दमास्कस : सीरीया मधील यादवी युद्धाने परमोच्च टोक गाठले आहे. सीरीयाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांनी रशियाला पलायन केले असून, सीरीया आता पूर्णपणे बंडखोरांच्या हाती गेले आहे. रशियाच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार असाद आणि त्यांच्या कुटुंबाला रशियाने आश्रय दिला आहे.१३ वर्ष सुरू असलेले यादवी युद्ध आता एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे.
रविवार दिनांक ८ डिसेंबर रोजी सीरियाच्या बंडखोरांनी राजधानी दमास्कसवर ताबा मिळवला. त्याच सोबत अध्यक्ष बशर अल असाद यांची राजवट उलथवून टाकल्याची माहिती सीरीयाच्या सरकारी वाहिनीवरून जाहीर केले, त्याच सोबत सर्व कैद्यांची मुक्तता करत असल्याची सुद्धा बंडखोरांनी घोषित केले. दमास्कस ताब्यात घेतल्यानंतर बंडखोर इराणच्या दूतावासामध्ये घुसले आणि तिथे मोडतोड केली. परिस्थिती लक्षात घेऊन इराकने आपले दूतावास रिकामे केले असून तेथील कर्मचाऱ्यांना लेबनॉनमध्ये हलवले. दरम्यान, लेबनॉनने बैरुतला दमास्कसशी जोडणारा मार्ग वगळता सीरियाबरोबरची भूसीमा बंद करणार असल्याची माहिती माध्यमांना मिळाली. भारताने शनिवारी आपल्या नागरिकांसाठी धोक्याची सूचना जारी केली होती. बंडखोरांनी शनिवारीच ऐतिहासिक होम्स शहराचा ताबा मिळवला होता. त्याशिवाय हमा शहर आणि ग्रामीण भागातील डेरा भाग त्यांनी नियंत्रणाखाली आणला आहे.
सीरीयाच्या राष्ट्राध्यक्षांची पारंपारिक सत्ता ही रशिया आणि इराणच्या जोरावर टिकली होती. परंतु दोन्ही देश आपआपल्या युद्धामध्ये व्यस्त असल्यामुळे सीरीयची मदत करणे दुरापस्तच आहे. हिजबुल्लाह ही दहशतवादी संघटना असद यांच्या सत्तेची पाठराखण करत होती. परंतु इस्रायलने हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा सपशेल बिमोड केल्यामुळे असद यांच्या राजवाटीला सुद्धा उतरती कळा लागली.