'अल जझीरा’, आम्हाला वाटते की, ’हमास’च्या दहशतवादामध्ये सहभागी होण्यापेक्षा, तुमचे पत्रकार परिस्थितीबद्दल निष्पक्ष अहवाल सादर करत असतील.” असे नुकतेच ’एक्स’च्या प्लॅटफॉर्मवर ’इस्रायल सुरक्षा बला’ने नमूद केले. ‘अल जझीरा’ ही कतारच्या मालकीची सरकारी वृत्तवाहिनी. जगभरातल्या घटनांचे वार्तांकन करण्यासाठी, ‘अल जझीरा’ ओळखले जाते. अर्थात, ‘अल जझीरा’च्या बातम्या निष्पक्ष असतात, असे म्हणणे म्हणजे सत्य नाकारण्यासारखेच आहे. या पार्श्वभूमीवर ‘अल जझीरा’बद्दल इस्रायलने असे जागतिक समाजमाध्यमावर म्हणणे, हे गंभीरच. इस्रायलच्या सुरक्षा बलाने त्यांच्या या म्हणण्याला पुष्टी म्हणून पुरावे ही दिले आहेत.
‘इस्रायल सुरक्षा बला’चे म्हणणे आहे की, काही आठवड्यांपूर्वी मध्य गाझामध्ये त्यांनी एक कारवाई केली. तिथे त्यांना मोहम्मद वाशाहचा लॅपटॉप मिळाला. हा वाशाह नुकताच ‘अल जझीरा’च्या एका वार्तांकनामध्ये दिसला होता. पत्रकार म्हणून तो दिवसभर त्या परिसरामध्ये वावरत होता. पत्रकार म्हणून तेथील वार्तांकन करत होता. याच वाशाहचा लॅपटॉप ’इस्रायल सुरक्षा बला‘ला सैनिकी कारवाईमध्ये सापडला. ‘इस्रायल सुरक्षा बला’चे अरबी भाषा प्रवक्ता लेफ्टनंट कर्नल अविचाई अद्रे यांच्या मते, वाशाहच्या लॅपटॉपमध्ये असलेली माहिती आणि छायाचित्र यांतून स्पष्ट होते की, मोहम्मद वाशाह हा ’हमास’च्या आर्मी विंगमध्ये सिनिअर कमांडर होता. तो यापूर्वी अनेक युद्धामध्ये सहभागी झाला. तसेच तो ’हमास’च्या टँकरोधी मिसाईल युनिटमध्ये प्रमुख कमांडर होता. २०२२च्या शेवटी त्याने ’हमास’च्या एअर युनिटच्या संशोधन आणि विकासासाठी काम सुरू केले. त्याचे आणि ’हमास’चे संबंध आहेत, हे लॅपटॉपमधील माहितीतून स्पष्ट झाले. या सगळ्यामुळे इस्रायलने ‘अल जझीरा’ला दोषी धरत, प्रश्न विचारला की, माहीत नाही, पत्रकारितेच्या आड आणखी किती तरी दहशतवादी घटना समोर येतील. ‘अल जझीरा’च्या पत्रकारांवर यापूर्वीही असे आरोप झाले आहेत. गेल्या महिन्यात गाझापट्टीतील राफा येथे दोन पत्रकार ’इस्रायल सुरक्षा बला’च्या हल्ल्यात मारले गेले. तेव्हाही इस्रायलने म्हटले होते की, ते दोघे ’हमास’ आणि पॅलेस्टिनी ’इस्लामिक जिहाद’सारख्या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी होते.
या सगळ्या घटनांचा वेध घेतला, तर वाटते की, ‘हमास’च्या दहशतवाद्यांना पत्रकाराचा मुखवटा लावण्याचे कारण काय? याचे उत्तर आहे की, प्रसारमाध्यमांत काम करतो, वार्तांकन करतो, जगासमोर परिस्थिती मांडतो, यासाठी पत्रकारांना गाझापट्टीतही थोडेसे अभय होते. पत्रकार म्हणून ते गाझापट्टीत निर्धोक आणि विनाअडथळा फिरू शकत होते. आपल्याला वाटतील आणि आपल्या सोयीच्याच घटना ते जगासमोर उघड करू शकत होते. तसेच आपण पत्रकारिता करतो म्हणत, ते ’हमास’चे गुप्तहेर म्हणूनही काम करत होते. गाझापट्टीत कुठे इस्रायल सैन्य काय करते आहे? इस्रायलच्या सैन्याची काय तयारी आहे? त्यांचे नियोजन काय आहे? याबद्दल ते माहिती मिळवू शकत होते. मिळालेली माहिती ’हमास’ला पुरवत होते. त्यामुळे पुढे काय करायचे, याबद्दल ’हमास’ व्यवस्थित नियोजन करत असे. तसेच हा पत्रकार असलेला दहशतवादी चुकून इस्रायलच्या हल्ल्यात मेला, तर निष्पाप पत्रकारावर हल्ला झाला हो, असे म्हणत इस्रायलला जगासमोर दोषीही ठरवात येणार होते. मोहम्मद वाशाह याचे खरे रूप उघड झाले. पण, इस्रायलच्या म्हणण्यानुसार, असे किती तरी ‘मोहम्मद वाशाह’ असू शकतात.
नुकतेच इस्रायलने ‘हमास’ने तयार केलेले भूमिगत बोगदे शोधून काढले. ७०० मीटर लांब आणि १८ मीटर खोल हे बोगदे होते. हेल बोगदे म्हणजे ’हमास’चे अद्ययावत कार्यालय आणि दहशतवाद्यांचे निवासस्थानच. हे बोगदे कुठे होते? तर गाझापट्टीतील संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यालयाखाली! शाळा, इस्पितळे, मशिदी आणि अनेक महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणाखाली दहशतवाद्यांनी बोगदे खणले. दुसरीकडे, दहशतवादी अनेक महत्त्वाच्या पदावर कर्मचार्यांचे मुखवटे घालून, त्या आड दहशतवादी कृत्ये करत असत. या सगळ्यामुळे गाझापट्टीतील लोकांवरून जगाचा विश्वास उडाला. पत्रकार भासवून दहशतवादी कृत्य करणारा, मोहम्मद वाशाह म्हणजे हिमनगाचे टोक आहे, हे नक्कीच!