'नटसम्राट' नाटकं पेलवणं फार कठिण आहे – नाना पाटेकर

Total Views |
 
nana patekar
 
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टी आणि मराठी रंगभूमी आपल्या अभिनयाने समृद्ध करणारे अभिनेते नाना पाटेकर लवकरच ‘वनवास’ या चित्रपटातून नवी भूमिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. अनिल शर्मा दिग्दर्शित ‘वनवास’ हा चित्रपट २० डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘दै. मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना नाना पाटेकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत ‘नटसम्राट’ नाटक आणि चित्रपटाबद्दल भाष्य केले.
 
नाना पाटेकर म्हणाले की,“नटसम्राट या नाटकासाठी मला दोन कलाकाराच भावले ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि दत्ता भट्ट. ज्यावेळी मी नटसम्राट चित्रपटात काम करत होतो किंवा ती भूमिका साकारणार होतो तेव्हा नटसम्राट नाटक आणि त्यातील लागू यांची भूमिका हा रेफरन्स माझ्यासमोर होता. त्यामुळे नटसम्राट हा चित्रपट किंवा त्यातील माझी अप्पासाहेब बेलवणकर ही भूमिका माझं श्रेय नाही.खरंतर माझं नशीब चांगलं आहे की मला सगळं आयतं मिळालं”.
 
‘नटसम्राट’ हे नाटकं ज्यावेळी डॉ. लागू रंगभूमीवर साकारायचे तेव्हाची आठवण सांगताना नाना पाटेकर म्हणाले की, “ज्यावेळी लागू नाटक सादर करायचे तेव्हा मी ते नाटक विंगेतून, समोर बसून असं वेगवेगळ्या जागी बसून पाहायचो आणि प्रत्येकवेळी मी भारावून जायचो. कारण ते नाटक रंगभूमीवर सादर करणं आणि त्याहूनही नटसम्राट नाटक पेलवणं फार कठिण आहे.पण इतकं नक्की सांगेन की परत मला जर ‘नटसम्राट’ चित्रपट पुन्हा करायला सांगितला किंवा ती भूमिका परत सादर करायला लावली तर ते पुन्हा होणं शक्य नाही".
 
 
 

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.