नवी दिल्ली : पुरोगामित्व म्हणजे नेमके काय, पुरोगामी भूमिका खरोखरच तशी राहिली आहे का; असे प्रश्न विचारण्याची वेळ आली असल्याचे मत लेखक, नाटककार आणि दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांनी रविवारी विश्व पुस्तक मेळाव्यात रविवारी केले.दिल्लीतील भारत मंडपममधील जागतिक पुस्तक मेळाव्यात लेखक, दिग्दर्शक अभिराम भडकमकरलिखित 'इन्शाअल्लाह' या कादंबरीच्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन झाले. यावेळी आसिफ अली यांनी लेखक भडकमकर यांच्याशी संवाद साधला.
यावेळी अभिराम भडकमकर यांनी मुस्लिम समाज आणि पुरोगामी भूमिका यावर भाष्य केले. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य आणि देशातील अन्य भागात काही दिवसांपूर्वी बुरखा - हिजाब परिधान करण्यासाठी आंदोलन झाले होते. विशेष म्हणजे महाराष्ट्रास मुस्लिम समाजसुधारक हमीद दलवाई आणि त्यांच्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाची परंपरा आहे. दलवाई तर कधीच बुरखा - हिजाबच्या समर्थनात नव्हते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील एका पुरोगामी म्हणवणाऱ्या नेत्यानेही शरियानुसार चालण्याचे वक्तव्य केले होते. अशा सवंग वक्तव्यांमुळे प्रसिध्दी मिळत असली तरी त्याची हानी सर्वसामान्य व्यक्तीस होते. त्यामुळे महाराष्ट्र आणि देशातील पुरोगामित्वास आता आत्मपरीक्षण अतिशय गरजेचे आहे, असे भडकमकर यांनी म्हटले.
मुस्लिमांचे प्रश्न आहेत म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे अभिराम भडकमकर यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, माझे बालपण कोल्हापुरात गेले. माझे घर मुस्लिम मोहलल्यात गेले, मित्रही मुस्लिमच होते. परिणामी त्यांच्या रूढी, परंपरा, सण, भाषा याच्याशी मी खूपच चांगला मिसळून गेलो होतो. त्यामुळे या धर्मातील अनेक प्रवाह मी जवळून अनुभवले आहेत आणि त्यातील भेद मला ठाऊक आहेत. या विषयांवर मुस्लिम समाजातील अनेकांनी लिहायचे टाळले आहे. त्यामुळे या आवश्यक विषयावर मी समतोल लिहू शकतो, असा विश्वास मला वाटत असल्यानेच मी या विषयाकडे वळल्याचे भडकमकर यांनी नमूद केले.