आज दि. 6 डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. ‘अत्त दीप भव’ म्हणत समाजाला आत्मभान देणार्या आणि संविधान लिहून समस्त भारतीयांना कायदेशीर हक्क, संरक्षण प्रदान करणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचा जागर करताना, भारतासह बांगलादेशात त्यांची विचारप्रेरणा कशी कार्यरत आहे, याचा मागोवा घेणारा हा लेख...
बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी विदेशात शिकत होते. इकडे त्यांची पत्नी रमाई मुंबईत होत्या. घरची गरिबी होती. अशातच माता रमाईचं लेकरू आजारी पडले. उपचारासाठी पैसे नव्हतेच. शेवटी माता रमाईच्या कुशीत बाळाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. माता रमाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकमेकांना पत्र लिहीत असत. एकमेकांची ख्यालीखुशाली विचारत असत. पण, ‘आपले लाडके बाळ या जगात नाही, हे तिथे परदेशात शिकून बॅरिस्टर व्हायला गेलेल्या सायबांना कसे सांगायचे?’ हा विचार करून माता रमाईने ही दु:खद घटना बाबासाहेबांना कळवलीच नाही. मात्र, बाबासाहेबांना बाळाच्या मृत्यूबद्दल कळालेच. दु:खद घटनेने व्याकूळ होत रमाईला म्हटले, “रामू, दु:खच माणसाला मोठे करतात.” होय, दु:खच माणसाला मोठे करतात. ज्यांना कोणत्याही पर्यायाशिवाय दु:ख पचवावे लागते, त्यांना त्या स्वदु:खापलीकडे जाऊन इतरांच्या दु:खाचा वेध घेण्याची दैवदुर्लभ गुणवत्ता प्राप्त होते. जातीय विषमतचे, संधी नाकारण्याचे आणि मानवी जीवनाचे मूलभूत हक्कच नाकारण्याची, न जाणे किती तरी दु:ख डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगले होते. त्या दु:खांपलीकडे जाऊन त्यांनी तथागत गौतम बुद्धांची चार आर्य सत्य समजून घेतली. भीमराव आंबेडकर ते महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून जगाला दिशा देण्याचा त्यांचा प्रवास केवळ आणि केवळ मानवी हक्क आणि कर्तव्याचा अद्वितीय अविष्कार आहे.
डॉ. भीमराव आंबेडकर हे काही केवळ एका समाजाचे उद्धारक नव्हते, तर तळागाळातल्या शोषित, वंचित प्रत्येकाच्या उद्धारासाठी प्रेरणा देणारे त्यांचे कार्य आणि विचार होते. कारण, मागासवर्गीय समाजाला मूलभूत अधिकार हक्क मिळावेत, त्यांनाही माणसाप्रमाणे जगता यावे, यासाठी डॉ. बाबासाहेबांनी कृती केली, विचार मांडले. हे जितके खरे आहे, तितकेच त्यांनी लिंगभेदापलीकडे जाऊन स्त्री आणि पुरूषांना संविधानाद्वारे समान हक्क दिले. जगण्याचा हक्क, शिक्षणाचा हक्क, धर्माचा हक्क, संरक्षण तसेच संस्कृतीचा हक्क, हक्कांसाठी न्याय मागण्याचा हक्क हे सगळे हक्क त्यांनी संविधानाद्वारे सर्व भारतीयांना दिले. हक्क आणि कर्तव्य यांचा मागोवा घेताना जाणवते ती बाबासाहेबांची प्रेरणात्मक विचारी दृष्टी. समाजात जातीयतेनुसार विभागणी होती. माणूस म्हणून जगण्याचे हक्क आणि अस्तित्व गमावलेल्या समाजामध्ये आपल्या हक्क, अधिकाराची जाणीव कशी होणार? प्रेरणा कशी मिळणार? समाजशास्त्रामध्ये मास्लो या विचारवंताचे प्रेरणेबद्दलची संकल्पना प्रसिद्ध आहे. त्याच्या मते, शारीरिक गरजा माणसाला सर्वप्रथम काही तरी करण्याची प्रेरणा देतात. शारीरिक गरजा संपल्या की, सुरक्षितेविषयीच्या गरजा त्याला प्रेरणा देतात. एकदा का शारीरिक आणि सुरक्षिततेच्या गरजा संपल्या की, माणसाला मग नातेसंबंधांची गरज लागते. ही गरज त्याची प्रेरणा बनते. ही गरज पूर्ण झाली की, मग माणसाला प्रेम व आत्मगौरवाची गरज भासते आणि त्यानंतर मग आत्मसाक्षात्काराची गरज त्याची अंतिम प्रेरणा असते. पण, मला असे वाटते की, बाबासाहेबांनी तळागाळातल्या शोषित, वंचित समाजाला जी प्रेरणा दिली, ती या सिद्धांताला छेद देते. बाबासाहेबांनी उपेक्षित आणि अन्याय-अत्याचाराने गांजलेल्या समाजबांधवांना मास्लोने सांगितलेल्या सगळ्या गरजांपलीकडे जाऊन माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा दिली. ‘मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमही भारतीय आहे’ म्हणत त्यांनी समाजाला माणूसपणासह देशाभिमानी नागरिकत्वाचा मंत्र दिला. जातीय विषमतेविरोधातली बाबासाहेबांची आंदोलनं पाहिली, तर काय दिसते? ‘काळाराम मंदिरा’चा सत्याग्रह घ्या. वरकरणी वाटते की, मंदिरात प्रवेश मिळाल्यावर वंचित समाजाचा काय असा भौतिक विकास होणार किंवा महाडच्या चवदार तळ्यातले पाणी पिऊन काय समाजाची उपेक्षा कायमची थांबणार? पण, या दोन्ही आंदोलनामागचा बाबासाहेबांचा विचार काय होता? तर माणूस आणि त्यातही धार्मिक समाजशील माणूस म्हणून माणसाला कोणत्याही भेदाशिवाय जगता आले पाहिजे. कोणत्याही भेदाशिवाय जगता आले पाहिजे, ही प्रेरणा समाजाला बाबासाहेबांनी दिली आणि मला वाटते की, ही प्रेरणाच मानवी हक्काचा उगम आहे.
या अनुषंगाने मानवी हक्काची पहिली सनद म्हणून ‘मॅग्नाकार्टा’ला पाहिले जाते. असे म्हटले जाते की ’मॅग्नाकार्टा’ हा जगातील पहिला असा तहनामा होता, ज्याच्या अन्वये इंग्लंडच्या राजाचे अनभिषिक्त अधिकार संपले आणि आणि त्याला कायद्याने वागण्याचे बंधन आले. त्या ‘मॅग्नाकार्टा’ तहात काय होते, तर लोकांना आता विनाकारण अटक करता येणार नव्हती. आता राजा लोकांची संपत्ती जप्त करू शकत नव्हता. राजापेक्षा देशाचा कायदा आणि न्यायव्यवस्था मोठी ठरणार होती. लोकांना राजाच्या एखाद्या निवाड्याच्या विरुद्ध अपील करायचे प्रशासकीय अधिकार प्राप्त झाले होते. प्रसंगी राजाला पदच्युत करण्याचे अधिकार लोकांना मिळाले होते, तर असा हा ‘मॅग्नाकार्टा’ तह मानवी हक्काची सनद बनला. मात्र, जगाच्या इतिहासात मानवी हक्कांना ध्रुवतार्यासारखे अढळ पद मिळाले ते डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळे. जगाने मान्य केलेल्या संविधानातील ‘अनुच्छेद 12 ते 35’ म्हणजे ‘मॅग्नाकार्टा’चे विशाल आणि कालातीत रूप आहे. मानवी हक्क आणि बाबासाहेबांचे कर्तृत्व यासंदर्भाचा धांडोळा घेताना तथागत गौतम बुद्धांनी दहा ‘पारमिता’द्वारे शील मार्ग सांगितला तो आठवतो. या दहा ‘पारमिता’ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारकार्यातील मानवी हक्कांचा प्राणबिंदूच आहेत. त्याचा सांगोपांग आढावा घेऊ. त्या पारमिता पाहू -
शील, दान, उपेक्षा : निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे
नैष्काम्य : ऐहिक सुखाचा त्याग करणे.
वीर्य : हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे.
शांती : शांती म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे.
सत्य : माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये.
अधिष्ठान : ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.
करुणा : मानवासकट सर्व प्राणीमात्रांविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता.
मैत्री : मैत्री म्हणजे सर्व प्राणी, मित्र, शत्रू याविषयीच नव्हे, तर सगळ्यांविषयी कल्याण चिंतणे मंगल चिंतणे.
या दहा ‘पारमिता’नुसार डॉ. बाबासाहेबांनी शील नेहमी जपले. आयुष्यभर त्यांना विषमतेचे आणि अनेकवेळा गुणवत्ता असूनही संधी नाकारण्याचे प्रसंग अनुभवावे लागले. मात्र, जेव्हा बाबासाहेबांना समाजासाठी विचार कार्य करण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांनी शील जपले. म्हणजे काय केले, तर त्यांनी सर्व समाजाचे कल्याण होईल, असाच विचार केला, असेच कृत्य केले.
संविधानातील कायद्याचा अर्थ लावताना त्यांनी केवळ मागासवर्गीय समाजाचा विचार केला नाही, तर हिंदू समाजातील अठरापगड जातींसह अल्पसंख्याक ते अँग्लो इंडियन या सर्वांना समान हक्क कसा मिळेल, यासाठीची तरतूद केली. ही तरतूद मानवी हक्क अबाधित आणि सुरक्षिततेची खात्री देते.
असो. पाकिस्तानच्या जन्माआधी 1940 साली बाबासाहेबांनी ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ पुस्तक लिहिले होते. फुटून निघणार्या पाकिस्तानसंदर्भात त्यांनी अतिशय धाडसी आणि प्रखर चिंतन आणि तर्कशुद्धरित्या विवेचन केले होते. मुसलमान म्हणून मुस्लीम आधी मुस्लीम आहेत आणि नंतर देश, संस्कृती वगैरे वगैरे आहे, हे त्यांनी स्पष्ट आणि पुराव्यांसकट नमूद केले होते. मात्र, 1947 साली पाकिस्तानमध्ये पूर्व बंगालही जोडला गेला, कसा तर धार्मिकतेच्या आधारावर. मात्र, पुढे 1971 साली सांस्कृतिकवादाने पूर्व बंगाल पाकिस्तानमधून फुटला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. त्यावेळी संस्कृतीने माणूस बांधला जातो आणि संघटित होतो, असे चित्र निर्माण झाले. या बांगलादेशमध्ये मुस्लीम आणि अल्पसंख्याक हिंदू बौद्ध आणि जैनही होते. हिंदूंमधील मागासवर्गीय तसेच आदिवासी समाजही होता. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1940 सालीच लिहिले होते की, मुस्लिमांना देश, संस्कृती आणि इतर कोणत्याही बंधापेक्षा त्यांचा इस्लामच महत्त्वाचा आहे. त्यापलीकडे काही नाही. बाबासाहेबांनी सांगितलेले हे सत्य आज 2024 साली बांगलादेशमध्ये पुन्हा खरे ठरताना दिसते. बांगलादेशच्या निर्मितीवेळी संस्कृतीने हिंदू-मुस्लीम एकत्र आले खरे. पण, आज त्याच बांगलादेशमधल्या हिंदूंवर तिथले मुस्लीम अनन्वित अत्याचार करत आहेत. लुटालूट, जाळपोळ, बलात्कार, झुंडबळी हे सगळे अत्याचार तिथला हिंदू सहन करत आहे. त्यांच्यावर तिथे अत्याचार का होत आहेत, तर ते केवळ गैरमुस्लीम आहेत, हिंदू आहेत म्हणून! बाबासाहेबांनी 1940 साली ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ पुस्तकात बाबासाहेबांनी जे लिहिले, ते पाकिस्तान आणि पुढे बांगलादेश निर्मितीच्या वेळी तिथल्या हिंदूंनी लक्षात घेतले असते तर?
आज बांगलादेशमध्ये हिंदूंच्या मानवी हक्कांवर गदा आली आहे. इतर कोणत्याही हक्कापेक्षा जगणे हा माणसाचा पहिला मूलभूत हक्क आहे. हा हक्कच बांगलादेशमधील हिंदूंकडून हिरावला गेला आहे. बांगलादेशचे संविधान हे भारतीय संविधानाचा कवडसा आहे, असे म्हटले जाते. भारतीय संविधानाचेच अंशिक स्वरूप असलेले संविधान बांगलादेशमध्ये नकोच, असे म्हणणार्या बांगलादेशमध्ये हिंसक दहशतवादी संघटना निर्माण झाल्या आहेत. बांगलादेशचे सध्याचे निष्क्रीय आणि धर्मांध सरकार दहशतवाद्यांच्या, धर्मांधांच्या या दबावाला बळी पडत आहे. कारण, त्यांना माहिती आहे की, भारतीय संविधानाचा आधार घेत बनवलेल्या बांगलादेशच्या संविधानामध्ये प्रत्येकाला जगण्याचा, अभिव्यक्तीचा आणि धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे. बांगलादेश हा कट्टर इस्लामिक देश बनून ‘शरीया’ कायद्यावर चालावा, यासाठीच हिंसा करणार्यांना म्हणूनच बांगलादेशचे संविधान नको आहे. मात्र, या सगळ्या परिक्षेपात बांगलादेशच्या हिंदूंचे आत्मतेजही वाखाणण्यासारखे आहे. जेमतेम सात टक्के लोकसंख्या असूनही ते ‘बांगलादेश आमचा देश’ म्हणत तिथेच राहून संघर्ष करत आहेेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये बांगलादेश सोडणार नाहीत, असे म्हणत आहेत. हे देशप्रेम, ही निष्ठा त्यांच्यामध्ये जागृत आहे. याच बांगलादेशातल्या उजेपी मोंडल यांनी डॉ. बाबासाहेबांनी संविधान सभेत जावे, यासाठी प्रयत्न केले होते. यश मिळवले होते. अर्थात, त्यासाठी बाबासाहेबांची विद्वत्ता आणि गुणवत्ताही अलौकिकच होती म्हणा. पण, संविधानकर्त्याच्या पाठिशी उभे राहणार्या त्यावेळच्या जनतेचे वंशज आताचे बांगलादेशी लोक आहेत. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे, बांगलादेशचे मुसलमान आधी देश की आधी इस्लाम, या दुविधेमध्ये नाहीत. त्यांना उत्तर माहिती आहे की, त्यांच्यासाठी आधी इस्लामच! मात्र, तिथल्या उरलेल्या अल्पसंख्याकांना, जे भारतीय मातीतल्या धर्माचे लोक आहेत म्हणजे हिंदू, बौद्ध, जैन, शीख, या अल्पसंख्यांकांना माहिती आहे की, स्वत:च्या जगण्यासोबतच देशही महत्त्वाचा! देशाच्या संविधानाने दिलेले हक्कही महत्त्वाचे! ते हक्क मिळवण्यासाठीच आज बांगलादेशचा हिंदू लढत आहे. ही प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि अत्याचाराविरोधात संघर्ष करा,’ याचे वास्तव रूपच आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रेरणेला मनापासून वंदन!