बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार अद्याप थांबलेला नाही. बांगलादेशातील हिंदू त्यांच्याच मायभूमीत परका आणि पोरका झाला. का? तर केवळ ते मुस्लीम नाहीत म्हणून! मात्र, ‘हिंदू लाईव्हज मॅटर’ म्हणत कुणीही पुरोगामी पुढे आला नाही, की कुणाही निधर्म्याने मेणबत्त्याही पेटवल्या नाहीत. दुःख झाले ते केवळ हिंदू म्हणून अस्मिता बाळगणार्या हिंदूंनाच! ‘ऑल आईज ऑन पॅलेस्टाईन’ म्हणत काही लोक कण्हत, कुंथत होते. पण, त्यांचे डोळे बांगलादेशातील हिंदूंवर होणार्या अत्याचाराबाबत फुटले आहेत. त्यांचे मौन बरेच काही सांगून जाते. बांगलादेशातील सद्यस्थितीचा सखोल आढावा घेणारा हा लेख...
आमार शोनार बांग्ला,
मां, तोर बोदोनखानी मोलीन होले
आमि नोयोन जॉले भाशी।
बांगलादेशचे हे राष्ट्रगीत. याचा अर्थ आमचा सोन्यासारखा बांगलादेश. माझी आई (बांगलादेश) तुझा चेहरा उदास झाला, तर आमचेही नेत्र अश्रूंनी भरून येतात. पण, आज या शोनार बांगलाची परिस्थिती काय आहे?
‘बांगलादेश मुक्ती संग्राम’मध्ये तिथल्या मुस्लिमांसोबतच हिंदूंचे अतुलनीय योगदान होते. त्याच बांगलादेशमध्ये शेख हसीना सत्तेत असताना नोबेल पुरस्कारप्राप्त आणि आज तेथील हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. पुढे ऑगस्ट महिन्यात आरक्षणविरोधात विद्यार्थी आंदोलन तीव्र झाले आणि शेख हसीना यांना सत्तेतून अत्यंत दुःखदरित्या पायउतार व्हावे लागले. तेव्हा हसीना यांच्या विरोधकांनी मोहम्मद युनूस यांना पायघड्या घातल्या. हसीना यांची सत्ता पालटली आणि वयोवृद्ध युनूस हे काळजीवाहू पंतप्रधान बनले.
याबद्दल भारतातल्या त्यातही महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या लोकांच्या भावनांचा शासनाने आदर करावा, नाही तर, लोकांच्या भावनांचा उद्रेक होतो. भारतातील सरकारने बांगलादेशाच्या परिस्थितीवरून शिकावे. बांगलादेशामध्ये आरक्षणविरोधी विद्यार्थ्यांचे आंदेालन हिंसक झाले आणि त्यामध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना पायउतार व्हावे लागले. तेव्हा महाविकास आघाडीच्या राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांसह संजय राऊत यांनी विशेष मत मांडले होते की, “लोक सर्वोच्च असतात आणि शासकांनी त्यांच्या धैर्याची परीक्षा पाहू नये. लोकांच्या भावनांचा शासनाने आदर करावा, नाही तर लोकांच्या भावनांचा उद्रेक होतो. भारताच्या सरकारने बांगलादेशाच्या परिस्थितीवरून शिकावे.” भारतातल्या भाजपप्रणित केंद्र सरकार किंवा महाराष्ट्राचे भाजपप्रणित राज्य सरकार असेच हटवले जाईल. म्हणजे त्यासाठी बांगलादेशसारखेच आंदोलन उभे राहील, असे त्यांना वाटत असावे का? पण, बांगलादेशच्या सत्तांतरावरून आनंदित झालेल्या या नेत्यांना सत्य कळले होते का?
‘बांगलादेश मुक्ती संग्राम’च्या आंदोलनात सहभागी झालेल्यांच्या कुटुंबीयांना आरक्षण नको म्हणत सुरू झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन हा खरा तर हिंदूविरोधी आंदोलनासाठीचा मुखवटा होता. पण, भारतातसुद्धा आरक्षण, विद्यार्थी, शेतकरी, आदिवासी, कामगार आणि मागासवर्गीय यांच्या नावावर आंदोलन मोर्चे काढले जातात. पुढे कळते की, हे तर आंदोलनाचे मुखवटे होते. या मुखवट्यांच्या आंदोलनाचा मुख्य हेतू हिंदुत्ववादी विचार आणि सरकार यांना शह देणे, हाच होता आणि असतो. (सन्माननीय अपवाद क्षमस्व)
तर स्वातंत्र्यसैनिकांसंदर्भात आरक्षण हटवा, अशी मागणी करणारे आंदोलन लगेचच हिंदूंच्या जीवावर उठणारे कसे झाले? जगणे हा जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही माणसाचा मूलभूत अधिकार. मात्र, बांगलादेशमधला हिंदू या अधिकाराला पारखा झाला आहे. हिंदू स्त्रियांवर अगदी बालिका ते वृद्ध यांच्यावर सामूहिक बलात्कार होत आहेत. हिंदूंची संपत्ती लुटली जात आहे. घरदार पेटवून हिंदूंच्या जागांवर तिथले कट्टरपंथी त्यांचा हक्क सांगत आहेत. काही हिंदूंना जीवदान दिले आहे. पण, कसे? तर त्यांच्याकडून जीवंत राहण्यासाठी चक्क खंडणी घेतली जात आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंचे जगणे असे नरक झाले आहे. त्याचवेळी बांगलादेश सरकार आणि प्रशासनामधील हिंदूंची हकालपट्टी केेली आहे. हिंदू प्राध्यापक आणि शिक्षकांना सक्तीने घरी बसवले आहे. हिंदूंची दुकाने, कंपन्या आणि कारखाने यांच्यावर सक्तीने हक्क सांगितला गेला आहे. हिंदूंची मंदिरे तोडली गेली, फोडली गेली. मूर्त्यांची विटंबना करणे हे तर त्या कट्टरपंथीयाच्या ‘डीएनए’मध्येच असल्याने तिथे देवळे, चर्च आणि बौद्धविहार मठही तोडले गेले. लुटले गेले. पुजार्यांना, भंतेजींवरही अत्याचार केले गेले. ‘इस्कॉन’चे चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना तर अटकच करण्यात आली. त्यांची चौकशी करण्यास गेलेल्या आदिपुरुष श्याम दास आणि रंगनाथ दास ब्रह्मचारी या साधूंंनाही अटक करण्यात आली. इतका अत्याचार झाल्यानंतर हिंदूंना समर्थन करणार्या कोणत्याही पत्रकाराने आवाज उठवू नये, म्हणून हिंदू पत्रकारांनाही तुरुंगात डांबण्यात आले, तर पीडित हिंदूंना न्याय मिळवून देऊ शकतील, अशा हिंदू वकिलांची यादी करून त्यांनाही तुरुंगात डांबण्यात आले. हिंदू साहित्यिक, हिंदू कलाकार यांनाही शोधून शोधून मारण्यात आले. त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला.
बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार सुरू आहे. दाद तरी कुठे आणि कशी मागणार? कारण, सत्तेत बसलेला मोहम्मद युनूस याच्यावर बांगलादेशातील कट्टर इस्लामिक व्यक्ती आणि संस्थांनी मुल्ला-मौलवींचा पगडा आहे. बांगलादेशाच्या निर्मितीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता, त्या शेख मुजिबूर रहमान यांविरोधातही बांगलादेशातील कट्टरपंथी भूतावळ उठली. त्यांनी शेख यांच्या पुतळ्याची, स्मरणवास्तूची आणि त्यांच्या नावाच्या प्रत्येक गोष्टीचीच तोडफोड केली. बांगलादेशनिर्मितीमधले शेख यांच्या योगदानाच्या स्मृती चिरडून टाकण्याचे प्रयत्न झाले. इतके की, बांगलादेशाच्या (टका रुपया)वर शेख यांची प्रतिमा होती. ती प्रतिमा हटूवन तिथे जुलै विद्रोहाच्या प्रतिमा छापायचा विचार आहे. ‘जुलै विद्रोह’ म्हणजे बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात झालेले आंदोलन आणि त्यानंतर झालेल्या हिंसेत बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांचे पलायन.
बांगलादेशमध्ये बौद्ध धर्मीय आणि आदिवासींबाबत काय परिस्थिती आहे? तर चितगाव येथे खगराचारी आणि रंगमती हा डोंगराळ प्रदेश. इथे प्रामुख्याने चकमा, मार्मा, त्रिपुरी, चक, बोम, लुशी, खुमी हा आदिवासी समाज आणि बौद्ध समाजाची वस्ती. विकासाचा अभाव असल्याने इथल्या रहिवाशांचा आर्थिक सामाजिक विकास झालाच नाही. या गरीब लोकांचे धर्मांतरण करावे, यासाठी बांगलादेशातील मुल्ला-मौलवी आणि अगदी सामान्य मुस्लीमही (अपवाद सोडून) साम, दाम, दंड, भेद आणि हिंसाही नेहमीच करतात. आता तर काय, या समाजावर अत्याचाराचा कहर झाला आहे. सप्टेंबर महिन्यात या परिसरात मामून नावाचा एक गुंड घुसला. त्याच्यावर १७ गुन्हे होते. स्वरक्षणासाठी डोळ्यांत तेल घालून जागणार्या या परिसरातली काही लोकांनी त्याला पकडले. मात्र, त्याच्यासाठी त्याचे कौमवाले धावून आले. वाद पेटला आणि हा मामून त्या हिंसेत मेला. त्यानंतर काय झाले? तर ‘राईट्स अॅड रिस्क अॅनालिसिस ग्रुप’चे निदेशक सुहास चकमा यांनी म्हटले की, त्यानंतर त्या हिंसा करणार्या मुस्लिमांच्या मदतीला बांगलादेशची सेना आली आणि दोघांनी मिळून आदिवासी आणि बौद्धांच्या घरांना, दुकानांना आणि जी काही आहे त्या संपत्तीला आग लावली. सगळ्याची राख केली. आता दिघिनाला परिसरात एकही बौद्ध चकमा उरला नाही. बौद्ध चकमा समाजावर तर याआधीही बांगलादेशातील कट्टरपंथीयांनी अनेकदा हल्ले केले आहेत. किड्या-मुंग्यांसारखे मारले आहेत. जीवदान हवे, तर इस्लाम स्वीकारा, म्हणून अतोनात अत्याचार केले आहेत. हे सगळे लिहिताना भारतातील बौद्ध समाजाचे आणि मागासवर्गीय समाजाचे काही फुटीरतावादी स्वयंघोषित नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि मानवतावादी कार्यकर्ते आठवतात. डफली घेऊन फुटीरता पेरणारे ते विष पसरवणारे ते लोक आठवतात. ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ म्हणत हे लोक भारतात आंदोलन करत होते. ‘ऑल आईज ऑन पॅलेस्टाईन’ म्हणत हेच लोक भारतात इस्रायलविरोधात मोर्चे काढत होते. मग बांगलादेशमधल्या अल्पसंख्याक, त्यातही बौद्ध आणि आदिवासी समाजाचे दुःख यांना दिसत नाही का?
विषयांतर झाले, पण सांगायला हवे. दि. ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमीला बाबासाहेबांना वंदन करायला गेले होते. तिथे एक ग्रुप हिंदू धर्माची निंदानालस्ती करत होता. बौद्ध समाज कसा हिंदूंपेक्षा वेगळा आहे, हे सांगत होता. त्यांना विचारले की, बांगलादेशमध्ये नामशूद्र समाजावर अत्याचार होत आहेत. त्याबद्दल बोला. तर त्या लोकांचे म्हणणे होते, आम्हाला काय करायचे? अर्थात, हा एक ग्रुप एक फुटीरतावादीच ग्रुप होता, तर बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर होणार्या अत्याचाराबाबत यांच्या तोंडाला चिकटपट्टी लागली आहे.
बांगलादेशमधील हिंसा अचानक सुरू झाली का? तर नाही. २००४ साली एकरामुल हक बुलबुल आणि मसूद मिलाद यांनी 2004 साली विश्वविद्यालयामध्ये ‘जमातीकरण’ यावर एक अहवाल प्रकाशित केला होता. त्याचकाळात ढाका विश्वविद्यालयाचे इतिहास विभागाचे प्रा. मेशबाह कमाल यांनी मत मांडले होते की, “विश्वविद्यालयामध्ये कट्टरपंथी विद्यार्थ्यांचा शिरकाव वाढत आहे. ते मदरशांमधून शिकून येतात. त्यांच्यामुळे ढाका विश्वविद्यालय म्हणजे कट्टरपंथीयांचा अड्डा होत आहे, असे दिसते.” तेव्हा बांगलादेशमधल्या कुणीही त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही. मात्र, मदरशांमधून इस्लामिक धार्मिक शिक्षण घेतलेले तरुण बांगलादेशमधल्या महाविद्यालयात नेतृत्व करू लागले. अशीच एक संघटना ‘हिज्ब-उत-तहरीर.’ बांगलादेशमध्ये जे हिंसक आंदोलन झाले, त्यात या संघटनेचे सदस्य असलेले विद्यार्थी सामील होते. नाहीद इस्लाम, सरजिस आलम, हसनत अब्दुल्ला, आसिफ महमूद, अबू बक्र मजूमदार आणि अब्दुल कादर वगैरे हिंसात्मक आंदोलनाचे नेतृत्व करत होते. हे सगळे ‘हिज्ब-उत-तहरीर’ या दहशतवादी संघटनेशी जोडेलेले होते. ढाका विश्वविद्यालय कायदा विभागाचे प्रा. आसिफ नजरूल हे बांगलादेशाच्या अंतरिम सरकारमध्ये कायदा, न्याय आणि संसदीय विषयांबद्दलचा मंत्रालयाचा सल्लागार आहेत. ते ‘हिज़्ब-उत-तहरीर’चे सदस्य आहे. तसेच, मोहम्मद युनूस सत्तेत आल्यानंतर बांगलादेशमधल्या अनेक कट्टरतावादी धर्मांध गुन्हेगारांना तुरुंगातून सोडण्यात आले.
दुसरीकडे ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेचा वारसा चालवणारी ‘अंसार-अल-इस्लाम’ ही दहशतवादी संघटना सक्रिय झाली. मग एका बांगलादेशी विचारवंत अब्दुल्लाहिल अमन आजमीने म्हटले की, “भारताच्या रविंद्रनाथ टागोरांचे राष्ट्रगीत हे बांगलादेशचे राष्ट्रगीत होऊच शकत नाही,” तर ‘जमात-ए-इस्लामी बांगलादेश’ या पक्षाने म्हटले की, भारताच्या संविधानाचा प्रभाव असलेले बांगलादेशचे संविधान बदलून टाका. ‘नुरुल हक नूरोफ़ गोनो ओधिकार परिषद सार’च्या कट्टरपंथी इस्लामी समूहाने बांगलादेशचे संविधान हटवा, यासाठी समर्थन दिले. त्यानंतर इथल्या आंदोलनामध्ये कालिमा ध्वज दिसू लागला. हा कालिमा ध्वज म्हणजे इस्लामवर श्रद्धा आणि इस्लामसाठी बलिदान याचे प्रतीक.
बांगलादेशमधील तरुणाई प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमांवर सक्रिय आहे. या समाजमाध्यमांवर युट्यूब आणि अन्य समाजमाध्यमांचा वापर करून कट्टरपंथीयांनी देशातील ९२ टक्के मुस्लिमांना कट्टरेतेचे धडे द्यायला सुरुवात केली. त्याशिवाय, त्याचवेळी बांगलादेशमध्ये सोशल मीडिया स्टार आणि लोकप्रिय असलेल्या व्यक्तींनी समाजमाध्यमांवर इस्लाम, संस्कृती सध्याची बांगलादेशाची परिस्थिती यांवर युवकांची मते बनवण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू केला होता. एकंदर भारत आणि हिंदूविरोधात बांगलादेशामध्ये जनमत तयार करण्याचे काम अनेक दशके सुरू होते. हे सगळे लिहितानाही ‘भारत तेरे तुकडे होंगे हजार’ म्हणणार्या विद्यार्थ्यांची आठवण येतेच येते. नशीब, भारताचे केंद्र सरकार सक्षम आहे आणि ‘ब्रेकिंग इंडिया’ला पुरून उरत आहे.
असो. बांगलादेशमध्ये हे का घडत असेल? शेख हसीना यांनी मागे पाश्चात्य राष्ट्रे, भारताचा काही भाग, म्यानमारचा काही भाग आणि बांगलादेशचा काही भाग मिळून ख्रिस्ती देश ‘ईस्ट तोमोर’ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हटले होते. हे म्हणणे एक वेळ खरे मानले तर काय जाणवते? तर पाश्चात्य देशांना फार काही हाती लागले नाही. कारण, मोहम्मद युनूस हे नोबेल विजेते जरी असले, तरी तेे शेवटी धर्माने आहेत मुस्लीम. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार जगभरातला कोणताही मुस्लीम आधी मुस्लीमच असतो. त्यांच्यासाठी इस्लामच सर्वप्रथम. त्यामुळेच मोहम्मद युनूस सत्तेत बसल्यावर बांगलादेशातील कट्टरपंथी मुसलमानांच्या इस्लामिक बांगलादेशला कधीच नाकारू शकत नव्हते. कट्टर धर्मांधांच्या म्हणण्यानुसार बांगलादेशमध्ये इस्लामवर श्रद्धा नसणारे काफिर बांगलादेशमध्ये जगू शकणार नव्हते. तसेच कट्टरपंथीय दहशतवादी संघटना युनूस यांना पाश्चिमात्य राष्ट्राच्या मर्जीप्रमाणे वागू देणार नाहीत.
दुसरीकडे चीनची सध्याच्या बांगलादेशबद्दल काय भूमिका आहे, हे पाहणेदेखील तितकेच गरजेचे आहे. भारत आणि बांगलादेशाचे आधीचे सौख्य चीनला खूपतच होते. भारताला त्रास देता यावा म्हणून इस्लामिक पाकिस्तानला चीन मदत करत असतोच. बहुसंख्य मुस्लीम असलेल्या बांगलादेशला ‘इस्लामिक बांगलादेश’ बनवून भारताची पूर्व सीमा अशांत करावी, असा चीनचा मनोदय नक्कीच आहे. त्यामुळेच यापूर्वी भारत आणि बांगलादेशमध्ये जो काही विवाद असेल, तो विवाद चिघळवण्याचे काम चीन नित्यनेमाने करत आला आहे. पण, शेख हसीनांच्या सत्ताकाळात बांगलादेश आणि भारताचे संबंध चांगले होते. त्यामुळे चीनचा मदतीचा हात बांगलादेशाने स्वीकारला नव्हता. मात्र, शेख हसीना यांची सत्ता गेली आणि बांगलादेशामध्ये कट्टरतावादी मुस्लिमांचे राज्य आल्यासारखे वातावरण तयार झाले. अशा काळात ‘जमात-ए-इस्लामी’, ‘इस्लामी छात्र शिबीर’, ‘हिफाजत-ए-इस्लाम’ आणि ‘खिलाफत मजलिस’ या संघटनांचे २० पेक्षा जास्त प्रतिनिधी चीनच्या दौर्यावर गेले आहेत. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने यांना आमंत्रित केले. चीनमध्ये मुस्लिमांना कशी वागणूक मिळते, हे जगजाहीर. बांगलादेशमध्ये जसे हिंदूंचे शिरकाण होत आहे, तसे चीनमध्ये उघूर मुस्लिमांचे शिरकाण होते. मात्र, आता चीनला बांगलादेशातील मुस्लिमांचा पुळका आला आहे.
तसेच बांगलादेशमध्ये नुकतेच ‘बीएनपी’ या कट्टरतावादी राजकीय पक्षाचा महासचिव रूहुल कबीर रिझवी याने भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घाला, म्हणत आंदोलन केले. त्याने त्याच्या पत्नीची साडी जाळली आणि लोकांना सांगितले की, ती भारतीय साडी होती म्हणून तिला जाळले. भारताचे आता बांगलादेशमध्ये काही नको. भारतीय वस्तूंवर आणि भारतावरर त्याने बहिष्कार घाला, असे बांगलादेशातील ९८ टक्के मुस्लिमांना आवाहन केले आहे.
भाजपची राष्ट्रीय प्रवक्ता तुहिन सिन्हा यांनी ऑगस्ट महिन्यात म्हणजे जेव्हा बांगलादेशात हिंसेला भयंकर सुरुवात झाली होती, तेव्हा राहुल गांधींवर आरोप केले होते. तुहिन म्हणाल्या होत्या की, “राहुल गांधी लंडनच्या दौर्यावर असताना रूहुल कबीर रिझवी याला भेटले होते. त्यानंतर बांगलादेशमध्ये हिंसक आंदोलन तीव्र झाले.” अर्थात, यावर राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांनी थातुरमातूर उत्तर दिले. पण, तरीही प्रश्न येतोच की, भारतविरोधी असणार्या या रूहुल कबीर रिझवीला जर राहुल गांधी भेटले असतील , तर का भेटले असतील? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत.
या पार्श्वभूमीवर बांगलादेशातील हिंदूंनी कधी काळी पाहिलेल्या स्वप्नांबद्दल लिहायलाच हवे. १९७१ साली बांगलादेशची निर्मिती झाली आणि १९७५ साली वंगबधू शेख मुजिबूर रहमान यांची हत्या झाली. सांस्कृतिक आणि भाषा एक्य म्हणून हिंदू मुस्लीम गुण्यागोविंदाने राहू शकत नाहीत, याची जाणीव त्याचवेळी बांगलादेशतील अल्पसंख्याक हिंदूंना झाली होती. त्यातूनच मग बांगलादेशातील काही हिंदूंना वाटले की, आपण जिथे बहुसंख्य आहोत, तो आपला वेगळा देश बनावा. त्याचे नाव ‘हिंदू गणराज्य बंगभूमी’ असावे. बंगाल दक्षिण आणि पश्चिम भूभाग हा बांगलादेशामधून बाहेर पडावा आणि ‘हिंदू गणराज्य बंगभूमी’ नावाचा स्वतंत्र देश निर्माण व्हावा, यासाठी ‘स्वाधिन बंगभूमी’ नामक आंदोलनही सुरू झाले. त्याचे नेतृत्व कालिदास वैद्य आणि धीरेंद्र पॉल यांनी केले होते. त्यावेळी बांगलादेशाच्या सुरक्षाव्यवस्थेने चित्तरंजन सुतार यांचेही नाव घेतले होते. मात्र, चित्तरंजन सुतार यांनी अशा वेगळ्या देशाची काही संकल्पना नव्हतीच. यावेळी ‘बांगलादेश रायफल्स’चे तत्कालीन महासंचालक मेजर जनरल जहांगिर आलम चौधरी यांनी म्हंटले होते की, “या फुटीरतवादी लोकांनी जेसोर, कुश्तिया, फरीदपुर, बारीसाल आणि पटुआखाली तसेच चितगांव ही २० हजार चौ. किमी भूमी स्वाधिन बंगभूमी म्हणून नियोजित केली आहे. ही भूमी बांगलादेशाच्या एक तृतीयांश होती. तसेच या लोकांनी नव्या देशाचा ध्वजही नियोजित केला होता. भगवा आणि हिरवा रंग असलेला ध्वज आणि त्यावर पांढर्या रंगाचा सूर्य. पण, पुढे बांगलादेशामध्ये हिंदू केवळ सात टक्के उरला आणि ही चळवळ लुप्त झाली, असे चित्र निर्माण झाले.
बांगलादेशातील हिंदूंनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले नाही. मात्र, बांगलादेशमध्ये अत्याचाराविरोधात हिंदू संघटित होत आहे. ‘आमार शोनार बांगला’ म्हणत स्वधर्म, स्वदेशासाठी लढत आहेत. भारत जरी कागदोपत्री निधर्मी देश असला तरी भारताचा आत्मा हिंदू संस्कृतीचा आहे. त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंसाठी भारतीय हिंदूंचा जीव हा तळमळणाराच! बांगलादेश मुक्ती संग्रामच्या वेळी भारताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. आता बांगलादेश हिंदू संवर्धनासाठी भारत नक्कीच भूमिका बजावेल, यात शंका नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाच्या शक्तीत सहभागी असलेल्या सर्वांनीच बांगलादेशातील हिंदूंना साथ द्यायचे ठरवले आहे. ‘हिन्दव:सोदरा: सर्वे, न हिन्दू: पतितो भवेत्।’ मग तो भारतातलाच नाही तर जगाच्या पाठीवरचा कुठचाही हिंदू असू दे!