नवी दिल्ली : दिल्ली दंगलीतील मुख्य आरोपी उमर खालिदने सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर दि. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी सुनावणी होणार होती. परंतु, परिस्थितीतील बदलाचे कारण देत याचिका मागे घेतल्याचे खालिदचे वकील कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दिल्ली दंगलीमुळे तुरुंगात असलेला उमर खालिदला ऑक्टोबर २०२२ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन देण्यासही नकार दिला होता. त्यानंतर आता उमर खालिद कनिष्ठ न्यायालयात जामीन मिळण्याच्या शक्यता तपासणार आहे. मात्र, जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयात उमर खालिदचे जामीन अर्ज यापूर्वीच फेटाळण्यात आले आहेत.
याआधी उमर खालिदचा जामीन अर्जावरील दिल्लीच्या करकरडूमा सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उमर खालिदने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ऑक्टोबर २०२२मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने उमर खालिदला जामीन देण्यासही नकार दिल्यानंतर खालिद जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो, असे मानले जात होते.