मुंबई : 'काकस्पर्श', 'नटसम्राट', 'पांघरूण' या विलक्षण प्रेमकहाणीनंतर झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीज पुन्हा एकदा एक अनोखी प्रेमकहाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. 'ही अनोखी गाठ' असे या चित्रपटाचे नाव असून काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असतानाच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटाबद्दल महेश मांजरेकर म्हणतात, "नात्याची एक अनोखी गोष्ट प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रेयससोबत प्रथमच काम करतोय. त्याचा अभिनय मी पाहिला आहे. तो अतिशय हुशार अभिनेता आहे. एक कलाकार म्हणून स्वतःला नेहमीच समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक व्यक्तिरेखेला तो शंभर टक्के न्याय देतो. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव कमाल होता. या चित्रपटात ऋषीचीही भूमिका आहे. 'ही अनोखी गाठ'च्या निमित्ताने गौरीला पुन्हा एकदा तिचे नृत्यकौशल्य सादर करण्याची संधी मिळाली आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात अनेक नावाजलेले कलाकार आहेत. खूप साधी, सरळ तरीही अनोखी अशी ही प्रेमकहाणी आहे. झी स्टुडिओजसोबत याआधी बरेच चित्रपट केले आहेत, त्यामुळे त्य्नाच्यासोबतचा अनुभव हा नेहमीच कमाल असतो. एक सुंदर कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करत आहोत, खात्री आहे प्रेक्षक त्याला इतर चित्रपटांप्रमाणेच आपलेसे करतील.''
श्रेयस तळपदे आपल्या 'ही अनोखी गाठ'च्या अनुभवाबद्दल बोलतो, '' सध्याच्या काळात आपण सगळेच एका निर्मळ प्रेमकथेला मुकले आहोत. प्रेमकथेतील निरागसता हरवत चालली आहे आणि अशावेळी महेश दादांनी मला 'ही अनोखी गाठ'ची गोष्ट ऐकवली. त्या क्षणीच मी ठरवले हा चित्रपट करायचाच. मुळात महेश सर खूप निवडक सिनेमे करतात, त्यातही त्यांचे विषय वेगळे असतात. त्यामुळे या चित्रपटाचा मी भाग होतोय, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. महेश दादा आणि झी स्टुडिओजसोबत काम करण्याचा अनुभव मस्तच होता. मला खात्री आहे ही अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांनाही आवडेल.''
झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, " महेश मांजरेकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा नेहमीच चांगला असतो. त्यांच्या कथेत प्रचंड पकड असते, जी प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवते. नात्यांची हळवी बाजू अलगद प्रेक्षकांसमोर मांडण्याची त्यांची खासियत त्यांच्या प्रत्येक चित्रपटात दिसते. 'ही अनोखी गाठ' ही सुद्धा नात्याची अशीच एक तरल भावना आहे, जी प्रेक्षकांना आवडेल. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो हसवेल, भावनिक करेल, नात्यांचे महत्वही अधोरेखित करेल.'' चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांचे असून यात श्रेयश तळपदे, गौरी इंगवले, ऋषी सक्सेना, शरद पोंक्षे, सुहास जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.