. आता दोन नवे नौदल तळ आणि एक मोठे हवाई तळ बांधून, समुद्री क्षेत्रात चीनला चित करण्याची योजना आखली जात आहे.

चीन मालदीवच्या एका बेटावर समुद्री हेरगिरी केंद्र उभारण्याचा प्रयत्न करतोय. मालदीव सरकारने काही दिवसांपूर्वी चीनसोबत अनेक गुप्त करार केले आहेत. मालदीवसोबत झालेल्या करारांनंतर चीनने मालदीवच्या क्षेत्रात आपली जहाजे तैनात करण्यास सुरुवात केली आहे. श्रीलंकेला आपल्या बाजूने वळविण्यात चीनला अपयश आल्याने, आता चीनकडून मालदीवला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, चीनच्या नापाक चालींना सडेतोड उत्तर देण्यासाठी, भारताने ’ऑपरेशन जटायू’ हाती घेत, चिनी जलमार्ग बंद केला आहे. या ऑपरेशनअंतर्गत मालदीवपासून ५२४ किमी दूर ’आयएनएस जटायू’ नौदल तळ तयार झाले आहे. या तळावर भारतीय नौदलाच्या १५ युद्धनौका कायम तैनात असतील.

एवढेच नव्हे तर ‘आयएनएस जटायू’, ’आयएनएस विक्रमादित्य’ आणि ‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकांचेही तळ तयार केले जाणार आहे. मिनिकॉय बेटांचा समूह तिरूवनंतपुरमपासून ४२५ किमी दूर आहे. या ठिकाणाहून भारतीय लढाऊ विमाने उड्डाण भरतील, तेव्हा भारताची ताकद संपूर्ण जग पाहील. तसेच या परिसरातील चीनच्या नापाक चालींनाही पूर्णविराम मिळेल. चीन आणि मालदीवच्या राष्ट्रपतींची भारताच्या ‘आयएनएस जटायू’ने चांगलीच झोप उडवली आहे. दरम्यान, ’आयएनएस जटायू’ नौदल तळ जवळपास पूर्ण झाले आहे. दि. ४ किंवा ५ मार्च रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ‘आयएनएस विक्रमादित्य’ किंवा ‘विक्रांत’वर स्वार होतील, तेव्हा त्यांच्यासोबत १५ अन्य युद्धनौका असतील. याद्वारे चीन आणि मालदीवला कठोर संदेश दिला जाणार आहे. चीन मालदीवचा आधार घेऊन, भारताला घेरण्याचा प्रयत्न करतोय.

मात्र, आता भारताकडूनही चीनला जशास तसे उत्तर दिले जात आहे. फक्त मिनिकॉय बेट नव्हे, तर लक्षद्वीपच्या अगत्ती बेटावर सध्याच्या एअरस्ट्रिपलाही अद्ययावत केले जात आहे. जेणेकरून मोठी विमाने आणि लढाऊ विमानांना नियंत्रित करणे सोपे होईल. लक्षद्वीप ३६ छोट्या सुंदर बेटांचा समूह आहे. केरळच्या कोचीपासून ४४० किमी दूर लक्षद्वीपची ही छोटी बेटे रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. ६४ हजार लोकसंख्या असलेल्या लक्षद्वीपमध्ये ९५ टक्के नागरिक मुस्लीम आहेत. लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे ९ डिग्री चॅनलमध्ये येतात. जिथून अरबो डॉलरचा समुद्री व्यापार होतो. हा पूर्ण भाग दक्षिण पूर्व आशिया आणि उत्तर आशियातील देश जसे की चीन, जपान आणि दक्षिण कोरियाला आखाती देशांना आणि युरोपला जोडतो. त्यामुळेच आर्थिक आणि संरक्षण या दोन्हींसाठी लक्षद्वीप भारतासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठीचे मोदी सरकारने ‘मिशन जटायू’ हाती घेतले आहे.

७०५८५८९७६७
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.