"माझा निर्णय चुकीचा असेल तर..."; राष्ट्रवादी अपात्रता निकालावर नार्वेकरांची प्रतिक्रिया

    22-Feb-2024
Total Views |

Rahul Narvekar


मुंबई :
माझं निर्णय घटनेला धरून आहे हे त्यांनाही माहिती आहे. पण माझा निर्णय चुकीचा आणि कुणाच्या प्रभावाखाली घेतलेला असेल तर त्यांनी दाखवून द्यावं, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेबाबत नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही गट न्यायालयात गेले आहेत. यावर आता राहूल नार्वेकरांनी आपली प्रतिक्रिया दिली.
 
राहूल नार्वेकर म्हणाले की, "सहसा निर्णय दिल्यानंतर दोन्ही गटाला न्याय मिळालेला असतानाही एखाद्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाद मागणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मी दिलेला निकाल हा घटनेला धरून आहे. हा निर्णय अत्यंत शाश्वत आहे. यामागची कारणं आणि वस्तुस्थितीबाबत माझ्या निर्णयात उल्लेख केलेला आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारे घटनाबाह्य किंवा नियमबाह्यपणा दिसतो असं मला वाटत नाही."
 
ते पुढे म्हणाले की, "निर्णयप्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी हेतुपुरत्सर संबंध नसलेल्या गोष्टी वारंवार बोलल्या जात होत्या. पण माझा निर्णय चुकीचा आणि कुणाच्या प्रभावाखाली घेतलेला असेल तर त्यांनी दाखवून द्यावं. माझं निर्णय घटनेला धरून आहे हे त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे केवळ बिनबुडाचे आरोप करणं त्यांच्यासाठी सर्वात सोयीस्कर आहे," असेही ते म्हणाले.