नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ तिसऱ्या कार्यकाळात भारत दहशतवाद, नक्षलवाद आणि फुटीरतावादमुक्त होईल, असा विश्वास देशाचे गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी भाजप राष्ट्रीय अधिवेशनात रविवारी मांडला.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'भाजप - देश की आशा, विपक्ष की हताशा' असा प्रस्ताव राष्ट्रीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मांडला. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशास सामूहिक न्यूनगंडातून बाहेर काढले. गुलामगिरीच्या प्रतिकांपासून सुटका करून विकासाचे राजकारण प्रस्थापित केले. गेल्या १० वर्षांत देशाचा चौफेर विकास झाला आहे. त्याचप्रमाणे आता दहशतवाद, नक्षलवाद आणि फुटीरतावाद अखेरचा श्वास मोजत असून पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत या तिन्ही समस्यांपासून मुक्त होईल; अशी ग्वाही गृहमंत्री शाह यांनी दिली.
देशात महाभारतातप्रमाणे दोन गट पडले असल्याचे शाह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, पहिला गट म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील घमंडीया आघाडीचा आणि दुसरा म्हणजे भाजप आणि मोदींच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा. देशातील भ्रष्टाचाराचा जनक असलेल्या काँग्रेस पक्षाचे साथीदारही भ्रष्टाचारीच आहेत. भ्रष्टाचाराचे पोषण करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. काँग्रेसने जमीन - पाणी - पाताळ आणि अंतराळातही भ्रष्टाचार केला आहे. त्याउलट गेली १० वर्षे आणि त्यापूर्वीही १३ वर्षे नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. काँग्रेसची सर्व आंदोलने ही सत्तेसाठी असतात तर भाजपचे प्रत्येक आंदोलन हे देशासाठी असते. त्यामुळे राष्ट्रविकास हेच भाजपचे धोरण आहे, असेही गृहमंत्री शाह यांनी यावेळी नमूद केले.
देशाच्या महानतेस काँग्रेसने नाकारले
काँग्रेसने श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा निमंत्रण नाकारून केवळ ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होणेच नाकारले नसून देशाला महान बनवण्याच्या प्रक्रियेपासूनही अंतर राखले आहे. मात्र, देशातील जनता सर्वकाही पाहत असून लक्षातही ठेवत आहे, असा इशारा शाह यांनी काँग्रेसला दिला.
तीन महिन्यांची सुटी विरूध्द २३ वर्षे अविरत काम
एकीकडे दरवर्षी परदेशात तब्बल ३ महिने सुटी घालवण्यासाठी जाणारे आणि घराणेशाहीचे नेते राहुल गांधी आहेत तर दुसरीकडे गेली २३ वर्षे एकही दिवस सुटी न घेता जनसेवा करणारे आणि विकासाची आघाडी सांभाळणारे नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आहे. त्यामुळे देशातील जनता योग्यच निर्णय घेईल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.
मुलांचे कल्याण हेच एकमेव लक्ष्य
सोनिया गांधींना आपल्या मुलास पंतप्रधान करायचे आहे, शरद पवारांना आपल्या मुलीस, ममतांना आपल्या पुतण्यास मुख्यमंत्री करायचे आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना आपल्या मुलास, स्टॅलिन यांना आपल्या मुलास आणि लालूंनाही आपल्या मुलास मुख्यमंत्री करायचे आहे. त्यामुळे या एका कुटुंबाच्या पक्षास देशाच्या विकासाशी देणेघेणे नाही, असा टोला शाह यांना लगावला.