पॅलेस्टाईनच्या लोकांना सशस्त्र संघर्ष करण्याचा अधिकार आहे; कारण गाझापट्टीमध्ये इस्रायलने हल्ले सुरू ठेवले आहेत,” असे चीनच्या विदेश मंत्रालयाचे कायदा सल्लागार मा शिनमिन यांनी अधिकृतरित्या म्हटले आणि पॅलेस्टाईन आणि त्याअंतर्गत ’हमास’चे समर्थनही त्यांनी केले.
चीनच्या मते, इस्रायलने पॅलेस्टाईनवर, गाझापट्टीवर कारवाई करू नये. ’लोकासांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण’ ही म्हण चीनला अगदी तंतोतंत शोभते. पॅलेस्टाईनच्या आड ’हमास’चे समर्थन करताना, चीनला मानवी हक्क सूचतात. मग तिबेट असो की, हाँगकाँग की, तैवान येथील नागरिकांवर क्रूर अत्याचार करताना, चीनची मानवता कुठे जाते? इतकेच काय? चीनमधल्या अराजकतेविरोधात आंदोलन करणे, तर सोडाच साधा ब्र शब्द उच्चारणार्यासोबत चीनने काय केले?
देशद्रोही ठरवून चीनने अनेक निष्पाप नागरिकांना तुरुंगात डांबले. हे निष्पाप लोक काय माणसं नाहीत? उघूर मुसलामानांसाठी खास तयार केलेली छळछावणी चीनमध्येच आहे. चिनी प्रशासन उघूर मुस्लिमांवर जे अत्याचार करतात, त्या अत्याचाराची एक भयंकर यादीच तयार होईल. अर्थात, याबद्दल जगभरातले एकजूट झालेले ५७ मुस्लीम देशही चकार शब्द उच्चारत नाहीत. दुसरीकडे, चीनमध्ये जगातील सगळ्याच धर्मांची लोक राहतात. मात्र, या सगळ्या धर्मांच्या लोकांना चिनी कम्युनिस्ट राजवटीप्रमाणे जगावे लागते. चीन स्वतः असा मानवी हक्काविरोधात वागतो. मात्र, इस्रायलला मानवता धर्म शिकवायला पुढे जातो. काय म्हणावे याला? जागतिक पटलावर चीनची कूकर्म पाहिले, अतिविस्तारवादी महत्त्वाकांक्षेपोटी केलेली कारस्थान पाहिली की वाटते, चीनची मानवता, बंधुता हा शब्द उच्चारण्याचीही पात्रता नाही.
सध्या चीनला ’हमास’चा पुळका आला आहे. दि. ७ ऑक्टोबर रोजी ’हमास’ने केलेला क्रूर आणि तितकाच भ्याड हल्ला सगळ्या जगाने पाहिला. मृत की अर्धमेली झालेली ती नग्न युवती, तिला जिपवर बांधून ’हमास’च्या राक्षसांनी केलेली, ती अत्यंत अमानवी परेड, शेकडो इस्रायली नागरिकांना बंधक बनवून, त्यांचे केलेले अपहरण. तो क्रूर हल्ला आणि त्यात मृत, जखमी झालेले ते इस्रायली नागरिक. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या बातम्या आठवतात. दि. ७ ऑक्टोबर रोजी ’हमास’चे अतिरेकी इस्रायलच्या एका घरात घुसले. तिथे १३ वर्षांची मुलगी अभ्यास करत होती. त्यांना पाहताच ती घाबरून रडू लागली, ती म्हणत होती की, ”मला मारू नका, उद्या माझी परीक्षा आहे. मला शाळेत जायचे आहे.”
पण, त्या राक्षसांनी तिच्यावर क्रूर लैंगिक अत्याचार करून, तिला मारून टाकले. दुसरी बातमी-लहान बालकांना एका रांगेत उभे करून, त्यांचे शीर कापले. तिसरी बातमी-इस्रायलने एका मोबाईल संभाषणाची रेकॉर्ड जाहीर केली. त्यात ’हमास’ दहशतवादी त्याच्या आई-बाबांना सांगत होता की, आता तो कसा इस्रायलमध्ये घुसला आहे, समोरच्या घरातल्या लोक कशी घाबरली आहेत. त्यांच्यावर कसे अत्याचार करून, तो मारणार आहे. नंतर आरोळ्या, भयप्रद किंचाळ्या रडणे ऐकू येते. नंतर तो दहशतवादी म्हणतो, ऐकल्या ना किंकाळ्या? यावर ते आईबाप खूश होतात. यहुद्यांना मारले मोठे पुण्याचे काम केले, असे म्हणतात.
नुकतेच इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने ’हमास’च्या अतिरेक्यांनी केलेली क्रूरतेबद्दल पुराव्यासकट अहवाल सादर केला. त्यातून असे निष्पन्न होते की, बंधक बनवलेल्या बालक, स्त्री-पुरुषांवर ’हमास’च्या दहशतवाद्यांनी त्यांच्या कुटुंबासमोर अत्याचार केले गेले. त्यांच्या गुप्तांगावर बंदुकीने गोळ्या झाडल्या. स्त्रियांच्या योनीत ग्रेनेड टाकले. लिहितानाही अपार दुःख आणि संताप होत आहे, असे हे ’हमास’चे दहशतवादी. आज चीनला त्यांच्याबाबत मानवता आठवली आहे. अर्थात, ’हमास’ने जाहीर केले की, त्यांनी बंधक बनवलेल्या कुणाही इस्रायली नागरिकांवर अत्याचार केलेला नाही.
मात्र, सुटून आलेल्या बंधकांची वैद्यकीय तपासणी केली गेली. त्यातून सिद्धच झाले की, त्यांना त्रास दिला गेला होता. दुसरीकडे दिवसा पत्रकाराचा मुखवटा घालून, रात्री दहशतवादी कारवाया करणारे, ’हमास’चे अतिरेकी किंवा ’संयुक्त राष्ट्रसंघा’कडून आलेली मदत पदरात पाडून, रात्री दहशतवादी बनत रस्त्यावर उतरणारे, गाझापट्टीतले नागरिकही जगाने पाहिले. त्यामुळे तर अमेरिका, युरोपसहित अनेक पाश्चात्य राष्ट्रांनी ‘संयुक्त राष्ट्र संघा’ला गाझा पट्टीसाठी मदत देण्यास नकार दिला. या अशा पार्श्वभूमीवर चीनने गाझापट्टीतल्या लोकांच्या अधिकाराबाबत बोलणे म्हणजे चोराने चोराची साक्ष देणे, असेच म्हणावे लागेल.
९५९४९६९६३८