SNDT महिला विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु!

    24-Feb-2024
Total Views |

SNDT


मुंबई :
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (SNDT), दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. बी.ए., बी.कॉम., एम.ए. आणि एम.कॉम. या दूरस्थ शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी शुक्रवार, दिनांक २३/०२/२०२४ पासून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
 
दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रामध्ये एम.ए. मराठी, एम.ए. हिंदी. एम.ए. इंग्रजी, एम.ए. अर्थशास्त्र, एम.ए. राज्यशास्त्र, एम.ए. इतिहास, एम.ए. समाजशास्त्र हे विषय उपलब्ध आहेत. तसेच बी.ए. पदवीकरिता मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास इत्यादी विषयांचे पर्याय विद्यार्थिनींना उपलब्ध आहेत.
 
केंद्राच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, भटक्या जमाती व विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग या राखीव प्रवर्गातील पात्र विद्यार्थिनींना महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार भारत सरकारच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो. तसेच प्रवेशित विद्यार्थिनींना ऑनलाईन माध्यमातून अभ्यास साहित्य आणि ऑनलाईन तासिकांच्या द्वारे मार्गदर्शनपर व्याख्याने उपलब्ध करून दिली जातील.
 
विद्यार्थिनींना मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषा माध्यमातून परीक्षा देता येणार असून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध परीक्षा केंद्र असतील. प्रवेशासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता आणि शैक्षणिक शुल्क याबाबतच्या तपशीलासाठी विद्यार्थिनी दूरस्थ शिक्षण केंद्राच्या https://sndtoa.digitaluniversity.ac/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकतात.
 
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचे अभ्यासक्रम हे विद्यापीठ अनुदान आयोग मान्यता प्राप्त असून यातून प्राप्त होणारी पदवी नियमित अभ्यासक्रमांच्या पदवीशी समकक्ष आहे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे गृहिणी तसेच नोकरी करणाऱ्या अथवा उद्योजक महिलांना दूरस्थ शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन आपले उच्च शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध आहे. माहिती केंद्राच्या संचालक डॉ. स्मृति भोसले यांनी ही माहिती दिली आहे.