"नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे कधीच हसताना दिसत नाहीत. काँग्रेसवाले बघा नेहमी हसतात; कारण काँग्रेस ‘मोहब्बतचे दुकान’ आहे!” असे नुकतेच राहुल गांधी यांनी म्हटले. काय तर्क आहे! जोकरगिरीच्या आविभार्वात बत्तीशी दाखवत राहिले, तर म्हणे प्रेमळ भावना. तसेही गांभीर्य आणि राहुल गांधी यांचे सख्खे वैरच. त्यांचा तो एक डोळा मिचकावून, हसतानाचा फोटो तर जनतेचा आणि मीडियाचाही अगदी लाडका फोटो. काय नाही, त्या फोटोमध्ये डोळे मिचकावण्यातला, छचोरपणाचा छपरी आनंद, ओठावरचे हसू तर हेच सांगते की, समोरच्या व्यक्तीला कसे बनवले? (असे लोक म्हणतात.)असो. राहुल गांधी असेही म्हटले की, ”देशात मोठ्या २०० कंपन्यांचे मालक आदिवासी, दलित किंवा मागासवर्गीय समाजाचे लोक आहेत का?” खरे तर देशातले सर्व थोर संत-माहात्मे, सामाजिक कार्यकर्ते जाती अंताच्या लढाईसाठी आयुष्यभर लढले. त्यांच्या विचारकार्याला मागे सारत, राहुल गांधी ‘मोहब्बतच्या दुकान’च्या आड जातीचे विषैल राजकारण करत आहेत. २०० मोठ्या कंपन्यांच्या मालकांनी कष्टाने, कौशल्याने त्यांच्या कंपनी मोठ्या केल्या. लाखो लोकांना रोजगार दिले. देशाच्या तिजोरीत भर टाकली. ’सीएसआर’ निधी उभारून, देशातील सामाजिक कार्यातला साहाय्य केले. त्या कंपन्यांच्या मालकाची जात कोणती? याचा विचार आजपर्यंत कुणी केला नव्हता. तो विचार राहुल गांधी करतात. किती ही जातियता? यावर काही लोकांना एक चित्रपट आठवला. त्यात एक विदुषक हसर्या मुखवट्यात राहून, लोकांना हसवत असतो. प्रेम आनंद वगैरे देेतो; थोडक्यात ‘मोहब्बत’ वाटतो, असे तो भासवतो. मात्र, चित्रपटातील खरा खलनायक तोच असतो. आता काही नतद्रष्ट लोक या विदुषकाच्या पात्रात ‘मोहब्बतच्या दुकानवाल्या’ला शोधतील. काय म्हणावे? हे लोक विसरतात की, ते आहेत म्हणून फुकटात मनोरंजन तरी होते. मनोरंजन मे कुछ कमी हैं क्या? असे सगळे असूनही, हे कृतघ्न लोक त्यांना ‘पप्पू’, ‘ट्यूबलाईट’ आणि आता तर ‘विदुषक’ही म्हणतात! अशा कृतघ्न नतद्रष्टांचा निषेध, निषेध, निषेध! नतद्रष्ट, कृतघ्न कुठले!
पतीने त्याच्या आईला वेळ देणे किंवा तिला पैसे देणे म्हणजे त्याच्या पत्नीवर झालेला घरगुती हिंसाचार आहे, असे मानले जाणार नाही,’ असे निरीक्षण नोंदवत नुकतेच सत्र न्यायाधीश आशिष अयाचित यांनी एका महिलेची याचिका फेटाळून लावली. या महिलेचे म्हणणे होते की, ’तिचा पती विदेशात नोकरी करायचा.जेव्हा भारतात परतायचा, तेव्हा तो आईसोबत वेळ घालवतो आणि आईच्या शस्त्रक्रियेचा खर्चही त्याने केला. हा तिच्यावरचा अन्याय आहे.’ घरगुती हिंसा कलमांतर्गत पतीकडून तिला नुकसान भरपाई मिळायला हवी. मात्र, आधी दंडाधिकारी न्यायालयात आणि आता सत्र न्यायालयात या महिलेची याचिका फेटाळण्यात आली.या सगळ्याचा विचार करताना जाणवते की, अन्याय-अत्याचाराच्या घटनेला अनेक कंगोरे असतात. कायद्यानेही अन्याय-अत्याचार घडला म्हणजे काय? याची परिभाषा मांडली आहे. त्या अनुषंगाने वृद्ध आईला वेळ देणे किंवा तिला पैसे देणे, तिची सुश्रुषा करणे याला ‘घरगुती हिंसाचार’ म्हणू शकतो का? पती म्हटला की, त्याचे सर्वस्व केवळ पत्नीचेच असते का? मुलाचे लग्न झाले की, त्या मुलाला जन्म देणार्या आई-बाबांचा हक्क संपतो का? दुसरीकडे, पत्नी म्हणजे हक्काची दासी असे मानणारेही अनेक आहेत. विवाह ठरवताना, वर पक्ष अमूक अटी घालतो, तमूक अटी घालतो, असे सर्रास दृश्य दिसते. पण, वधू पक्षाचे काय? आपल्यापेक्षा जास्त पगाराचा (म्हणजे सरकारी कर्मचारी किंवा पिढीजात श्रीमंत) शहरात स्वतःचे घर आणि गावी बक्कळ शेतजमीन असलेला, त्यातही घरी अविवाहित भावंड नसलेल्या, वराला पहिली पसंत असते. या सगळ्या गदारोळात प्रेम, आदर आपुलकी कुठून सुरू होणार? पण, चालले हे असे चाललेले आहे. त्यामुळे अनेक मुलींना (अनेक म्हटले सगळ्या नाही) वाटते की, विवाह म्हणजे राजा-राणी आणि त्यांचा राजमहल. तिथे दुसरे कुणी नको. हे फक्त मुलींनाच वाटते का? तर दुर्दैवाने अनेक मुलांचेही हेच स्वप्न. या वास्तवाकडे किती काळ दुर्लक्ष करायचे? विवाहसंस्था आदर्श संस्था आहे. पण, ती टिकवण्याची पद्धती कशी संवर्धित होणार? वाढते घटस्फोट आणि वृद्धाश्रम यांचे मूळ यातच आहे.