दाढीकुरवाळू राजकारण्यांचा दिल्ली-बंगालमध्ये रोहिंग्यांना ‘आधार’

    12-Feb-2024   
Total Views |
illegal-rohingya-and-bangladeshi-muslims-get-Aadhar

राष्ट्रीय सुरक्षेबद्दल कसलीही तडजोड नाही, असे मोदी सरकारने म्हटले आहे. असे असले तरी रोहिंग्या मुस्लीम भारतात मोठ्या संख्येने राहत आहेत आणि सर्व लाभ पदरात पाडून घेत आहेत. रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त करण्यामध्ये संबंधित राज्य सरकारांनी कठोर पावले न उचलल्यास, त्यांच्या अस्तित्वामुळे राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, हे स्वार्थी राजकारण्यांच्या लक्षात कसे येत नाही?

भारतात घुसखोरी केलेल्या रोहिंग्या आणि बांगलादेशी मुस्लिमांविरुद्ध आम आदमी पक्ष आणि प. बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्ष काहीच कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे. रोहिंग्या मुस्लीम हे भारतासाठी धोका असल्याचे काही राजकीय पक्ष आणि संघटना म्हणत असले, तरी मतपेढीवर डोळा ठेवून, दिल्लीचे केजरीवाल सरकार आणि प. बंगालमधील ममता बनर्जी यांचे सरकार त्यांच्याविरुद्ध कारवाई करताना दिसत नाहीत.

राजधानी दिल्लीमधील कालिंदी कुंज आणि आसपासच्या प्रदेशात गेल्या १३ वर्षांपासून रोहिंग्या मुस्लिमांनी मुक्काम ठोकला आहे. या परिसरात राहणार्‍या या रोहिंग्या मुस्लिमांनी बेकायदेशीर मार्गांचा वापर करून, अवघे पाच हजार रूपये देऊन, आधार कार्ड प्राप्त केले आहे. एवढेच नव्हे तर हे रोहिंग्या मोफत वीज, पाणी या नागरी सुविधादेखील मिळवतातच! त्याशिवाय दिल्ली शासनाने जे ‘मोहल्ला’ दवाखाने उघडले आहेत, त्यांच्या सेवेचाही लाभ घेतात! दिल्लीचे बांगलादेशमध्ये रुपांतर करण्याचा, या रोहिंग्यांचा प्रयत्न दिसून येत असल्याची प्रतिक्रिया दिल्लीतील एका टॅक्सी चालकाने व्यक्त केली आहे. सर्वसामान्य व्यक्तींना या रोहिंग्या मुस्लिमांमुळे निर्माण होणारा धोका दिसत आहे;
 
पण केजरीवाल सरकारला तो दिसून येत नाही, याला काय म्हणावे? संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त आयुक्तांकडून या रोहिंग्यांना निर्वासित ओळखपत्रे मिळाली असल्याचा दावा केला जात असला, तरी गेल्या दशकभरात त्यांची लोकसंख्या वाढत असल्याचे आणि त्यांनी आसपासच्या भागातही आपले हातपाय पसरले असल्याचे दिसत आहे. काही रोहिंग्या मुस्लिमांनी उत्तर प्रदेश पाटबंधारे खात्याच्या जमिनीही बळकाविल्या होत्या. पण, नंतर त्यावरून त्यांना हुसकावून लावण्यात आले. राजधानी दिल्लीत आश्रय घेतलेल्या, या रोहिंग्या मुस्लिमांपैकी काही जण अमली पदार्थांची तस्करी, चोर्‍या करणे, दरोडे टाकणे, लुटमार करणे अशा कृत्यांमध्ये गुंतले आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने २००३ मध्ये घुसखोरांविरुद्ध मोहीम उघडली होती. त्यावेळी सुमारे ४० हजार जणांना पकडण्यात आले होते. त्या घटनेला २० वर्षे उलटून गेली आहेत. ते लक्षात घेता, दिल्लीमध्ये किती जणांनी बेकायदेशीर घुसखोरी केली असेल, याची कल्पना न केलेली बरी!
 
रोहिंग्या मुस्लिमांनी जम्मू-काश्मीर, तेलंगण, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली (एनसीआर) यांसारख्या भागांमध्ये आपले बस्तान बसविले आहे. दिल्लीत वस्ती केलेल्या रोहिंग्यांना परत पाठवून द्यावे, अशी मागणी भाजप करत आला आहे. पण, आम आदमी पक्षाचे सरकार या मुस्लिमांना हाताशी धरून, मतपेढीचे राजकारण खेळत आहे. राष्ट्रीय सुरक्षेबद्दल कसलीही तडजोड नाही, असे मोदी सरकारने म्हटले आहे. असे असले तरी रोहिंग्या मुस्लीम भारतात मोठ्या संख्येने राहत आहेत आणि सर्व लाभ पदरात पाडून घेत आहेत. रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त करण्यामध्ये संबंधित राज्य सरकारांनी कठोर पावले न उचलल्यास, त्यांच्या अस्तित्वामुळे राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, हे स्वार्थी राजकारण्यांच्या लक्षात कसे येत नाही?

‘अयोध्येमुळे भारत-फिजी संबंध आणखी दृढ होतील!’

फिजीचे उपपंतप्रधान बिमन प्रसाद यांनी नुकतीच अयोध्येस भेट दिली. आपल्या या भारतभेटीद्वारे श्रद्धा आणि राजनैतिकता यांचे अनोखे मिलन झाले असल्याचे बिमन प्रसाद यांनी म्हटले आहे. ”सांस्कृतिक देवाणघेवाण आणि मैत्री यांचे अयोध्या हे एक प्रतीक म्हणून उदयास येत आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. फिजीचे उपपंतप्रधान पाच सदस्यीय शिष्टमंडळ घेऊन, भारत भेटीवर आले होते. फिजीमधील जनतेला भगवान राम आणि रामायण यांबद्दल अतूट प्रेम असल्याचे आणि फिजी समाजाचे ते अंगभूत भाग असल्याचे त्यांनी सांगितले. फिजीमधील प्रत्येक नागरिकाची अयोध्येस भेट देऊन, प्रभू रामचंद्राचे दर्शन घेण्याची इच्छा असल्याचे ते म्हणाले. प्रभू रामचंद्र वनवासातून अयोध्येमध्ये परतल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ साजरा केला जाणारा, दीपावलीचा सण आमच्या देशात ’राष्ट्रीय सण’ म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी ’राष्ट्रीय सुट्टी’ दिले जाते. फिजीमध्ये हिंदू समाज मोठ्या संख्येने असून, तो समाज सनातन धर्माचे पालन करीत आला आहे. जगातील अन्य देशांतील हिंदू समाजाप्रमाणे फिजीतील हिंदू समाजानेही प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला होता.

रामललाच्या मूर्तीचे नेत्र घडविणारी छिन्नी आणि चांदीचा हातोडा...

अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झालेली, रामललाची मूर्ती घडविली, ती शिल्पकार अरूण योगीराज यांनी. ही मूर्ती घडविताना, अरूण योगीराज यांनी आपले सर्व कौशल्य पणाला लावले. रामललाच्या मूर्तीचे सुंदर, विलोभनीय आणि जीवंत भाव प्रकट करणारे नेत्र अरूण योगीराज यांनी ज्या हातोडा आणि छिन्नी यांच्या साह्याने घडविले, ती हत्यारे योगीराज यांनी समाजमाध्यमावर प्रदर्शित केली आहेत. बालक रामाच्या मूर्तीचे नेत्र घडविण्यासाठी, योगीराज यांनी चांदीचा हातोडा आणि सोन्याच्या छिन्नीचा वापर केला होता. ”रामललाची मूर्ती घडविताना, आपणास भगवान राम मार्गदर्शन करीत आहेत, असे मला सातत्याने वाटत होते,“ असे योगीराज यांनी म्हटले आहे. ”ही मूर्ती घडविण्याचे कार्य आपणावर सोपविण्यात आले होते. ते पाहता आपण या पृथ्वीवरील सर्वात नशीबवान व्यक्ती आहोत,” असे अरूण योगीराज यांनी म्हटले आहे. रामललाची मूर्ती तर अत्यंत सुंदर आहेच; पण त्या मूर्तीचे नेत्र इतके मोहक आहेत की, कोणाचीही नजर त्यावरून ढळूच नये, इतका जीवंतपणा त्या नेत्रांमध्ये शिल्पकाराने उतरविला आहे. रामललाची कृपादृष्टी सदैव आपल्यावर आहे, असेच त्या मूर्तीचे दर्शन घेणार्‍या प्रत्येक भाविकास वाटल्यावाचून राहत नाही! ज्या सुवर्ण छिन्नी आणि चांदीच्या हातोड्याचा वापर करून, अरूण योगीराज यांनी त्या मूर्तीचे नेत्र घडविले, ती हत्यारेही आता अजरामर झाली आहेत.

मौलानाची मुख्यमंत्री धामी यांना धमकी

मौलाना तौकीर रझा याने “यापुढे मुस्लीम समाज कोणत्याही प्रकारचे बांधकाम पाडण्याचे कृत्य सहन करणार नाही, आम्ही बुलडोझर खपवून घेणार नाही. आमच्यावर जे कोणी हल्ला करतील, त्यांना आम्ही ठार करू,” असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना धमकाविले आहे. हा मौलाना ’इत्तेहाद-ए-मिल्लत काऊंसिल’चा प्रमुख आहे. सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या मदरशाचे बांधकाम पाडून टाकण्याची जी कृती उत्तराखंड सरकारने केली, त्याबद्दल या मौलानाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हल्दवानी येथे सदर बांधकाम पाडण्यासाठी, बुलडोझरचा वापर केल्याबद्दल, त्याने संताप व्यक्त केला. अशा प्रकारे बांधकाम पाडण्याचे कृत्य मुस्लीम समाज सहन करणार नाही, असा इशारा या मौलानाने दिला. असे कृत्य घडल्यास, आम्ही हिंसाचाराचा अवलंब करू. आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यास, तसे करणार्‍यांचे उच्चाटन करू, असेही या मौलानाने धमकावले आहे. एक तर अनधिकृत मदरसे उभे करायचे आणि ते पाडल्याबद्दल आरडओरड करायची, हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणता येईल. ‘जो हम पर हमला करेगा, उसे मार देंगे, बुलडोजर बरदास्त नहीं किया जायेगा।’ असे या मौलानाने पुष्करसिंह धामी आणि पंतप्रधान मोदी यांना उद्देश्ाून काढलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ घोषित केल्याने, देशामध्ये यादवी माजेल, असा इशाराही तौकीर रझा याने दिला आहे. मौलाना रझा मुस्लीम समाजास भडकावित आहे. अशा मौलानाचा वेळीच बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे.
 
९८६९०२०७३२

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.