ओडिशातील पहिले कलाकुसरीसाठीचे वारसा गाव (हेरिटेज व्हिलेज) म्हणून विकसित होण्याचा मान मिळाला रघुराजपूरला. या गावातील प्रत्येक घरात एखादा तरी राष्ट्रीय पुरस्कार विजेता कलाकार वास्तव्यास. अहोरात्र कलासाधना आणि त्यातून उदरनिर्वाह करणार्या अशा या कलासागरात रंगलेल्या गावाविषयी आजच्या ‘ओडिशायन’ लेखमालेतील शेवटच्या भागातून जाणून घेऊया...
गुलाबी, चमकदार निळा, खोल गेरू, जांभळा, हलका केशरी, लाल, पिवळ्या रंगात नजरेत भरणारी आकर्षक भित्तिचित्रे, कोरीव काम आणि देवीदेवतांची रंगीबेरंगी चित्रे, भिंतीवर उडणारे हिरवे पोपट, ओडिसी नृत्याचा सराव आणि त्या संगीताने मंत्रमुग्ध करणारे वातावरण, छोटी मातीची टुमदार घरे आणि ओसरीवर विक्रीसाठी मांडलेल्या मातीच्या खेळण्या.... असे हे मनाला मोहिनी घालणारे वातावरण ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातील रघुराजपूर गावात अनुभवले आणि मन कलाविश्वात गुंग होऊन गेले.ओडिशाची राजधानी भुवनेश्वरपासून सुमारे ५२ किमी अंतरावर वसलेले रघुराजपूर हे गाव. नारळ, खजूर, केळी, आंबा आणि फणसाच्या चहूबाजूंनी बहरलेल्या झाडांच्या अगदी मधोमध विसावलेले. इथे प्रत्येक घरात दहा वर्षांच्या लहान मुलांपासून ७० ते ८० वर्षांच्या वृद्धांपर्यंत सगळेच कलाभ्यासात रममाण... रघुराजपूर इथल्या ’पट्टचित्र’ या चित्रप्रकारासाठी तसे सुप्रसिद्ध आणि हा कला प्रकार अगदी पाचव्या शतकापूर्वीचा. कापडाच्या तुकड्यावर पौराणिक कथा कथन करणारे पट्टचित्र नैसर्गिक रंगात साकारले जाते. यासोबतच टसर पेंटिंग्ज, पाम लीफ कोरीव काम, मातीची भांडी, कागदी वस्तू, लाकूड, दगड आणि शेण यांपासून बनवलेले मुखवटे, खेळण्या, लाकडी खेळणीदेखील तितकीच प्रसिद्ध.
पुरी शहरात दरवर्षी होणार्या रथयात्रा उत्सवादरम्यान भगवान जगन्नाथाच्या सिंहासनाखाली आणि तीन रथांवरदेखील हीच पारंपरिक सजावट आकर्षणात भर घालते. यावेळी गावात मोठ्या प्रमाणावर परदेशी पर्यटकही भेटी देतात. इथे तयार होणार्या चित्रांची किंमत अगदी २० रुपयांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंत. परदेशात तर या चित्रांना सर्वधिक मागणी. अशा या गावातील पर्यटनाला अधिकाधिक चालना देण्यासाठी गावातील कलाकारांनी आपली घरेच्या घरेच कलाकृतींनी मढवली आहेत.रघुराजपूरमध्ये एकूण १६० घरे आणि ४०० ग्रामस्थ. सर्वच्या सर्व हाडाचे कलाकार. एवढी मोठी कलाकार मंडळी एकाच ठिकाणी वास्तव्यास असणारे कदाचित हे भारतातील एकमेव ठिकाण असावे. रघुराजपूरच्या प्रत्येक कुटुंबात ही कला वारसानेच खुलत गेलेली. तसेच गावातील प्रत्येक घराचे आपले एक आगळेवेगळे वैशिष्ट्य. घरं पट्टचित्रे आणि आकर्षक खेळण्यांनी ल्यायलेली. भगवान जगन्नाथ आणि इतर देवीदेवतांशी संबंधित पौराणिक कथा कलाकृतींमध्ये प्रामुख्याने प्रतिबिंबित होतात. अशा या रघुराजपूर मधील कलासक्त ग्रामस्थांमध्ये दोनच गोष्टी तुम्हाला प्रकर्षाने जाणवतील, ती म्हणजे देवावरील श्रद्धा आणि कलेची अपरिमित साधना!
अशा या रघुराजपूरने ओडिशातील काही दिग्गज कलाकारही घडवले, ज्यांनी कलाक्षेत्रात एक वेगळी उंची प्रस्थापित केली. पद्मविभूषण गुरू केलुचरण महापात्रा आणि गोटीपुआ नृत्यांगना पद्मश्री गुरू मागुनी चरण दास हे या गावचे मूळ रहिवासी. हे गाव शिल्पगुरू डॉ. जगन्नाथ महापात्रा यांचे जन्मस्थान. महापात्रा यांनी ही कला आजच्या पिढीमध्य रुजविण्यात मोठे योगदान दिले असून त्यांचा पट्टचित्र कलेच्या विकासात सिंहाचा वाटा आहे.नेत्रसुखद चित्रांबरोबरच रघुराजपूर हे ‘गोटीपुआ’ लोकनृत्यासाठी सुविख्यात. ‘गोटीपुआ’ हा ओडिसी नृत्याचा प्रारंभिक प्रकार. प्रसिद्ध ओडिसी नृत्यगुरू दिवंगत पद्मविभूषण गुरु केलुचरण महापात्रा हे याच गावचे. त्यांचे वडीलही पट्टचित्रकारही होते आणि ते मृदंगही वाजवायचे. केलुचरण महापात्रा हे ‘गोटीपुआ’ नृत्य शिकले आणि त्यानंतर इतर ओडिसी नृत्य प्रकारही त्यांनी आत्मसात केले. हे नृत्य भगवान जगन्नाथाच्या आराधनेसाठी केले जाते. यामध्ये कलाकार पिरॅमिड बनवतात आणि राधा-कृष्णाच्या प्रेमाचा नृत्याविष्कार साजरा करतात. जगन्नाथ यात्रा उत्सवासह हे लोकनृत्य डोला उत्सव, झुला उत्सव आणि बोट उत्सवाचीही शोभा वाढवते. आजही येथील कलाकार हे लोकनृत्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर करतात. गावातील ‘गोटीपुआ’ नृत्य शिक्षक वसंतकुमार महाराणा सांगतात की, “गोटीपुआ नृत्य केवळ गुरुकुल पद्धतीद्वारे शिकविले जाते. आमच्या चार पिढ्यांमध्ये ही परंपरा आमच्याकडे आली आहे. आमची पुढची पिढीही या कलेची सेवा करते आहे.”
सन २००० मध्ये रघुराजपूरला ‘वारसा गाव’ म्हणून मान्यता मिळाली. तेव्हापासून भारत सरकारच्या मदतीने विविध संस्था रघुराजपूरला ’क्राफ्ट व्हिलेज’ म्हणून विकसित करत आहेत. या संस्था येथील कलाकारांना नवनवीन तंत्र शिकवतात. २०१७ मध्ये ’बँक ऑफ इंडिया’ने हे गाव ’डिजिटल गाव’ म्हणून दत्तकही घेतले. ‘मॉडेल क्राफ्ट व्हिलेज योजने’त रघुराजपूरचा समावेश करण्यात आला आहे. इटली, फ्रान्स, ऑस्ट्रिया यांसारख्या देशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे दाखल होतात. येथील कला शिकण्याकडेही आता परदेशी नागरिकांचा कल वाढत असल्याचे येथील नागरिक सांगतात. आज भारतीय खेळण्यांना येथील कलेला परदेशी बाजारपेठेत मागणी वाढत असल्याचे चित्र विकसित भारतासाठी नक्कीच आशादायी म्हणावे लागेल.