ध्यास दुर्मीळ प्रजातींच्या संवर्धनाचा...

    21-Feb-2024   
Total Views |
Article on dr amit mirgal

पेशाने वनस्पतीशास्त्रज्ञ, प्राध्यापक त्याचबरोबर, निष्ठावंत संशोधक, संवर्धक आणि पर्यावरण सल्लागार अशी ओळख असलेल्या डॉ. अमित मिर्गळ यांच्या वनस्पती आणि पर्यावरण क्षेत्रातील प्रवासाविषयी...

कोकणात प्रदेशनिष्ठ असलेल्या ‘दिपकाडी’ या एका सुंदर फुलाच्या प्रजातीचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या दृष्टीने संशोधनासाठी आपल्या आयुष्याचे एक तप खर्ची घालणार्‍या डॉ. अमित बळवंत मिर्गळ यांचा जन्म संगमेश्वरचा. मात्र, वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचे बालपण सांगलीत गेले. अगदी पदवीपर्यंतचे शिक्षण सांगलीत पूर्ण झालेल्या अमित यांना पहिल्यापासूनच विज्ञान आणि पर्यावरण या विषयात रस होता. म्हणूनच, विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेऊन त्यांनी ‘बॉटनी’ म्हणजेच वनस्पतीशास्त्रामध्ये आपली पदवी पूर्ण केली. त्यानंतर कोल्हापूरच्या प्रसिद्ध शिवाजी विद्यापीठामध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेतला आणि त्यांचे अहोभाग्य म्हणून त्यांना ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. श्रीरंग यादव प्राध्यापक म्हणून लाभले. त्यांचे विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमान वाटतो, असे म्हणणार्‍या अमित यांनी त्यांच्याकडून उत्तम शिकवण घेत, संवर्धनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. पदव्युत्तर पदवी आणि पुढे वनस्पतीशास्त्र विषय घेऊन कोकणात आढळणार्‍या प्रदेशनिष्ठ दुर्मीळ, संकटग्रस्त असलेल्या प्रजातींवर संशोधन करून त्यांची ‘पीएच.डी’ही त्यांनी याच विद्यापीठातून पूर्ण केली. यामध्ये ‘सराका अशोका’, ‘सलॅकिया कायनेन्सीस’ (कोकणात प्रदेशनिष्ठ असलेली एक औषधी वनस्पती) आणि ‘चांदफळ’ या तीन प्रजातींवर त्यांनी काम केले. यामध्ये या प्रजातींचा अधिवास, त्यांची संख्या असा सर्वसमावेशक अभ्यास होता.

आपल्या आयुष्याची तब्बल 12-13 वर्षं एका प्रजातीच्या संवर्धनासाठी, तिच्यावरील संशोधनासाठी डॉ. अमित यांनी खर्ची घातली. कोकणातील रत्नागिरीमध्ये आढळणारी ‘दिपकाडी’ ही ती प्रजात. ‘दिपकाडी कोकनेन्सीस’ असे शास्त्रीय नाव असलेली ही प्रजात धोक्यात आहे, असे त्यांनी निदर्शनास आणले. या प्रजातीचा ‘आययुसीएन’च्या लाल यादीत समावेश करण्यापर्यंत अमित यांनी दिवसरात्र मेहनत घेतली.

शिक्षणानंतर 2007 साली पुन्हा कोकणात परत येत दापोलीच्या कृषी विद्यापीठामध्ये त्यांनी प्राध्यापकाची नोकरी घेतली. त्यानंतर जवळजवळ दहा वर्ष म्हणजेच 2018 पर्यंत त्यांनी या कृषी विद्यापीठामध्ये काम केले. 2018 नंतर रत्नागिरी शहरामध्ये असलेल्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्यांनी नोकरी केली. दरम्यानच्या काळात गुजरातमधून कामाची चांगली संधी मिळाल्यानंतर त्यांनी ते काम स्वीकारले आणि तीन वर्ष तिथे काम केले. पुढे डिसेंबर 2022 मध्ये मुंबई गाठत त्यांनी इथे काम सुरू केले. गेल्या दोन वर्षांपासून ‘बिल्डिंग एनव्हायर्नमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीमध्ये ‘एनव्हायर्नमेंट कन्सलटंट’ अर्थात पर्यावरण सल्लागार म्हणून ते कार्यरत असून, विविध प्रकारच्या रस्ते किंवा विकास प्रकल्पांमध्ये असणारे वन परवानग्या, सीआरझेड परवानग्या असे काम करून दिले जाते.

‘दिपकाडी कोकनेन्सीस’ आणि ‘दिपकाडी गोआन्सेसीस’ या दोन प्रजातींवर त्यांचा प्रदीर्घ अभ्यास आहे. ‘दिपकाडी’ ही वनस्पती अमित यांनी जवळपास 120 वर्षांनंतर ‘रि-आयडेन्टीफाय’ म्हणजेच तिची पुन्हा ओळख करून दिली होती. या कामामुळे दुर्मीळ आणि प्रदेशनिष्ठ असलेल्या या प्रजातीची ओळख निर्माण होऊन, तिच्याविषयी जनजागृती निर्माण होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत झाली. या अनुषंगाने गेल्या दोन वर्षांत देवरूखमध्ये ‘दिपकाडी महोत्सव’ ही साजरा करण्यात आला. ‘दिपकाडी’सारखेच त्यांनी ‘नरक्या’ या वनस्पतीवरही बरेच मोठे संशोधन आणि संवर्धनात्मक काम केले.

‘आययुसीएन’ म्हणजेच ‘इंटरनॅशल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ या संस्थेचा एक कोर्स करत सध्या ते जगप्रसिद्ध ‘आययुसीएन’च्या लाल यादीत ’रेड लिस्ट असेसर’ म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या वनस्पतीशास्त्रातील औषधी वनस्पतींवर केलेल्या एका संशोधन अहवालासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. सध्या हवामान बदल हा वैश्विक पातळीवरील एक गंभीर विषय. त्यामुळेच त्या अनुषंगाने ‘कार्बन क्रेडिट’, ‘ग्रीन क्रेडिट’ यांसारख्या विषयांवरही ते काम करत असून, त्याबरोबरच वृक्ष लागवडीसारखे इतर छोटे-मोठे प्रकल्प त्यांनी हाती घेतले आहेत. एखाद्या प्रकल्पामध्ये झाडे छाटली गेल्यास किंवा ती उपटून दुसरीकडे रोपण केल्यास, त्याची जगण्याची शक्यता कमी असते.

म्हणूनच त्याला पर्याय किंवा नवीन वृक्षांची लागवड असे उपक्रम राबवित, झाडांची संख्या योग्य ठेवण्यासाठी ते काम करतात. अशाप्रकारे त्यांचे संवर्धनाचे काम अविरतपणे सुरू आहे. संवर्धन प्रक्रियेतील ‘एक्सिटो’ आणि ‘इन्सिटो’ या दोन्ही संवर्धन प्रकारांपैकी मला ‘इन्सिटो कॉन्झर्व्हेशन महत्त्वाचे वाटते, असे ते सांगतात. याचे कारण, एखादी प्रजात ज्या स्थानिक प्रदेशातील असेल तिथेच तिचे संवर्धन होणे फायदेशीर ठरते, असे त्यांचे ठाम मत. वैयक्तिक आणि संस्था अशा दोन्ही पातळ्यांवर पर्यावरणासाठी, जैवविविधतेसाठी लढणार्‍या, संरक्षण करणार्‍या या संवर्धकाचे काम बहरत जावो, या यानिमित्ताने शुभेच्छा!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.